चौंडीत दंगल घडविण्याचे आजोबा नातवाचे षडयंत्र

30 May 2022 16:26:00

NCP
 
 
 
मुंबई : 'मुंबईत बॉम्ब स्फोट घडवून हजारो हिंदूंची हत्या करणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची कुप्रवृत्तीच्या मंडळीच्या हस्ते हा कार्यक्रम होऊ नये अशी आमची मागणी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात मृत्यू झालेल्या हिंदूंच्या रक्ताने माखलेला पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी या मंडळींनी उपस्थित राहू नये. जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज त्यांनी बाळगावी. मागील अनेक वर्षांपासून अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी चौंडी येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि समाजातील लाखो लोक या कार्यक्रमासाठी चौंडीत एकत्रित होतात. मात्र, यावर्षीच्या कार्यक्रमात काही तरी गोंधळ व्हावा, दंगल भडकावी असे षडयंत्र या 'आजोबा-नातवाचे' आहे.' या शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार आणि शरद पवारांवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
 
 
पडळकर हे सध्या 'जागर पराक्रमी इतिहासाचा' या शीर्षकाखाली सुरु करण्यात आलेल्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून यात्रेदरम्यान बारामती येथे नुकताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. रविवार, दि. २९ मे रोजी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या होळ या जन्मगावापासून सुरु झालेल्या या यात्रेचा समारोप मंगळवार, दि. ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथे होणार आहे.
 
 
 
'लबाड लांडगं ढोंग करतंय अन हिंदू असल्याचं सोंग करतंय' 


'शरद पवार आणि इतर मंडळी आपण हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्यासाठी माध्यमांचा वापर करतात. ज्या अहिल्यादेवींच्या नावावरून रोहित पवार राजकारण करत आहेत त्यांच्या विचारांचे पालन मात्र तुमच्याकडून होताना दिसत नाही. काशीविश्वनाथ, बारा ज्योतिर्लिंग आणि देशातील हजारो उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्यादेवींचे नाव घेणारी ही मंडळी मात्र पुण्यात गणपतीचे दर्शन घ्यायला जाताना मात्र मांसाहार करून जातात. एका बाजूला अहिल्यादेवींच्या नावाने राजकारण करायचे आणि दुसऱ्या बाजूला अशा भूमिका घ्यायच्या, यातून तुमची विरोधाभासी भूमिका जनतेसमोर उघडी पडली आहे. त्यामुळे एकीकडे आपण हिंदू असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे मांसाहार करून गणपती दर्शनाला जायचे याचा अर्थ लबाड लांडगं ढोंग करतंय अन हिंदू असल्याचं सोंग करतंय असाच होतो,' या शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर हल्लाबोल चढवला आहे.
 
 
 
रोहित पवार आहेत तरी कोण ?


'रोहित पवार हे अहिल्यादेवींच्या कार्यक्रमाची पत्रिका घेऊन फिरत होते. त्यांनी शरद पवारांना निमंत्रण पत्रिका देतानाच फोटो देखील शेअर केला होता. एका छताखाली राहणारी आणि एका ताटात जेवणारी मंडळी आता पत्रिका देण्याचे ढोंग करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अहिल्यादेवींचा कार्यक्रम घेणारे रोहित पवार आहेत तरी कोण ? ते काय आहिल्यादेवींचे वंशज आहेत का ? असा सवालही पडळकरांनी केला आहे.
 
 
 
बारामतीतून पुन्हा लढणारच !


बारामतीतील पराभवावर बोलताना पडळकर म्हणाले की 'माझा ५ वेळा निवडणुकीत पराभव झाला असला तरी मी राजकारणातून बाहेर पडलो नाही. बारामतीतून माझा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी याठिकाणी कामाला सुरुवात केली होती. आज मी पवारांना चहुबाजूने घेरले आहे. त्यांचा बुरखा फाडण्यात मी यशस्वी देखील झालो आहे. सर्वसामान्यांचा त्यांच्यावर असलेला राग आणि संताप एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनातून दिसून आला होता. त्यामुळे बारामतीच्या बाबतीत बोलायचे तरी घोडा मैदान फारसे दूर नाही, पक्षाने आदेश दिला तर मी पुन्हा बारामतीतून निवडणूक लढावें हे निश्चित आहे.'
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0