स्वरसाधनेचा ‘सुवर्ण’ संगम...

08 Jun 2022 10:26:01


mans
 
 
 
संगीत कलेची साधना केवळ स्वतःसाठी न करता, ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविण्यासाठी झटणार्‍या नाशिकच्या सुवर्णा क्षीरसागर यांच्या कलाप्रवासाविषयी....
 
प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, ध्यास अशा अनेक गुणांच्या मिश्रणाने एक सच्चा कलाकार घडत जातो. शास्त्रीय संगीत गायन, उत्तम वक्तृत्व, हार्मोनियम वादन तसेच ज्या क्षेत्रात महिलांची संख्या तुलनेने कमी, त्या ‘व्हायोलिन’ वादनात प्रावीण्य मिळवणार्‍या सुवर्णा क्षीरसागरही अशाच सर्वगुणसंपन्न!
 
 
शास्त्रीय संगीताचा वारसा सुवर्णा यांना त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला. त्यांची आजी एक उत्तम भजन गायिका आणि कीर्तनात ‘हार्मोनियम’ची साथ देणारे त्यांचे वडील हे एक सुपरिचित गायक. रोज संध्याकाळी वडिलांसोबत हरिपाठाला जाणं, भजनात त्यांच्यासोबत अभंग, गौळणी गाणं, त्यात सगळ्यांकडून होणारं कौतुक, लाड, भरभरून मिळालेली दाद अशा सगळ्या वातावरणात सुवर्णा यांचं बालपण गेलं. यातूनच ओळख झाली ती सप्तस्वरांची... या सप्तस्वरांच्या ओळखीतून ’भजन करणारी बालिका’ म्हणून त्यांचे कौतुक होत होते. शालेय शिक्षणाबरोबरच संगीताचे शिक्षण घरात आई-वडिलांकडे तसेच शास्त्रीय संगीताचे काही राग आपल्या काकांकडे त्यांनी गिरवले. नकळतच त्यांचे संपूर्ण जग स्वरमय होत गेले व स्वरांची ओढ वाढत गेली.
 
 
संगीत क्षेत्रात मन रमले तेव्हा त्यातच करिअर करण्याचा सुवर्णा यांचा निर्णयही पक्का झाला. सुरुवातीची काही वर्ष वडिलांकडे गाणं शिकून सुवर्णा यांनी गुरूच्या शोधात नाशिकमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि संगीत विषयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नाशिक येथील आपल्या गुरुंकडे शिक्षण म्हणजे साक्षात परब्रह्मांची अनुभूती असे सुवर्णा सांगतात. एकीकडे गांधर्व महाविद्यालयातूनही गाण्याच्या परीक्षा देत असताना गायनाबरोबरीनेच ‘हार्मोनियम’वादनदेखील यायला हवे, या त्यांच्या मोठ्या बहिणीच्या आग्रहाखातर त्यांनी ‘हार्मोनियम’चाअभ्यासदेखील सुरू केला.
 
 
गायन व ‘हार्मोनियम’ या दोन्ही क्षेत्रात सुवर्णा यांची समाधानकारक प्रगती होत असतानाच, स्वरांच्या वाटेवर अजून काहीतरी नाविन्यपूर्ण शोध घ्यायला हवा, असे त्यांच्या मनाला वाटत होते. प्रभाकर जोग यांचे गाणारे ‘व्हायोलिन’ यादरम्यान त्यांनी ऐकले व आपण हे वाद्य शिकले पाहिजे, असा त्यांच्या मनाने ध्यास घेतला. ‘व्हायोलिन’ हे वाद्य निवडणार्‍या फारशा महिला संगीत क्षेत्रात नाहीत, हा काही अंशी खरा असलेला समज. परंतु, त्याच वाद्याच्या मधूर स्वरांची स्वरानुभूती सुवर्णा यांच्या ‘व्हायोलिन’ निवडीस कारणीभूत ठरली. त्यातील शिक्षणासाठी आजही त्या मुंबईत सुप्रसिद्ध ‘व्हायोलिन’ वादक मानस कुमारांकडे जातात. एकीकडे संगीतातील शिक्षण, स्पर्धांमध्ये सहभाग अशा प्रवासात एका विद्यार्थ्याने केलेल्या आग्रहातून सुवर्णा यांचे स्वतःचे संगीत संकुल साकारले. ‘स्वतः विद्यार्थी आणि माझ्या विद्यार्थ्यांची गुरू’ असा प्रवास सुरू झाला आणि सुरुवात झाली एका नव्या शिक्षणाची...
 
