मुंबई(प्रतिनिधी): पक्ष्यांवर होणाऱ्या हवामान बदलाचा गंभीर परिणाम एका अभ्यासाअंती समोर आला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स' या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हवामानात होणारे बदल हे उष्णकटिबंधीय तसेच पर्वतीय, ध्रुवीय आणि स्थलांतरित प्रजातींसाठी विशिष्ट चिंतेची बाब आहे.
गेल्या तीन दशकांपासून जागतिक पक्ष्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावरील मानवी अतिक्रमणात वाढ झाली आहे. यामुळे त्यांच्या अधिवासाचा होणारा ऱ्हास आणि प्रजातींवर पडणारा ताण हे पक्षी जैवविविधतेसाठी प्रमुख धोके आहेत, असे 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स' या संशोधन अहवालात म्हटले आहे. हा अहवाल ५ मे रोजी 'एन्युअल रिव्ह्यू ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड रिसोर्सेस'या पुस्तिकेमध्ये प्रकाशित झाला आहे. जगभरातील अस्तित्वात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी अंदाजे ४८ टक्के (५,२४५) प्रजातींची संख्या कमी होत असल्याचा कयास या अभ्यासात मांडण्यात आला आहे. अधिवासाचे विखंडन आणि त्याच्या ऱ्हासाला जमीन-वापराचा बदल जबाबदार असल्याचे संशोधनात म्हटले आहे.
या अभ्यासात म्हैसूर स्थित 'नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन' तसेच 'मँचेस्टर मेट्रोपॉलिटन', 'कॉर्नेल युनिव्हर्सिटी', 'बर्डलाइफ इंटरनॅशनल', 'जोहान्सबर्ग युनिव्हर्सिटी' आणि 'पॉन्टिफिकल झेव्हियरियन युनिव्हर्सिटी' यांचा सहभाग होता. जगाच्या ११ हजार पक्ष्यांच्या प्रजातींच्या भविष्यातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी 'इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर'च्या 'रेड लिस्ट'मधील डेटा वापरण्यात आला. जगातील पक्षी संकटात असून त्यांची संख्या विविध धोक्यांमुळे झपाट्याने कमी होत आहे, हे चिंताजनक आहे. याचे कारण म्हणजे विविध परिसंस्थांमध्ये हे पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. आपला नैसर्गिक वारसा वाचवण्यास अजून उशीर झालेला नाही. परंतु, तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.