प्रतीक्षानगरवासीयांची मुंबई पालिकेच्या कामावर नाराजी

20 Jun 2022 15:42:29

pratikshanagar.png
 
 
 
 
 
 
मुंबई : शीव मतदारसंघातील प्रतीक्षानगर भागातील रहिवाशांनी प्रभागात केल्या जाणार्‍या नालेसफाईच्या कामावरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी वरुणराजाने आगमन केले असून अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. मुंबईतदेखील रविवारपासून मान्सूनचे जोरदार आगमन होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्यामुळे शहरातील पाणी साचण्याच्या आणि नाले तुंबण्याच्या घटनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महापालिकेने काही दिवसांपूर्वी शहरातील नालेसफाईची आकडेवारी प्रसिद्ध केली असली, तरी प्रतीक्षानगरमधील रहिवाशांनी नालेसफाईचे दावे फेटाळले आहेत. त्यामुळे महापालिकेने केलेले नालेसफाईचे दावे किती खरे आणि किती खोटे, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
 
 
 
नुसती आश्वासने देऊ नयेत
 
प्रभागामध्ये नालेसफाईसोबतच सार्वजनिक शौचालयांचाही मुद्दा तसाच प्रलंबित आहे. अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींकडे या संदर्भात तक्रारी देऊन, पाठपुरावा करूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. विशेषतः सार्वजनिक मुद्द्यावरून वारंवार चर्चा करूनही त्यावर केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीही मिळालेले नाही. जर स्थानिक लोकप्रतिनिधींना काही करायचे असेल, तर त्यांनी करावे. नुसती आश्वासने देऊ नयेत, अशी आमची मागणी आहे.
- संतोष दूधभाते, स्थानिक रहिवासी, प्रतीक्षानगर
 
 
 
महापालिकेचे नालेसफाईबाबतचे दावे खोटे!
 
आमच्या घरासमोरील नाल्यातून वारंवार पाणी बाहेर येते, ही वस्तुस्थिती आहे. महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने नालेसफाईच्या संदर्भात आम्ही पाठपुरावादेखील केलेला आहे. मागील आठ ते नऊ महिन्यांपासून आम्हाला या समस्येचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने नालेसफाईच्या बाबतीत केलेले दावे खोटे आहेत, असा आमचा दावा आहे. त्यामुळे आमच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी आमची अपेक्षा आहे.
- पुष्पा ढमाले, स्थानिक रहिवासी, प्रतीक्षानगर
 
 
 
लवकरच आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने नालेसफाई
 
प्रतीक्षानगरमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी स्थानिक नगरसेवक म्हणून सदैव कार्यरत आहे. या भागातील नालेसफाईसह अनेक विषयांवर मी महापालिकेत आवाज उठवलेला आहे. ज्या नाल्याची चर्चा केली जात आहे तो नाला ’म्हाडा’अंतर्गत येतो. तरीही त्याची साफसफाई करण्यासाठी आम्ही सातत्याने कामे केली आहेत. लवकरच आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने नालेसफाई केली जाणार आहे. कुणीही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये.
- रामदास कांबळे, स्थानिक माजी नगरसेवक, शिवसेना
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0