ध्येयनिश्चिती करणे आणि त्यानंतर ध्येयप्राप्तीसाठी स्वतःला झोकून देणारेच पुढे कठोर मेहनतीने यशस्वी होतात. मात्र, यश मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याच्या हव्यासापोटी आहे तेही गमावून बसवण्याची वेळ येते. असाच काहीसा प्रकार ब्रिटनच्या महिला खेळाडूंच्या बाबतीत झाला. याबद्दल नुकताच एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकारासाठी खेळाडू प्रशिक्षकच कारणीभूत आहेत. प्रशिक्षणादरम्यान होणार्या छळवणुकीमुळे तीव्र शिसारी येईल, असे प्रकार उघडकीस आले आहेत.
ब्रिटनच्या ’व्हाईट रिव्ह्यू रिपोर्ट’मध्ये महिलांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण आदी प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे अनेक खेळाडू महिला आजारी पडत असल्याचेही अहवालात उघड झाले आहे. ३०५ पानी या अहवालात हजारो महिलांनी स्वतःवर झालेल्या अत्याचाराविरोधात पत्र निनावी पत्र लिहिली आहेत. स्वतःला खेळाडू म्हणून घडवताना कुठल्या तडजोडी कराव्या लागल्या, प्रशिक्षकांनी उत्कृष्ट खेळाडू घडविण्याच्या नादात किती क्रूर वागणूक मिळाली, याचा पाढाच त्यांनी वाचून दाखविला आहे. दुखापत झाल्यानंतर हाडे खिळखिळी झाल्यानंतरही प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागत होते. कुणी शौचाला गेले म्हणून त्याला शिक्षा दिली जात होती.
वजनवाढीबद्दल तर खेळाडू महिलांना तर इतकी चिंता होती की, त्यांच्या या सगळ्याचा मानसिक ताण त्यांच्यावर येत असे. वजन वाढू नये, याच तणावात अर्धावेळ निघून जायचा, अशी तक्रार खेळाडूंनी केली. त्याला कारणही तसेच होते. वजन वाढले की, मग खेळावर परिणाम होणार. त्यासाठीच प्रशिक्षकांनी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. बर्याच महिलांना यामुळे आजारांचा सामना करावा लागला होता. ‘द व्हाईट रिव्ह्यू कमिशन’ची क्रीडा विभागातर्फे स्थापना करण्यात आली. ब्रिटनमध्ये जिम्नॅस्टमध्ये शोषण, छेडछाड आदी प्रकार होऊ लागले होते.
त्यासाठी २०२० पासून हे कमिशन बसविण्यात आले. याअंतर्गत सर्व प्रकारांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली गेली. क्रीडा क्षेत्रात यशस्वी व्हायचे, तर छळवणूक झालीच पाहिजे, असे समीकरणच बनलेले होते. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीसोबतही असाच प्रकार घडला होता. तिला ‘ब्लुमिया’ नावाचा आजार झाला होता. त्यात ती आपल्या वजनामुळे इतकी तणावात असायची की तिला ‘इटिंग डिसऑर्डर’चा त्रास जाणवू लागला. ती जेवण भरपेठ करायची मात्र, वजन वाढण्याच्या भीतीने ती उलट्याही करायची. तीन वर्षे मानसिक शोषणाचा हा वनवास सुरू होता.
अखेर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर तिनेे खेळ हा विषयच सोडून दिला. ब्रिटनमध्ये बालपणापासूनच मुलांचा कल हा खेळाकडे असावा, यासाठी सातत्याने पालकांचाही दबाव असतो. बालवयात मुलाचं खेळणं चांगलं वाटू लागल्यानंतर त्याला एक प्रशिक्षण केंद्राशी जोडून देणे ही सर्वसामान्य बाब होऊन बसते. त्यानंतर सुरू होतो. सगळ्या दृष्टचक्राचा प्रवास... मुलींना प्रशिक्षकांकडून प्रशिक्षणाच्या नावाखाली झालेली मारहाण. या सगळ्यात जखमा, दुखापत झाली त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष केले जाई. पालकांकडे मुलांनी या प्रकाराच्या तक्रारी केल्या. मात्र, नियमावलीनुसार, पालकांनाही त्यात पडता आले नाही. प्रकार जेव्हा मानसिक आणि शारीरिक छळवणुकीपर्यंत पोहोचले तेव्हा कुठे त्या अन्यायाविरोधात वाचा फुटली.
वजनाच्या मुद्द्यावरून प्रशिक्षकांनी थेट पालकांकडेच तक्रारी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे घरातच आहाराचे नियोजन सुरू झाले. दिवसभराच्या प्रशिक्षणामुळे आलेला क्षीण आणि त्यानंतर रात्री घरी आल्यानंतर पुन्हा जेवणावरही मर्यादा.. या सगळ्या प्रकारात प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. दर दोन दिवसांनी वजन मोजण्याचेे वेळापत्रक प्रशिक्षकांनी लावून दिले होते. त्यांच्या याच सगळ्या हट्टामुळे खेळाडूंना वजन काट्याचीही भीती वाटू लागली होती. स्वतःचे वजन ऐकून विनाकारण दबाव वाटायला लागत असे. घरातील वजनकाटे भंगारात काढल्याचीही उदाहरणे आहेत. काहींना वजनकाट्यापासून आजही भीती वाटते अशीही उदाहरणे आहेत. अतिमहत्त्वकांशा अंगलट आलीच. चुकीच्या पद्धतीने खेळाडूंवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नामुळे अनेक मुलांचे भवितव्य टांगणीला लागले. अनेक महिलांचे शोषण झाले. ‘प्रोफेशन्लिझम’च्या गोड नावाखाली वाटेल ते खपवून घेतल्याने हजारो मुलींच्या आयुष्याचा खेळ झाला हे नक्की.