मुंबई(प्रतिनिधी): राज्यातील विविध पर्यावरण विषयक मुद्द्यांवर काल दि. १७ रोजी वर्षा या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील डोंगर रांगांमध्ये विविध रंगी फुलझाड 'व्हॅली' तयार करता येऊ शकेल का यावर अभ्यास करण्याचे निर्देश वन विभागाला दिले.
वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या रंगांची, फुलांची झाडं फुलतात, महाराष्ट्रातील अशा काही डोंगर रांगामध्ये वृक्षलागवड करतांना अशा स्थानिकरित्या फुलणाऱ्या विविध रंगांच्या वृक्षांची, विविध फुलांच्या वृक्षांची “व्हॅली”तयार करता येऊ शकेल का याचाही वन विभागाने अभ्यास करावा. असे करतांना येथेही पक्ष्यांची अन्नसाखळी अबाधित राहील, तिथे वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर वाढेल हे पहावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दि. १७ रोजी दिले. या वेळेला डोंगरांवर पूर्वी सलग समतल चर खोदून पाणी अडवण्याची व्यवस्था केली जात असे. जलसंधारण आणि रोजगार हमी विभागाबरोबर वन विभागाने संरक्षित वन क्षेत्रात असे सलग समतल चर खोदण्याची कामे मोठ्याप्रमाणात हाती घ्यावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या.
या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, नवी दिल्लीचे प्रादेशिक सेना महासंचालक लेफ्टनंट जनरल पी.एम.सिंग, औरंगाबादच्या इको बटालियनचे कमांडिंग ऑफीसर प्रादेशिक सेनेचे (इकॉलॉजी) कर्नल मन्सुर अली खान, यांच्यासह वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हवाई बीज पेरणी
वृक्षांची हवाई बीज पेरणी करतांना जिथे लोकांचे येणे जाणे कमी आहे, नैसर्गिकरित्या त्या बीजाला आणि रोपांना पाणी मिळू शकेल, पुरेशी माती उपलब्ध असेल अशी स्थळे निवडण्यात यावीत. ज्या डोंगरावर वरच्या बाजूला सपाट जागा उपलब्ध आहे तिथे छोटे तळे घेऊन पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवता येईल का याचा वन विभागाने विचार करावा जेणेकरून डोंगरावर लावलेल्या रोपांना सोलर पंपाच्या सहाय्याने, सुक्ष्म सिंचन पद्धतीने पावसाळ्यानंतरही पाणी देता येऊ शकेल. वन विभागाने यावर्षी त्यादृष्टीने असा पथदर्शी कार्यक्रम तयार करून अंमलात आणावा, असे मुख्यमंत्री म्हणाले
स्थानिक प्रजातींची रोपे लावा
हवाई बीज पेरणी असो, इको बटालियन मार्फत करण्यात येणारी वृक्षलागवड असो किंवा वन विभाग आणि लोकसहभागातून होणारी वृक्षलागवड असो ती करतांना स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करावी. ही लागवड करतांना पक्ष्यांची अन्नसाखळी विकसित होईल यादृष्टीने जाणीवपूर्वक लक्ष दिले जावे.