आता महाराष्ट्रात होणार समुद्री प्रवाळांचे संवर्धन!

10 Jun 2022 15:11:45
Coral
 
 
मुंबई(प्रतिनिधी): महराष्ट्रातील धोकाग्रस्त प्रवाळ 'कोरल' आणि संबंधित परिसंस्थांचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यात येणार आहे. वनविभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलने गुरुवारी दि. ९ सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ)ची या अभ्यासासाठी नियुक्ती केली आहे. या अभ्यासाद्वारे प्रवाळांचा पुनर्संचय कसा करता येईल यावर भर देण्यात येणार आहे.
 
 
कोरल, म्हणजेच हे प्रवाळ मूलतः वनस्पतींची वैशिष्ट्ये प्रदर्शित करतात. परंतु, ते समुद्री प्राणी आणि जेलीफिशचे नातेवाईक आहेत. त्यातील कोरल पॉलीप्स हे लहान, मऊ शरीराचे जीव असतात. कोरल रीफ हे पाण्याखालील शहरांसारखे आहेत. आणि सागरी जीवनाला आधार देतात. प्रवाळ खडक समुद्र आणि किनारपट्टी दरम्यान लाटांचा प्रभाव रोखण्यास देखील मदत करतात. यामुळे ते किनारपट्टीची धूप कमी करतात. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार, हे प्रवाळ 'कोरल' किमान अर्धा अब्ज लोकांना अन्न सुरक्षा आणि उपजीविका प्रदान करतात.
 
 
भारतात त्यांना वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची एक अंतर्गत संरक्षण मिळाले आहे. हवामान बदल हा 'कोरल'साठी सर्वात मोठा धोका आहे. वाढत्या तापमानामुळे या प्रवाळांचे 'ब्लिचिंग' होत आहे. या प्रक्रियेत वाढत्या तापमानाच्या प्रभावामुळे प्रवाळांमधील रंग देणारे शैवाल नाहीसे होते. आणि पूर्ण परिसंस्थेवर परिणाम होऊन हे कोरल मरण पावते. 'भारत-युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम-ग्रीन क्लायमेट फंड' प्रकल्पांतर्गत ‘भारताच्या किनारी समुदायांचे हवामान लवचिकता वाढवणे’ या शीर्षकाखाली, मॅंग्रोव्ह सेलने 'एनआयओ' सोबत करार केला. हा प्रकल्प वर्षभरासाठी राबविला जाणार आहे. या अभ्यासात प्रवाळ परीसंस्थेच्या स्थळांचा अभ्यास करण्यात येणार आहे. 'रिमोट सेन्सिंग टूल्स'चा वापर करून 'रीफ फॉर्मेशन्स असलेली ठिकाणे 'जीपीएस'द्वारे ओळखले जातील.
 
 
या पूर्वी सिंधुदुर्गात या प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये 'कोरल'चे तुकडे घेऊन ते 'नायलॉन' धाग्यांच्या साहाय्याने काँक्रीटच्या चौकटीत जोडले गेले. आणि नंतर त्यांच्या वाढीसाठी समुद्राच्या तळाच्या योग्य खोलीवर सोडले गेले. 'रीफवॉच मरीन कॉन्झर्व्हेशन'ने एकूण २० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या नऊ कृत्रिम संरचनांवर कोरल तुकड्यांचे प्रत्यारोपण केले होते. तसेच मुंबईतील कोस्टल रोडचे बांधकाम सुरू असलेल्या हाजी अली येथील प्रवाळांचे नोव्हेंबर २०२०मध्ये कोरल कुलाब्यातील नेवी नगर येथे स्थलांतरित करण्यात आले.
“महासागर आणि कोरल हे सर्वात मोठे कार्बन सिंक आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील खडकांच्या अधिवासाची मुख्य जैविक वैशिष्ट्ये समजून घेणे हे या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. -विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मॅन्ग्रोव्ह सेल”
Powered By Sangraha 9.0