मुंबई(प्रतिनिधी): नाशिकमध्ये मार्च महिन्यात सापडलेली बिबट्याची तीन पिल्ले आज दि. १० जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहेत. पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेटीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांना पुढील देखलभालीकरिता मुंबईत पाठवण्यात आले. ही पिल्ले साडे तीन महिन्यांची असून त्यामध्ये दोन मादी आणि एक नर पिल्लाचा समावेश आहे.
नाशिकमधील उसाच्या शेतात मार्च महिन्यात बिबट्याची तीन पिल्ले बेवारस अवस्थेत सापडली होती. नाशिक वन विभाग आणि इको इको फाउंडेशने या पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवण्याचे प्रयत्न केले. तब्बल १५ दिवस हे प्रयत्न सुरू होते. परंतु हे प्रयत्न अयशस्वी ठरले. या नंतर या पिल्लांना पुण्याच्या रेस्क्यू संस्थेकडे देखभालीकरिता पाठविण्यात आले. पण आज दि. १० जून रोजी त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आले. पुढील महिनाभर या पिल्लांची रुग्णालयात काळजी घेऊन त्यानंतर त्यांना उद्यानातील बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात येणार आहे. केंद्रात आता तीन बिबट्यांची भर पडणार असल्याने बिबट्यांची एकूण संख्या २० वर गेली आहे.
महाराष्ट्रात बिबट्यांच्या पिल्लांचा त्यांच्या आईशी पुनर्भेटीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यास, त्यांना बिबटा निवारा केंद्रात दाखल करण्यात येते. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जुन्नर येथील माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र, आणि नागपूर मधले गोरेवाडा बचाव केंद्र, या तीन ठिकाणी पिल्लांच्या गरजेनुसार त्यांना दाखल केले जाते. यानंतर त्यांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी घेतली जाते.