महापुरुषांच्या बदनामीमागे समाजद्रोह्यांचा हात!

07 May 2022 11:42:39

tilak maharaj
 
 
 
 
मुंबई : ‘’सध्याच्या काळात राज्यामध्ये जे काही प्रकार सुरू आहेत, ते पाहून मन अक्षरश: विषण्ण होते. राज्याचे समाजकारण आणि राजकारण ज्या पद्धतीने पुढे जात आहे, त्यामुळे नक्कीच दुःख होते. छत्रपती शिवरायांनी अठरापगड समाजाला सोबत घेऊन रयतेसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. भागवत धर्म आणि वारकरी परंपरा लाभलेल्या या महाराष्ट्रात प्रत्येक पंथाने जगाला मोठे संत दिले, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला जातीच्या आणि इतर बंधनांच्या चौकटीत अडकवून त्यांच्या कार्याची अवहेलना करणे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. जातींमध्ये फूट पाडून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महापुरुषांची बदनामी करण्यामागे नक्कीच काही परकीय आणि समाजद्रोही शक्तींचा हात आहे,” असा आरोप ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’चे सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधिस्थळावरुन निर्माण झालेल्या वादावर त्यांनी नुकताच ’दै. मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधिस्थळाबाबत लोकमान्य टिळकांचे योगदान नाकारण्याचा, जो अश्लाघ्य प्रकार गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडला, त्याविषयी काय सांगाल?
 खर्‍या अर्थाने हे आपले सर्वस्वी दुर्दैव असून ही एकप्रकारे आपली शोकांतिकाच आहे. मागील काही वर्षांत राज्याचे राजकारण कलुषित झाले आहे. महाराष्ट्राकडे आदर्श म्हणून पाहिले जायचे. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रात मागील काही वर्षांमध्ये रंगलेले समाजकारण आणि राजकारण अत्यंत कलुषित झाले असून, त्याची पातळी खूप खालावली आहे. महाराष्ट्रात सुरू झालेले जातीयवादी राजकारण क्लेषकारक आहे. लोकांनी आपले आदर्श जातीच्या आधारावर ठरवू नयेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भात निर्माण झालेले वाद हे केवळ जातींमध्ये फूट पाडून आपली पोळी भाजण्यासाठीच घडवले जात आहेत.
 
 
 
हा राजकीय वाद सुरू झाल्यानंतर ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’ने त्याचे पुराव्यांसह खंडन केले व टिळकांचे योगदान पुन्हा एकदा सर्वांसमक्ष ठेवले. तेव्हा, मंडळाची याविषयीची भूमिका आणि मंडळाचे आजवरचे कार्य याकडे आपण कसे पाहता?
’श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ हे लोकमान्य टिळकांसारख्या व्यक्तिमत्त्वाने उभारलेले मंडळ आहे. त्यामुळे हे मंडळ प्रसिद्धीपेक्षा समाजाप्रति असलेले आपले दायित्व, बांधिलकी, शिवरायांप्रति असलेले प्रेम आणि भक्ती यासाठी अधिक ओळखले जाते. मंडळाचे कामकाज सांगायचे, तर मागील १७२ वर्षांपासून रायगडावर अनेक सोहळे पार पडतात, शिवकार्याचे प्रसार करणे, ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करणे, सामाजिक बांधिलकी जपताना कोरोना काळात मंडळातर्फे रायगड भागातील अनेक लोकांना आणि वनवासी बांधवांना सुमारे १५ लाख रुपये किमतीचे दैनंदिन साहित्य वितरित करण्यात आले होते. त्यामुळे ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ १२७ वर्षे अव्याहतपणे आपले सामाजिक कार्य करत असून, कार्यावरील प्रेम आणि कार्य हेच आमचे ध्येय आहे आणि तेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’ची भूमिका आणि छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांच्यात काय संबंध आहे, टिळकांनी समाधीसाठी किती मोठे योगदान दिलेले आहे, हे सर्वश्रुत असूनही आज टिळकांवर जे खालच्या दर्जाचे आरोप केले जात आहेत, हे खेदजनक आहेत. टिळकांवर आरोप करताना एकही पुरावा संबंधितांकडे नाही. पण, कुणी काहीही आरोप केले, तरी लोक त्याला महत्त्व देत नाहीत, हेदेखील तितकेच खरे!
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक किंवा अशा अनेक महापुरुषांना जातीयवादाच्या राजकारणात ओढून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा आणि त्यातून महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे वाटते का?
हे सर्वच महापुरुष महाराष्ट्रासाठी पूजनीय आहेत. लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखी सर्वच मंडळी भागवत धर्माच्या या महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहेत. मात्र, आज दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनता या महापुरुषांना जातीच्या चौकटींमध्ये वाटून घेत आहे. हे महापुरुष केवळ एखाद्या जातीपुरते सीमित नसून ते संपूर्ण देशासाठी वंदनीय आणि पूजनीय आहेत. त्यामुळे सर्वांसाठी वंदनीय असलेल्या या महापुरुषांच्या बदनामीमागे नक्कीच कुठली तरी मोठी परकीय आणि समाजद्रोही शक्ती आहे आणि त्यांच्यामुळे नक्कीच राज्याचे सामाजिक वातावरण दूषित व्हायला मदत होत असून त्यांच्या या कुटील कारस्थानाला आता थेट जनताच उत्तर देईल.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0