समृद्धी महामार्गावर धावले काळवीट; तज्ज्ञ समितीच्या सूचनांची अंमलबजावणी नाही ?

22 Jun 2022 12:31:29
Samru
 
 
 
 
मुंबई(उमंग काळे): मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर दोन काळविटे धावतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वर्धा ते वाशीम या भागात छायाचित्रीत करण्यात आला आहे. महामार्गावरील वन्यजीवांसंदर्भातील उपयोयजना करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने या भागात काही उपाययोजना सूचवल्या होत्या. मात्र, या सूचनांची पूर्तता झाल्याचा कोणताही अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समितीला अजूनही सादर करण्यात आलेला नाही.
 
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा सुमारे ७०५ किमीचा आहे. या महामार्गावरील ११० किमीचा पट्टा हा वन्यजीव अधिवासातून जातो. यामध्ये काळविट, निलगाय, चिंकारा, वाघ, बिबट्या या मोठ्या वन्य प्राण्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये मानव - वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजे होते. त्यानुसार राज्य वन्यजीव बोर्डाने या बाबत एका तज्ज्ञ समितीचे गठन केले होते. या समितीने विविध उपाययोजना 'एमएसआरडीसी'ला सुचवल्या होत्या. यामध्ये महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास आणि अंडरपास बांधण्याचे सूचना समितीने दिल्या होत्या. मात्र, या सूचनांची पूर्तता झाल्याचा कोणताही अहवाल अद्याप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळालेला नाही. त्याच बरोबर तज्ज्ञ समितीची कोणतीही पाहणी भेट ठरवण्यात आली नाही.
 

या योजनांमध्ये ओव्हरपास आणि अंडरपासची निर्मिती करणे, बिबटे रोधक कुंपण लावणे इत्यादी योजनांचा समावेश आहे. अशामध्ये या महामार्गाचे उद्घाटन करण्याचा देखील घाट दरम्यानच्या काळात घालण्यात आला होता. परंतु, जोपर्यंत या उपाययोजनांची संपूर्ण अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत मानव-प्राणी संघर्ष टाळणे कठीण होईल. यामुळे प्राण्यांचा नाहक बळी जाण्याची शक्यता आहे.
 
 
"समृद्धी महामार्गावर काळवीट धवतांनाचा व्हिडिओ आपणही पहिला आहे. वन्यजीव उपशमन योजना तज्ञ समितीद्वारे सुचविण्यात आल्या आहेत.त्याची पूर्तता झाली की नाही याबाबतचा प्रगती अहवाल अद्याप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तज्ज्ञ समितीस प्राप्त झालेला नाही. उपाययोजना राबविण्यात काही त्रुटी राहिल्या काय हे प्रत्यक्ष भेटीदरम्यान समितीद्वारे पाहण्यात येईल. उपाययोजनांना समितीची भेट आयोजित करण्याची विनंती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना आम्ही केली आहे." - किशोर रिठे, सदस्य, तज्ञ समिती, समृद्धी महामार्ग
Powered By Sangraha 9.0