प्रथमा नंतर आता 'सावनी'चे ही सिग्नल थांबले!

28 Jun 2022 13:03:11
Kaasav
 
 
मुंबई(प्रतिनिधी): प्रथमा नंतर आता आंजर्ले किनाऱ्यावर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'सावनी' या मादी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचा 'लोकेशन सिग्नल' ५ जून रोजी बंद झाला आहे. सॅटलाईट ट्रान्समीटरची बॅटरी संपल्यामुळे हे प्रसारण थांबले असावे असे वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने सांगितले. आंजर्ले पासून मुंबईच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत या मादी कासवाने प्रवास केला होता. सावनीने आतापर्यंत १९६० किमीचे अंतर कापले आहे. सावनीचे शेवटचे स्थान कुमटा, कर्नाटकच्या किनाऱ्यापासून १०० किमी अंतरावर होते. तर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या उर्वरित दोन कासवांचा दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास सुरू आहे.
 
  
वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने 'भारतीय वन्यजीव संस्थान'सोबत (डब्लूआयआय) 'ट्रॅकिंग द मायग्रेटरी मूव्ह ऑफ ऑलिव्ह रिडले सी टर्टल्स ऑफ द कोस्ट ऑफ महाराष्ट्र' हा संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. या अभ्यासाअंतर्गत पाच मादी कासवांवर सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू आहे. आत्तापर्यंत ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांना फक्त भारताच्या पूर्व किनार्‍यावर टॅग केले गेले आहे. मात्र, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असा संशोधन प्रकल्प राबवण्यात आला नव्हता. म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीला कोकण किनारपट्टीवर पाच ऑलिव्ह रिडले कासवांच्या मादींना यशस्वीरित्या सॅटेलाइट टॅग करण्यात आले. भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील 'ऑलिव्ह रिडले सी टर्टल्स'चा हा पहिला सॅटेलाइट टॅगिंग प्रकल्प आहे.
 
 
 
काही दिवसांपूर्वी  'प्रथमा' मादी कासव गुजरात सागरी परिक्षेत्रात भ्रमण करून महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात परतली होती. मात्र, या मादी कसवाचा लोकेशन सिग्नल बंद झाले. काही दिवस गुजरातमध्ये घालवल्यानंतर तिने पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. प्रथमाचे शेवटचे स्थान कुणकेश्वर, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापासून ६० किमी अंतरावर होते. त्यानंतर आता  या प्रकल्पाअंतर्गत टॅग केलेली 'सावनी' या कासवाचे सिग्नल ५ जून रोजी  बंद झाले आहेत. मुंबई सागरी परिक्षेत्रात भ्रमण करून 'सावनी' दक्षिणेकडे सरकत होती. सावनीने आतापर्यंत १९६० किमीचे अंतर कापले.  सॅटलाईट ट्रान्समीटरची बॅटरी अंदाजापेक्षा लवकर संपल्याचे वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन' कडून सांगण्यात आले आहे. सावनीचे शेवटचे स्थान कुमटा, कर्नाटकच्या किनाऱ्यापासून १०० किमी अंतरावर होते.

Powered By Sangraha 9.0