३ ‘निकाह’ करू नका, ‘तलाक’ही कायद्याने द्या

03 Jun 2022 10:32:07
 
talakh
 
 
 
गुवाहाटी : कोणताही मुस्लीम पुरुष तीन स्त्रियांशी ‘निकाह’ करू शकत नाही, असे सुनावतानाच आसामी मुस्लीम आपल्या म्हणण्याला पाठिंबा देत असल्याचे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केले आहे.
 
 
हिमंता बिस्व सरमा म्हणाले की, “कोणताही मुस्लीम पुरुष तीन स्त्रियांशी निकाह करु शकत नाही, या भूमिकेवर आसाम सरकार ठाम आहे. एक पती, एक पत्नी, दोन मुले आनंदाने राहा, ही आमची भूमिका आहे. आम्हाला यात फार काही गुंतागुंतीचे निर्णय घ्यायचे नाहीत. तसेच तुम्ही वडील असाल, तर तुम्ही तुमच्या मुलाला संपत्तीत जितका अधिकार देत आहात, तितकाच वाटा मुलीलाही द्या, ही आमची थेट भूमिका आहे.”
 
 
पुढे ते म्हणाले की, ’‘कोणाही मुस्लीम पुरुषाने बेकायदेशीररित्या ‘तलाक’ देऊ नये, केवळ कायदेशीररित्याच ‘तलाक’ द्यावा. त्यानंतरही पती आणि पत्नीने एकत्रितरित्या जितकी संपत्ती कमावली, त्यातील ५० टक्के वाटा पत्नीला द्यावा. हा सरकारचा विचार असून सर्वसामान्य मुस्लिमांचा विचारही सरकारला समान आहे.”
 
 
हिमंता बिस्व सरमा यांनी काँग्रेसवरदेखील टीका केली आहे. काँग्रेसवर टीका करतानाच काँग्रेस आगामी सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेतील मुख्य विरोधी पक्षाची आपली भूमिका कायम राखण्यासाठीही संघर्ष करताना दिसेल, अशी भविष्यवाणी केली. तसेच माझ्या आकलनानुसार २०२४ मध्ये काँग्रेसला ३०-३५ जागा मिळतील, असे ते म्हणाले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत हिमंता बिस्व सरमा म्हणाले की, “गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळाकडे पाहिल्यास पूर्वोत्तराकडे पंतप्रधानांनी विशेष लक्ष दिल्याने आता पूर्वोत्तरातील विद्यार्थ्यांबरोबरील वांशिक भेदभाव अचानक मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे.”
 
 
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी आवश्यक
 
 
देशातील विविध दंगली, हिंसाचारात समावेश असल्यावरुन नाव समोर आलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वरही हिमंता बिस्व सरमा बोलले. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालण्याचेही त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, “आम्ही सातत्याने सांप्रदायिक तणावामागे ‘पीएफआय’चा हात असल्याचे पाहिले आहे. इतकेच नव्हे, तर नुकत्याच झालेल्या बटाद्रवा घटनेतही आम्हाला ‘पीएफआय’चा हात असल्याचे संकेत मिळाले आहेत.”
 
 
 
Powered By Sangraha 9.0