कलासक्त ‘खोत’

23 Jun 2022 09:36:27

khot
 
 
 
शिक्षकी पेशासोबतच कुंचल्याचे नानाविध आविष्कार चितारणारे कलासक्त अवलिया सतीश खोत यांच्या कारकिर्दीविषयी...
 
 
कल्पनेचा कुंचला, स्वप्नारंगी रंगला चित्र मी काढू कसे’ या जगदीश खेबुडकरांच्या गीताप्रमाणे अर्कचित्र आणि अभिजात कलेशी नाळ जुळलेल्या सतीश बाळकृष्ण खोत यांचा जन्म दि. २८ नोव्हेंबर, १९६२ रोजी सिंधुदुर्गातील मालवण (मसुरे) येथे झाला. घरात तीन भावंड. बहीण मोठी, तर सतीश हे मधले. खोतजुआ या छोट्याशा बेटावर २५ एक घरे खोतांचीच आहेत. पारंपरिक पद्धतीने त्यांचा शेती व्यवसाय. वडील बोटीवर असल्याने वर्षातून एकदा घरी येत. तेव्हा, आर्थिक स्थिती तशी मध्यमच. अशिक्षित असतानाही आईनेच सगळे संगोपन आणि संस्कार दिले. मुलांनी शिकावे असा तिचा आग्रह होता. गावात शाळा नसल्याने होडीने जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक, तर दहावीपर्यंतचे शिक्षण गावीच वायंगणी येथे झाले.
 
 
‘एसएससी’नंतर १९८० साली खोत यांनी थेट मुंबईला प्रयाण केले. वडिलांच्या मित्राकडे गिरगाव येथे वास्तव्य केले. शालेय जीवनात चित्रकलेची आवड होती. गावच्या घरी गणेशोत्सवात नागपंचमीत भित्तीचित्रे काढण्याचा व्यासंग आणि शाळेत ‘एलिमेंटरी’ आणि ‘इंटरमिडिएट’ या चित्रकलांच्या परीक्षांमध्ये मिळवलेले प्राविण्य मुंबईत कामी आले. यातून त्यांना कुंचल्याचे जग खुणावू लागले. गिरगावात राहणारे वंजारी नामक कमर्शियल आर्टिस्ट यांची भेट झाली. त्यांच्याकडून कलेविषयी जुजबी ज्ञान जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी दिशा दाखवली. त्यानुसार साहित्य संघ मंदिरालगत असलेल्या ‘इंडियन आर्ट इन्स्टिट्यूट’मधून चित्रकलेचा एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स पूर्ण केला. याचदरम्यान वडिलांची नोकरी गेल्याने आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला. मात्र, न डगमगता मित्रांच्या मदतीने चित्रकलेतील पुढील उच्चशिक्षण एल. एस. रहेजा कला महाविद्यालय येथून पूर्ण केले. चार वर्षांचा ‘अप्लाईड आर्ट डिप्लोमा’ केला. पुढे जे. जे. कला महाविद्यालयामधून ‘आर्ट टिचर डिप्लोमा’ तसेच ‘आर्ट मास्टर’चे शिक्षण पूर्ण केले. मधल्या काळात चित्रांची छोटी-मोठी कामे करून गुजराण सुरूच होती. डोंबिवलीत बहिणीच्या घरी काही दिवस काढल्यानंतर वडिलांनी भांडुपच्या चाळीत स्वतःचे घर घेतले.
 
 
कुंचल्याच्या अदाकारीमुळे खोत ‘श्री’ साप्ताहिकात आर्टिस्ट म्हणून रूजू झाले. मुखपृष्ठ, चित्रे, अर्कचित्रे, अक्षर, सुलेखन करताना १९८७ क्रिकेट विश्वकप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कपिल देव यांचे अर्कचित्र खोत सरांनी काढले होते, जे ‘श्री’ साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाले.पोलिसांच्या ‘दक्षता’ मासिकाचेही काम केले. अशीच चार-पाच वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतःचे काही तरी घडवावे यासाठी नोकरी सोडून मुक्त चित्रकार म्हणून खोत काम करू लागले. दरम्यान, वृत्तपत्रातील जाहिरात पाहून ठाण्यातील हिंदी माध्यमातील शाळेत कला शिक्षक या पदासाठी अर्ज केला. अनेकजण स्पर्धेत असतानाही १९८७ साली या नोकरीसाठी पात्र ठरले. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांचा विवाह झाला आणि ते ठाणेकर बनले. शाळेत २० वर्षे सेवा बजावताना त्यांनी अनेक सभा, संमेलने तसेच विविध कार्यक्रमांतून आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चित्रकलेचा प्रसार व प्रचार सुरूच ठेवला. गणेशोत्सवातील सजावट आदी नेपथ्य साकारतानाही पर्यावरण रक्षणाचा संदेश, समुपदेशन आदी उपक्रम राबवल्याचे खोत सांगतात.
 
 
आपल्याबरोबर विद्यार्थ्यांच्या कलेचा विकास कसा होईल, याकडे खोत सर यांचा नेहमी कटाक्ष असे. चित्रकलेव्यतिरिक्त खोत सरांना अभिनयाची आणि गायनाची आवड. क्रिकेट, कबड्डीसारख्या मैदानी खेळात त्यांना रुची आहे. लेखनाचीही आवड असल्याने कुंचल्याने काढलेल्या अर्कचित्रासोबत सुलेखनाचे आविष्कार दाखवून एखाद्याचे प्रतिमा संवर्धन करण्यात खोत सरांचा हातखंडा. अनेक राजकीय नेत्यांच्या छबी खोत सरांनी कुंचल्याच्या आधारे ’हटके’ साकारल्या आहेत. चित्रकलेतच कारकिर्द करण्याचा निर्धार केल्याने खोत सरांनी मागे वळून पाहिले नाही. चित्रकलेची प्रेरणा नातलग असलेले प्रख्यात कलादिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांच्याकडून मिळाली. यांचा पुतण्या निशिकांत आचरेकर हे वडिलांचे मावसभाऊ असल्याने सुट्टीत गावी आल्यावर त्यांच्याशी हितगुज वाढले. निशिकांतकडून चित्रकलेतील अनेक बारकावे त्यांना शिकता आले.
 
 
ठाण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आणि २०१४ सालच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे बोधचिन्हही खोत यांनीच साकारले. नाट्य संमेलनात तर खोत यांनी चितारलेल्या रंगभूमीवरील नामवंत नाट्य कलावंतांच्या अर्कचित्रासाठी खास दालन देण्यात आले होते. ठाणे महापालिकेचे ‘ठाणे गुणीजन’,‘ठाणे गौरव’ या पुरस्कारांवर नाव कोरलेल्या खोत सरांना ठाणे-मुंबईसह कोकण व महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांनीही गौरवले आहे. कलेच्या माध्यमातून समाजाला जितक देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न अखेरच्या श्वासापर्यंत करणार असल्याचा मानस व्यक्त करणार्‍या खोत सरांना भविष्यात कोकणात गावी जाऊन शेती करण्याची इच्छा असल्याचे ते सांगतात.
 
 
कलेची सेवा करीत असताना समाजसेवा व संस्थात्मक कामातही खोत सरांनी कधी हात आखडता घेतला नाही. कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करणारे कलासक्त सतीश खोत यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0