रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे मानवतेचे सेवक म्हणजे ठाण्यातील डॉ. विजयकांत पुरुषोत्तम सेवक. त्यांच्या कार्यसेवेचा आढावा घेणारा हा लेख...
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील पातुर्डा खेडेगावी दि. २० जानेवारी, १९७१ साली डॉ. विजयकांत सेवक यांचा जन्म झाला. आई-वडील, दोन भाऊ, एक बहीण असे षटकोनी कुटुंब.थोडी शेती आणि गावातच वडिलांचे किराणा दुकान, यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. त्यामुळे डॉ. सेवक यांचे बालपण तसे खडतर परिस्थितीत गेले. वडिलांचा योग अभ्यास दांडगा असल्यामुळे गावात संस्कार केंद्र चालवत शिवाय गावात ग्रंथालयही सुरू केले होते. वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्याने घरात संघ विचारांचा पगडा होता. गावातील सरकारी शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शेगावच्या कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेतले. वडीलही गावात घरगुती वैद्य म्हणून मोफत आयुर्वेदिक औषधे व उपचार करीत. त्यामुळे वैद्यकशास्त्राकडे वळण्याचे बाळकडू लहानपणीचमिळाल्यामुळे विजयकांत यांचे पुढील ध्येय निश्चित झाले.
डॉक्टर बनण्याच्या निर्धाराने गावापासूनदूर ४० किमी खामगाव तालुक्यातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन ‘डीएचएमएस’ ही पदवी मिळवली. यासाठी बरेच कष्ट उपसले.ग्रंथालयात राहून अभ्यास केला. सुट्टीत गावोगावी चहापावडर विकून शिक्षणाच्या खर्चाची बेगमी केली. पुस्तके घ्यायलाही पैसे नव्हते. कोट (ब्लेझर) घ्यायलाही पैसे नसल्याने महाविद्यालय प्रतिनिधी (सी आर) चे पद हुकल्याची हुरहुर डॉ. सेवक व्यक्त करतात. तरी जिद्द सोडली नाही. त्यावेळी गायत्री परिवाराच्या माध्यमातून संघाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग असायचा. डॉक्टर झाल्यानंतर १९९४ मध्ये विदर्भ सोडून थेट मुंबई गाठली. ठाण्यात रुग्णालयांमध्ये काम सुरू केले. त्याकाळी राहायला जागा नव्हती म्हणून तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत २४ तास तीन शिफ्टमध्ये काम करून वास्तव्याची भ्रांत मिटवली. हळूहळू दिवस बदलले, थोडे पैसे जमा करून १९९५ साली ठाण्यातच बस्तान मांडण्याचे ठरवले.
वडिलांच्या परिचिताच्या माध्यमातून एका दवाखान्यात बदली डॉक्टर म्हणून सेवा देत असताना एका सुहृदयी व्यक्तीची ओळख झाली आणि ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यात स्वतःचे क्लिनिक सुरू झाले. पुढे तीन-चार मित्र मिळून पहिले चॅरिटेबल क्लिनिक सुरू केले. परंतु, हा प्रयोग फसला. त्यानंतर २००३ मध्ये ठाण्यातच वागळे इस्टेटमध्ये ‘मानवता चॅरिटेबल हॉस्पिटल’ सुरू केले. ‘सेवा परमो धर्म:’ हे ब्रीद जपत नाममात्र शुल्क आकारून २०१६ पर्यंत रुग्णसेवेचे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवले. ठाण्यातील ‘आरोग्यम हॉस्पिटल’ची मुहूर्तमेढ रोवणार्या डॉ. सेवक यांनी ठाणे रेल्वे स्थानकात ‘आरोग्यम’च्या माध्यमातून पहिले मोफत क्लिनिक सुरू केले. कोरोना काळात कुठलीही भीती न बाळगता त्यांनी आपले क्लिनिक 24 तास सुरू ठेवले होते. शिवाय रुग्णांशी टेलिफोनिक संवाद सुरूच असायचा. ‘कोविड’ रुग्णांचे समुपदेशन करण्यासोबतच अनेकांच्या घरी जाऊनदेखील उपचार केले. तब्बल पाच हजार नागरिकांना ‘आर्सेनिक अल्बम’गोळ्यांचे वाटप केले.
समाजसेवेत रस असलेल्या डॉ. सेवक यांनी होमियोपॅथिक डॉक्टरांना अॅलोपथिक औषधोपचाराची परवानगी मिळावी, यासाठी आंदोलने केली. तत्कालीन केंद्रीय मंत्री भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचीही भेट घेऊन हा लढा यशस्वी केला. त्यानंतर राज्य सरकारने ‘सीसीएमपी’ हा कोर्स महाराष्ट्रात सुरू केला. डॉ. सेवक यांनी २०१८ मध्ये जळगावातून हा कोर्स पूर्ण केला. तसेच, योगशिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर ते ठाणे होमियोपॅथिक सेलचे अध्यक्ष बनले. काही वर्षे ‘लायन्स क्लब’च्या माध्यमातून आरोग्य शिबिरे भरवली. वनवासी पाडे, येऊरमधील आश्रमशाळांमध्ये वैद्यकीय शिबिरे तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेशवाटप असो अथवा पूरस्थितीतील कोल्हापुरात जाऊन आठ दिवस मोफत आरोग्यसेवा पुरवली. डॉक्टरी पेशाच्या माध्यमातून जनसेवेलावाहून घेतलेल्या डॉ. सेवक यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच संघाच्या सामाजिक समरसता मोहिमेतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ‘कोविड’ काळातील सेवेचा गौरव तर अनेक संस्था व मान्यवरांनी केला.
मार्च २००९ मध्ये दिल्लीचे आरोग्यमंत्री, मध्य प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल व ‘सीबीआय’ संचालकांच्या हस्ते ’जनसेवा सदभावना पुरस्कार’ व सुवर्णपदक प्रदान करून डॉ. सेवक यांना गौरवण्यात आले. ब्राह्मण सभेतर्फेही त्यांना सन्मानपत्र प्रदान केले आहे. भविष्यात खूप काही करायचे असल्याचे डॉक्टर सांगतात. आरोग्याच्या सुविधांपासून उपेक्षित असलेल्या समाजाला सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. चॅरिटेबल हॉस्पिटलच्या धर्तीवर छोटी केंद्रे सुरू करायची आहेत. आजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादे सेंटर असावे, जेणेकरून एकट्या दुकट्या राहणार्या ज्येष्ठांना मदतीचा हात देता येईल. नाममात्र भाडे आकारून शवपेट्या घरी पुरवण्याचाही त्यांचा मानस आहे. तसेच, महागड्या चाचण्या स्वस्त दरात पुरवता याव्यात. यासाठी एक अॅप बनवण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. या माध्यमातून खेड्यापाड्यात आरोग्यविषयक माहिती उपलब्धकरण्याचा संकल्प त्यांनी केला आहे, अशा या संवेदनशील, मानवतेच्या सेवकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!