शिवसेना युतीत सडली की आघाडीत ?

21 Jun 2022 20:11:58
 

हिंदूहृदयसम्राट यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेसमोर कधी नव्हे तो इतका मोठा पेच निर्माण झालयं. तो एका शिवसैनिकामुळेच... राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंनी बंड २० आमदारांसह पुकारले आणि संपूर्ण ठाकरे सरकार हादरलं. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. खुद्द शरद पवारांनाही आता सरकार हातचं जाणार याची जाणीव झालीयं. कारण विधान परिषदेचं मतदान पार पडलं आणि दुपारपासूनच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. सकाळी त्यांचा फोन लागत नव्हता. मात्र, गुजराती भाषेत कॉलर टयुन ऐकू येऊ लागल्यानं ते गुजरातला गेले असावेत असा कयास बांधला गेला. शेवटी ते सुरतच्या ग्रॅण्ट भगवती ह़ॉटेलवर ११ आमदारांसह असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. हे सगळं  एका रात्री घडलं का?, याच आठवड्यात ५६ वा वर्धापन दिन साजरा करणारी शिवसेना कशी दुभंगली?. शिंदे नाराज झाले की, त्यांनी बंडंच केलायं या सगळ्याचा शेवट नेमका काय होईल? जाणून घेऊयात महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या सगळ्या मोठ्या हाय वोल्टेज ड्राम्याबद्दलची बित्तम बातमी... 

एकनाथ शिंदेंनी परतीचे दोर कापून टाकल्याचे चित्र असल्याने आता ठाकरे सरकार डळमळीत झाल्यची पूरती कल्पना शिवसेनेला आलीयं. शिवसैनिकांनी घोषणा देत आम्ही एकत्र असल्याचा दावा जरी केला असला तरीही त्यांच्या डोळ्यातील पाणी सगळं काही सांगून जातं होतं. कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या गादीवर ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून बसली होती. मात्र, त्यांच्याच खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी एक कट्टर शिवसैनिक कारणीभूत ठरल्याने आता खुद्दी माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या डोळ्यातही पाणी तरळंतं होतं. एरव्ही सर्वांना फैलावर घेणाऱ्या पेडणेकर आज मात्र, नरमल्या होत्या.


आता शिवसेनेतील शिंदेंनी सोबत नेलेल्या आमदारांना घेऊन भाजप सत्ता स्थापन करणार का ? आकडेवारी नेमकं काय सांगते याकडे लक्ष टाकूयात. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी १४५ हा जादुई आकडा गाठणं गरजेचं आहे. मात्र भाजपकडे १०६ आमदार आहेत. तर ७ अपक्ष आमदार असे मिळून ११३ आमदारांचे पाठबळ आहे. मात्र विधान परिषद निवडणुकांनंतर भाजपकडे १३४ आमदारांचे समर्थन असल्याचे आकडेवारी सांगते. यावरूनच भाजपकडे अतिरिक्त २१ आमदारांचे समर्थन आहे. हाच आकडा कायम राहिल्यास भाजपला ११ आमदारांच्या समर्थनाची आवश्यकता आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत २६ आमदार सुरतमध्ये असल्याचे कळते आहे. त्यामुळे हा आकडा १३९ होतो. मनसेचे समर्थन मिळाल्यास भाजपला मनसेच्या एका आमदाराचे पाठबळ मिळेल आणि शिंदे गट असे मिळून हा आकडा १४० पर्यंत जाईल. तर विधानपरिषद निवडणुकांचा आकडा पाहता जर १३ अपक्षांनी भाजपसोबत जाणे पसंत केले असेल तर एकनाथ शिंदे गट आणि मनसे मिळून भाजप १४६ हा जादुई आकडा सहज गाठू शकते

.

या सगळ्या नाराजी नाट्याचा मार्ग शेवट देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जातोयं. फडणवीसांनी विधान परिषद विजयानंतर दिलेली प्रतिक्रीया पुरेशी बोलकी होती. त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला मतदान करणाऱ्या सर्वच पक्षातील आमदारांचे आभार... फडणवीसांचा करिश्मा दहा दिवसांत दुसऱ्यांदा दिसला. मात्र, एकनाथ शिंदे सुरतला गेल्याच्या बातमीनं सरकार कोसळलं की काय, अशी पहिली प्रतिक्रीया सर्वच राजकीय मंडळींची होती. 



२०१९च्या निवडणूकीत शिवसेना-भाजप महायुतीला जनतेने स्पष्ट कौल दिला होता. भाजपने शिवसेनेला जागा सोडून महाराष्ट्रावर दुसऱ्यांदा महायुतीचा मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस विराजमान होणार होते. मात्र, जादूई आकड्याच्या जवळ पोहोचत असतानाही आणि स्वतःच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा निम्मी असतानाही उद्धव ठाकरेंनी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची अट ठेवली. शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेत बसवायचायं, असं वचन दिल्याचंही उद्धव ठाकरे म्हणालेत. सत्तेत असतानाही वारंवार देवेंद्र फडणवीस आणि भाजपलाही कमीपणा दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. सोशल मीडिया आय़टी सेलद्वारे फडणवीसांच्या वैयक्तीक गोष्टींवर टीका टीपण्णी करण्यात आली. काहींनी तर पातळी सोडली. मात्र, फडणवीसांनी आपला संयम कायम ठेवला.



महाविकास आघाडी पुढील २५ वर्षे सत्तेत राहील, असा दावा करणाऱ्या मोठ्या नेत्यांचेही आज धाबे दणाणले आहेत. मविआचे शिल्पकार असलेल्या शरद पवारांनीही हात वर करत हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. या सगळ्यात उद्धव ठाकरेंचं एक वाक्य नक्की आठवतंयं ते म्हणजे भाजपसोबत २५ वर्ष युतीत सडली. ज्या मित्रपक्षानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या हातात हात घालून पार दिल्लीपर्यंत पायघड्या घातल्या. मात्र, त्यांच्याच सोबत सत्तेत निवडून आल्यावर मात्र, वैचारिक विरोधकांसोबत जाऊन संसार थाटला. आता अडीच वर्षांत असं काय झालंयं की शिवसेनेवर अशी वेळ आली याचा विचार पक्षनेतृत्व नक्की करेल. 

आता दुसरीकडे काँग्रेस आपले आमदार फूटू नये यासाठी खबरदारी घेत आहे. मविआतील आमदारांवर नेत्यांचा अविश्वास इतका आहे की प्रत्येकाचं मुंबईत येईपर्यंत लोकेशन ट्रेस केलं जाणार होतं. राष्ट्रवादीतील आमदार आहेत तिथेच आहेत. मात्र, फुटलेल्या आमदारांचा पक्ष कोणता असा प्रश्न येतो तेव्हा उत्तर हे शिवसेना, असंच मिळतंयं. महाराष्ट्रातील या हायवोल्टेज ड्राम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ठाकरे सरकार राहणार की जाणार? मुख्यमंत्री कुणाचा होणार? कोण कुणाबरोबर सडलं? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Powered By Sangraha 9.0