मुंबई(प्रतिनिधी): सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात एक किंग कोब्रा मृत अवस्थेत आढळून आला आहे. वन विभागाला याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन या सापाला ताब्यात घेण्यात आले. या सापाचे डोके कोणी तरी ठेचल्याचे दिसून आले.
किंग कोब्रा' सापाला 'नागराज' असे म्हटले जाते. दोडामार्ग तालुक्यात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणतात. हा साप विषारी असून तो लांबीने साधारण २० फूटांपेक्षा अधिक वाढतो. कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये हा साप प्रामुख्याने आढळतो. पश्चिम घाटामधील 'किंग कोब्रा'च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग तालुका आहे. या तालुक्यातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत. हा साप मोठा असल्याने त्याला मारून टाकले जाते.त्यातच आता ही घटना समोर आली आहे.
जनजागृतीची आवश्यकता
दोडामार्ग तालुक्यामध्ये यापूर्वी 'किंग कोब्रा' दिसल्याच्या नोंदी आहेत. 'तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा'मध्ये या सापाचा प्रामुख्याने अधिवास आहे. मात्र, या सापाच्या भितीपोटी त्याला मारुन टाकण्याचे प्रकार याठिकाणी घडतात. गेल्या दीड वर्षांमध्ये ३२ वेळा 'किंग कोब्रा' आढळल्याचे आणि तीन ठिकाणी त्याला मारल्याच्या नोंदी आम्ही केल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली. यापार्श्वभूमीवर 'सर्प इंडिया'च्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात या सापाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, किंग कोब्राच्या छायाचित्र काढण्याच्या हौशीपोटी याठिकाणी येणाऱ्या वन्यजीव छायाचित्रकारांवर नजर ठेवणे आवश्यक आहे. तसेच या सापाला मारणाऱ्या लोकांवरही 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे