शेजारच्या नेपाळमध्ये नुपूर शर्मा यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो हिंदूंनी मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातात ‘वुई सपोर्ट नुपूर शर्मा’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा लिहिलेले फलक होते. नुपूर शर्मा यांच्यावर मुस्लिमांकडून चहूबाजूंनी हल्ला होत असल्याचे दिसत असताना नेपाळमधील हिंदू समाज नुपूर शर्मा यांच्यामागे उभा असल्याचे या निदर्शनांवरून दिसून आले.
भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात भारतातील आणि जगातील काही देशातील मुस्लीम समाज निदर्शने करीत असल्याचे दिसते. भारतात तर गेल्या शुक्रवारच्या नमाजानंतर उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड, प. बंगाल, महाराष्ट्र आदी राज्यांतील विविध शहरांमध्ये नुपूर शर्मा यांच्या विरोधात संतप्त निदर्शने करण्यात आली. तसेच काही शहरांमध्ये तर या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. जाळपोळ, दगडफेक, वाहने पेटवून देणे असे प्रकार काही ठिकाणी घडले. कोणीतरी आदेश दिल्याप्रमाणे देशाच्या अनेक शहरांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने अशा घटना घडल्या. नुपूर शर्मा प्रकरणी भारतीय कायद्यानुसार कारवाई केली जात असताना, या देशात राहणार्या मुस्लिमांनी कायदा हातात घेऊन धुडगूस घालण्याचे खरंतर काहीच कारण नव्हते. पण, देशाच्या विविध भागांत हिंसक निदर्शने करणार्यांचा भारताच्या कायद्यावर, घटनेवर विश्वास नसल्याचेच या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
भारतात मुस्लीम समाजाकडून कायदा हातात घेतला गेल्याचे दिसून आले. पण, आपल्या शेजारच्या नेपाळमध्ये नुपूर शर्मा यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो हिंदूंनी मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातात ‘वुई सपोर्ट नुपूर शर्मा’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा लिहिलेले फलक होते. नुपूर शर्मा यांच्यावर मुस्लिमांकडून चहूबाजूंनी हल्ला होत असल्याचे दिसत असताना नेपाळमधील हिंदू समाज नुपूर शर्मा यांच्यामागे उभा असल्याचे या निदर्शनांवरून दिसून आले. तसेच, समाजमाध्यमांवर नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शविणारे असंख्य व्हिडिओ प्रदर्शित झाल्याचे पाहावयास मिळाले. नेपाळचा राष्ट्रध्वज हाती घेऊन नेपाळी हिंदू समाजमाध्यमांवर नुपूर शर्मा यांना पाठिंबा देत असल्याचे दिसून आले.
नुपूर शर्मा यांना केवळ नेपाळी हिंदूंनीच पाठिंबा दिला, असे नाही तर नेदरलँडचे लोकप्रतिनिधी वाईल्डर यांनीही नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. वाईल्डर यांनी नेहमीच नेदरलँडमधील धर्मांध मुस्लिमांबद्दल कठोर भूमिका घेतली आहे. या डच लोकप्रतिनिधीस जीवे मारण्याच्या धमक्या अनेकदा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कुवेत हे मुस्लीम राष्ट्र असले तरी तेथील कायद्यानुसार जे स्थलांतरित त्या देशात वास्तव्यास आहेत, त्यांना कोणत्याही निदर्शनांमध्ये सहभागी होता येत नाही. पण, नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये अन्य देशांतून आलेले स्थलांतरित मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निदर्शकांविरुद्ध कुवेत सरकार कडक कारवाई करणार आहे. या निदर्शकांना त्यांच्या त्यांच्या मायदेशी पाठविण्यात येणार असून त्यांना पुन्हा कुवेतमध्ये परतण्याची संधी देण्यात येणार नाही. गेल्या १० जून रोजी कुवेतच्या फाहील भागात निदर्शकांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात निदर्शने केली. निदर्शक शर्मा यांच्या निषेधाच्या आणि ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत होते. या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कुवेतमधून कायमची हकालपट्टी करण्यात येणार आहे. आमच्या देशाचा कायदा हा श्रेष्ठ असल्याचे कुवेतने विदेशी निदर्शकांवर कारवाई करून दाखवून दिले आहे. तसेच,संयुक्त अरब अमिरातीमध्येही निदर्शने करणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याने अशा प्रकारांपासून दूर राहावे, असा सल्ला संयुक्त अरब अमिरातीतील पाकिस्तानी दूतावासाने त्या देशातील पाकिस्तानी नागरिकांना दिला आहे.
नुपूर शर्मा प्रकरणी मुस्लीम संघटनांकडून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. पण, विश्व हिंदू परिषदने नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. हिंदू समाजातील अनेक संत-महंतांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. नुपूर शर्मा यांना जे धमकावीत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काशी येथील धर्म परिषदेत करण्यात आली. विश्व हिंदू परिषद, संत - महंत यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा देऊ केल्याचे पाहता नुपूर शर्मा या काही एकट्या पडलेल्या नाहीत हे याद्वारे दाखवून देण्यात आले आहे.
सर्व २६ जागी भाजप विजयी!
आसाममध्ये अलीकडेच कार्बी अंगलाँग स्वायत्त परिषदेच्या निवडणूक झाल्या. या परिषदेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २६ जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. या निवडणुकांचे निकाल पाहता, काँग्रेस पक्षाचा हा सातत्याने झालेला आठवा पराभव आहे. एवढेच नव्हे, तर काँग्रेस पक्षाचे अनेक उमेदवार तिसर्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. भाजपला या निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळाले असल्याने या परिषदेत आता भाजप सत्तेवर येणार आहे. भाजप कार्यकारिणीची बैठक येत्या १४ आणि १५ जून रोजी दिपू येथे होणार आहे. त्यावेळी परिषद निवडणुकीत जो देदीप्यमान विजय मिळाला तो भारतीय जनता पक्ष साजरा करणार आहे. आसाममधील निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सातत्याने होत असलेला पराभव लक्षात घेता, आसामच्या राजकीय पटलावरून लवकरच काँग्रेसचे नामोनिशाण मिटले जाईल, असे आसामचे मंत्री पीयूष हजारिका यांनी म्हटले आहे. भाजपला मिळालेले यश पाहता, आसामच्या जनतेने आणि वनवासी समाजाने काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना नाकारले आहे. भारतीय जनता पक्षावरील आपला विश्वास जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिला आहे, असे या निकालांवरून दिसून येते.
स्वप्ना सुरेशच्या वकिलाविरुद्ध गुन्हा
राजनैतिक दूतावासाच्या माध्यमातून केरळमध्ये सोन्याची तस्करी करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश हिचे वकील कृष्ण राज यांच्याविरुद्ध एर्नाकुलम पोलिसांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या एक पोस्टसंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. ‘केएसआरटीसी’च्या एका बसचालकाच्या धार्मिक भावना दुखविल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, या प्रकरणी स्वप्ना सुरेश हिने भावनिक आवाहन करून, ‘माझ्यासमवेत असलेल्या लोकांना दुखावू नका,’ असे म्हटले आहे. अशा कारवाया करून आपल्याला मुद्दाम एकटे पाडण्याचा प्रयत्न केलाो जात आहे, असा आरोपही स्वप्ना सुरेश हिने केला आहे. “मी माझ्या जबाबावर कायम आहे. माझ्याभोवती असलेल्या लोकांना दुखावू नका. मला मारून टाका म्हणजे सर्व काही संपुष्टात येईल,” असेही तिने म्हटले आहे. केरळमधील सुवर्ण तस्करीचे प्रकरण दि. ५ जुलै, २०१९ रोजी उघडकीस आले होते. राजनैतिक दूतावासाच्या माध्यमाद्वारे १४.८२ कोटी रुपये मूल्याचे ३० किलो सोने तस्करीच्याद्वारे आणले गेले होते. या तस्करीशी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे नाव जोडले गेले आहे.
आता या प्रकरणास एक वेगळे वळण मिळाल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री विजयन यांच्याकडून आपणास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे स्वप्ना सुरेश हिने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून एका व्यक्तीने आपल्याला धमकाविल्याची माहिती तिने दिली. या सुवर्ण तस्करीमध्ये केरळचे मुख्यमंत्री विजयन, त्यांची पत्नी आणि मुलगी सहभागी असल्याचे स्वप्नाने अलीकडेच न्यायालयास सांगितले होते. आपल्या जीवास धोका असल्याचे सांगणारी १६४ निवेदने आपण यापूर्वीच न्यायालयास दिली आहेत, अशी माहिती स्वप्नाने दिली आहे. सुवर्ण तस्करीचे प्रकरण सध्या केरळमध्ये गाजत आहे. मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्य सचिव एम. शिवशंकर यांच्यासह अनेक बडी धेंडे या प्रकरणात गुंतली आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री विजयन अडकणार की सहीसलामत सुटणार, याकडे जनतेचे लक्ष आहे.