मविआच्या धोरणांमुळे, तमाशा कलावंताच्या पदरी निराशा..

    16-Jun-2022
Total Views | 65
y 
 
 
 
नगर : 40  वर्षांपासून पायात घुंगरू व ढोलकीच्या तालावर ताल धरणाऱ्या तमाशा महिला कलावंत छबुबाई चव्हाण गेल्या वर्षभरापासून सफाईच्या कामातून उदरनिर्वाह करत आहेत. गेली कित्येक वर्ष ३५ लोकांसह तमाशाचा फड चालवून, अनेकांचे घर चालवणाऱ्या छबूताईंवर चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामावर जाण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षांपासून तमाशाच्या माध्यमातून समाजाचं मनोरंजन करणारे लोककलावंत, आज अडचणीत आले आहेत. सरकार त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. त्यांनी पोट भरायचे तरी कसे, हा प्रश्न निर्माण होतो.
 
 
 
कोरोना महामारीने अनेकांच्या उदर्निर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. नाटक, चित्रपट उद्योग हळूहळू स्थिरस्थावर होत आहे. मात्र, अनेक लोककलेसह तमाशाचे फड बंद पडले आहेत. राज्यात लहान आणि मोठे मिळून १३० तमाशा फड असून ४५०० हून अधिक कलावंत यात सहभागी आहेत. मात्र कोरोनामुळे अनेक लहान फडांचे अस्तित्व धोक्यात आले असून, अनेक तमाशा कलावंतांच्या पदरी मिळेल ती नोकरी करण्याची वेळ आली आहे. छबुबाई चव्हाण संगमनेर तालुक्यातील समनापूर या गावातील तमाशा कलावंत व लहान फड मालक आहेत. गेली ४० वर्ष ३५ कलाकारांना घेऊन त्यांनी आपला फड चालवला आणि कोरोना आल्यानंतर आर्थिक संकटामुळे फड बंद करून आज त्यांच्यावर हातात झाडू घेऊन सफाई करण्याची वेळ आली आहे.
 
 
 
सरकार दरबारी अनेकदा मदतीची मागणी करूनदेखील अश्वासानांखेरीज काहीही हाती लागत नसल्याने अनेक लोककलावंतांनी मिळत ते काम स्वीकारले आहे. तमाशा हा लोककलेचा प्रकार म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहे. कोरोनामुळे पूर्वीप्रमाणे गावात होणाऱ्या जत्रा बंद झाल्यात त्याचा परिणाम तमाशा उद्योगावर पडलाय. छबूताईंसारख्या अनेक कलावंतांचा पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष सुरु आहे. राज्यतील अनेक लोककलावंत सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी लवकरात लवकर पाऊल न उचलल्यास महाराष्ट्रातील हे तमाशाचे फड लोप पावतील.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा