पक्षीमित्रांसाठी आनंद वार्ता; अलिबागमध्ये 'या' दुर्मिळ पक्ष्याची नोंद
16 Jun 2022 12:38:15
मुंबई(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील अलीबागच्या अक्षी किनाऱ्यावरून एका दुर्मिळ पक्ष्याची नोंद झाली आहे. नॉर्डमॅनस् ग्रीनशाँक (ट्रिंगा गट्टीफर) या किनारी पक्ष्याचा छायाचित्रीत पुरावा २०२० मध्ये टिपण्यात आला होता. डॉ राजू कसंबे यांनी हे छायाचित्र दि. २१-२३ डिसेम्बर २०२० दरम्यान टिपले होते. या बाबतचा अहवाल त्यांनी नुकताच सादर केला. या पक्ष्याला मराठीत 'नॉर्डमॅनचा हिरवा तिलवा' असे नाव आहे.
दोन वर्षांपूर्वी दि. २१ डिसेंबर २०२० रोजी अक्षी किनाऱ्यावर डॉ. राजू कसंबे आणि वेदांत कसंबे यांना दोन 'नॉर्डमॅनस् ग्रीनशाँक' (ट्रिंगा गट्टीफर) दिसले होते. छायाचित्र टिपताना असा समज होता कि हा पक्षी 'कॉमन ग्रीनशाँक'( (ट्रिंगा नेब्युलेरिया) पक्षी आहे. तसाच रेकॉर्ड 'ई-बर्ड' वर देखील उपलोड करण्यात आला. परंतु जानेवारी २०२१मध्ये या छायाचित्रांची पुनर्तपासणी केली असता, हा पक्षी वेगळा असल्याचे निदर्शनास आले. या पक्ष्याची चोच कॉमन ग्रीनशाँकच्या चोची पेक्षा जाड होती. तसेच चोचीचा काही भाग किंचित वक्र आणि द्वि-रंगी असल्याचे दिसून आले. तर शरीराचा खालचा भाग स्वच्छ पांढरा दिसत होता. तसेच त्यांचे पाय पिवळ्या रंगाचे होते. हे नॉर्डमॅनस् ग्रीनशाँक' (ट्रिंगा गट्टीफर) आकाराने कॉमन ग्रीनशाँक( (ट्रिंगा नेब्युलेरिया) पक्ष्यापेक्षा छोटे आहेत. या पक्ष्याचा एक छोटा व्हिडीओ देखील काढण्यात आला होता. या मध्ये हा पक्षी वाळूतून आपले खाद्य शोधताना दिसून आला. हा व्हिडीओ वेदांत कसंबे यांनी छायाचित्रीत केला आहे. ते सध्या शासकीय पशुवैद्यकीय कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.
(अक्षी किनाऱ्यावर डॉ. राजू कसंबे आणि वेदांत कसंबे)
डॉ राजू कसंबे यांनी 'फेसबुक' ग्रुपवर 'आस्क आयडी ऑफ इंडियन बर्ड्स' छायाचित्र प्रसिद्ध केले होते. तसेच ही छायाचित्रे तज्ज्ञ पक्षी निरीक्षक आदेश शिवकर आणि मयुरेश खटावकर यांना पाठवण्यात आली. जगभरातील बर्याच अनुभवी पक्षी निरीक्षकांनी पुष्टी केली आहे की, हे पक्षी खरोखर नॉर्डमनचे ग्रीनशँक्स आहेत. डॉ सालीम अली आणि रिप्ले यांनी केलेल्या नोंदी नुसार, नॉर्डमॅन्स ग्रीनशँक हा आसाममध्ये हिवाळ्यातील दुर्मीळ पाहुणे आहेत.