मुंबई(प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी वनपरिक्षेत्रात आज सकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. हा वाघ ५ ते ६ वर्षांचा असून मृत्यू कशामुळे झाला हे मात्र कळु शकले नाही असे वन विभागाने सांगितले. यंदा राज्यात १५ वाघांनी आपला जीव गमावला आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर जवळील मोझरी शिवारात आज सकाळी वाजता वाघाचा मृतदेह सापडला. हा वाघ नर आहे. वनरक्षक गस्तीवर असताना गावाच्या जवळ १०० मीटर अंतरावरील शिवार परिसरात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या मृत्यचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, आपले क्षेत्र प्रस्थापित करण्यासाठी दोन वाघांमध्ये लढाई झाली असावी. यामध्येच या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'च्या (एनटीसीए) 'टायगरनेट' या संकेतस्थळानुसार यंदा राज्यात एकूण १५ वाघांचा मृत्यू झाला आहे. जून महिन्यात १५ दिवसांमध्ये २ वाघांचा मृत्यू झाला आहे. या आधी रेल्वेच्या धडकेत गोंदिया येथे एका वाघाचा मृत्यू झाला होता.