 
सुवर्णा म्हणतात की, “आज जवळपास २० वर्षं माझ्याकडे विद्यार्थी शिकत आहेत. यातून मी देखील एक गुरू म्हणून घडत गेले. उत्तम संगीत, गायनाच्या क्षेत्रात होणारे नवनवीन प्रयोग, नव्या वाद्यांविषयीचीसखोल माहिती या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवी. संगीत क्षेत्रात पुढे जाण्यासाठी जी धडपड मला करावी लागली, ती ग्रामीण भागातील माझ्या विद्यार्थ्यांना करायला लागू नये, यासाठी माझा आवर्जून प्रयत्न असतो,” असे त्या सांगतात.
 
 
दरवर्षी काही विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि मोफत वाद्य पुरवली जाण्याची परंपरा त्यांनी अतूटपणे, अविरतपणे पुढे नेली. सुवर्णा यांच्या संगीत संकुलातून एकाच वेळी १०० विद्यार्थ्यांनी केलेला ‘हार्मोनियम’वादनाचा आगळावेगळा प्रयत्न विलक्षण यशस्वी ठरला. त्यांनी नुकताच साकारलेला ‘सन्मान दशकांचा’ हा प्रयोगदेखील त्यातील वेगळेपणामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. लेखन, गायन, नृत्य, अभिवाचन, वादक अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रातील तब्बल ४७ महिला कलाकारांना एकाच मंचावर व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम उल्लेखनीय ठरला. नाशिकमध्ये एका मैफिलीत ‘हार्मोनियम’ वादन करताना, ’तुमची ‘हार्मोनियम’ ऐकून गोविंदराव पटवर्धनांची आठवण झाली’, अशी एका रसिक प्रेक्षकाची आलेली प्रतिक्रिया, पुण्याच्या एका मैफिलीत ‘तुमच्या ‘व्हायोलिन’ वादनातून तुमचा स्वभाव प्रतित होतो,’ असे प्रेक्षागृहातून आलेलं वाक्य, एका वाहिनीवरील कार्यक्रमात ‘सुन्या सुन्या’ मैफिलीत या गीताच्या गायनानंतर आलेली प्रतिक्रिया हा आपला ठेवा आहे, असे सुवर्णा मानतात. कुठल्याही क्षेत्रातील वाटचालीमध्ये अडचणींची शर्यत नसेल, तर यश मिळण्याचा आनंदही मिळत नाही. कलाकाराच्या जगण्यातला ’मी’ संपून केवळ कला उरते, तेव्हा कलादेखील कलाकाराला मनस्वीपणे स्वीकारते, असे सुवर्णा यांना वाटते. भविष्यातही मला स्वरगंगेत संगीत साधक म्हणून जीवन व्यतीत करायचे आहे. माझ्या रसिक प्रेक्षकांच्या आनंदासाठी, संगीत क्षेत्रातील मित्र-मैत्रिणींसाठी जे जे उत्तम करता येईल, ते सर्वच करायचं आहे. एक उत्तम व्यक्ती, उत्तम माणूस म्हणून विद्यार्थी घडवताना स्वतःला पारखून पाहायचे आहे, आगामी काळातील योजनांविषयी सुवर्णा सांगतात.
 
 
गुरूच्या रूपाने बालगायकांपासून ते वृद्धांपर्यंत असणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणार्‍या सुवर्णा क्षीरसागर यांची कला आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील ठसा उमटवेल याच त्यांना शुभेच्छा!
 
 
 
Powered By Sangraha 9.0