शारीरिक आणि मानसिक आरोग्यवृद्धीसाठी योग

    21-Jun-2022
Total Views |
 
 
yoga 112
 
 
 
योगाचे उच्चतम उद्दिष्ट हे आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी आहे, ज्ञानाप्राप्ती आहे. ही संकल्पना जरी गूढ भासत असली, तरी योगी हे करताना अनेक दिवस वा आठवडे त्यांना ध्यान करावे लागते. यासाठी जबरदस्त शारीरिक आरोग्य, ऊर्जा आणि स्वत:ला कणखरपणे टिकवून ठेवण्याची क्षमता गरजेची असते. शारीरिक फायद्याशिवाय योगामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या तणावाचे नियोजन करता येते. तणावामुळे शरीरावर पाठीच्या समस्या, डोकेदुखी, निद्रानाश, व्यसनाची सवय आणि मनाची चलबिचल होत असते. याशिवाय तणावामुळे आधुनिक काळातील जीवनशैलीविषयक समस्या आपण आज अनेक पटीने वाढलेल्या पाहतो. ध्यान व प्राणायामाचा समावेश करून व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारता येणे शक्य आहे.
 
 
आज दि. २१ जून. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने संयुक्त राष्ट्राने या दिवसाला मान्यता दिली. त्यांच्या तत्कालीन भाषणात मोदींनी योगाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण विचार मांडले होते. ते म्हणाले होते की, “योग हा मानव आणि निसर्ग यामधील सामंजस्याचा दुवा आहे. आरोग्य आणि व्यक्तिगत कल्याणाचा एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे. आपले जीवन बदलून आणि सजगता निर्माण करून आपले कल्याण कसे साधावे, याचे ज्ञान आपल्याला योगसाधनेतून मिळवता येते.”
 
शारीरिक पातळीवर योग आणि त्यांच्या शुद्धीकरण पद्धती विविध विकारांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. शरीराची लवचिकता वाढविणे, सांधे-अस्थिबंधन यांना मजबूत करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, शरीराची उत्तम देखरेख व मन यामध्ये उल्लेखनीय सामंजस्य साध्य करणे शक्य आहे. योगाचे उच्चतम उद्दिष्ट हे आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी आहे, ज्ञानाप्राप्ती आहे. ही संकल्पना जरी गूढ भासत असली, तरी योगी हे करताना अनेक दिवस वा आठवडे त्यांना ध्यान करावे लागते. यासाठी जबरदस्त शारीरिक आरोग्य, ऊर्जा आणि स्वत:ला कणखरपणे टिकवून ठेवण्याची क्षमता गरजेची असते.
 
शारीरिक फायद्याशिवाय योगामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या तणावाचे नियोजन करता येते. तणावामुळे शरीरावर पाठीच्या समस्या, डोकेदुखी, निद्रानाश, व्यसनाची सवय आणि मनाची चलबिचल होत असते. याशिवाय तणावामुळे आधुनिक काळातील जीवनशैलीविषयक समस्या आपण आज अनेक पटीने वाढलेल्या पाहतो. ध्यान व प्राणायामाचा समावेश करून व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारता येणे शक्य आहे. प्राचीन काळापासून ध्यानाचा उपयोग तणावाचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य सक्षम सजगता प्राप्त करण्यासाठी आणि आरोग्य सक्षम करण्यासाठी केला गेला आहे. यासाठी आज जागतिक पातळीवर संशोधन करत अनेक पुरावे सादर केले जात आहेत.
 
जेव्हा अचानक अनेकजटील गोष्टींचा सामना करायची वेळ येते, तेव्हा काही मिनिटे ध्यान केल्यावर मन शांत तर होतेच, पण मनाची एकाग्रताही वाढू शकते. ध्यानाच्या साधनेतून व्यक्तीची रोगप्रतिकारक ताकदही वाढू शकते. महर्षी पतंजलींनी यौगिक आसनांचा परिचय करून दिलाच. आपल्याला त्याप्रमाणेच गौतम बुद्ध यांनी आपल्याला महत्त्व विशद करून दिले आहे. ध्यानाचे व्यापक फायदे माणसाला होतात, हे दाखविणारे अनेक पुरावे आहेत आणि नैराश्य, चिंता आणि तणावासंबंधित आजारांवर ध्यानाचा यशस्वी असा शास्त्रीय प्रयोग झालेला आहे. अमेरिकेतील ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’मधील संशोधकांनी अलीकडेच असा शोध लावला आहे की, योग आणि ध्यान याचा दीर्घकालीन अभ्यास केलेल्यांमध्ये अनेक रोगाशी लढू शकणारे ‘जिन्स’ सक्रिय असतात. त्यांना असेही दिसले की, वंध्यत्व, उच्च रक्तदाब, संधिवात आणि वेदना यांसारख्या विकारांवर संरक्षक म्हणून असणारी जनुके योगप्रभावाने प्रेरित होतात.
 
ध्यान तशी एक लगेच न उमजणारी प्रकिया आहे आणि सुरूवातीला ती खूप कठीण वाटते. व्यक्तीने स्वतःहून रस घेतल्याशिवाय ध्यानधारणा होत नाही. सुरुवाती-सुरुवातीला ती खूप क्लिष्ट वाटते. पण, आपल्या दैनंदिन जीवनातील मागण्यांपासून जाणीवपूर्वक थोडा वेळ बाजूला काढून ध्यानात आपले मन स्वच्छता व सक्षम करणे हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मानसिक आरोग्य सर्वसामान्यपणे सकारात्मक मानले जाते. किंबहुना, आज सकारात्मक मानसिक आरोग्य ही संकल्पना जगभर प्रचलित आहे. एखादी व्यक्ती योगाच्या अनुभूतीने मानसिक आरोग्याचा उच्च पातळीपर्यंत पोहोचू शकते. जेव्हा आपण योग करतो तेव्हा आपल्या मेंदूतील असंख्य पेशी नवनवीन ‘कनेक्शन’ विकसित करतात.
 
मेंदूच्या संरचनेत तसेच त्याच्या कार्यामध्ये बदल घडवतात, ज्यामुळे मेंदूची संज्ञानात्मक कौशल्ये सुधारतात; जसे की, नवीन गोष्टी शिकणे वा स्मरणशक्ती सक्षम होणे, साहजिकच मेंदूतील विश्लेषणात्मक वा स्मरणशक्तीशी निगडित असलेले भाग मजबूत होतात, जे लोक नियमित योग, प्राणायाम वा ध्यानधारणा करतात, त्यांच्या मोठा मेंदूचा भाग उदा. ‘हिप्पोकॅम्पस योग’ न करणार्‍या व्यक्तीपेक्षा जास्त विकसित झालेले आढळतात. वृद्धामध्ये नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक रोगांवर योगाच्या अभ्यासाने आराम मिळू शकतो आणि हा आराम दीर्घकाळ टिकून राहिलेला दिसतो. एकंदरीत योगाच्या अभ्यासाने लवचिक शरीराबरोबर लवचिक मनाचा लाभ होतो, ज्यामुळे मानसिक आरोग्य सक्षम बनते.
 
 
 
 
 लेखक: डॉ. शुभांगी पारकर
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.