केवळ जातीय द्वेषापोटी लोकमान्य टिळकांचे रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधी जीर्णोद्धार कार्यातील अमूल्य योगदान नाकारण्याचा करंटेपणा सध्या काही राजकीय मंडळींनी चालवला आहे. पण, सत्य हेच की, ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’ची स्थापना लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने १८९५ साली झाली. याच रायगड मंडळाच्या देखरेखीखाली कामाला सुरुवात झाली आणि १९२६ साली शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी राहिली.
आजपासून मागील अखंड १२७ वर्षे रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’च्यावतीने आयोजित केला जातो. दरवर्षी राज्यभरातून ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’च्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शिवभक्त शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात व महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होतात.
रायगडाचं महत्त्व इतर गडांपेक्षा तीन कारणांसाठी वेगळं आहे. यातील पहिले म्हणजे, ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली, त्या स्वराज्याची रायगड ही राजधानी होती. दुसरे या रायगडावर राजदरबारात महाराजांचा राज्याभिषेक झाला व महाराज ‘छत्रपती’ झाले. तिसरे म्हणजे, याच रायगडावर महाराजांनी शेवटचा श्वास घेतला व ते अनंतात विलीन झाले. म्हणूनच रायगडाला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करून पुढे या देशाचा इतिहास बदलला, या सर्व घडामोडींचा हा गड साक्षीदार आहे.
‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’ची स्थापना लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने १८९५ साली झाली. प्रामुख्याने दोन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ही स्थापना केली गेली. यातील पहिले म्हणजे गडावरील समाधीची व इतर वास्तूंची देखभाल, दुरूस्ती व जीर्णोद्धार आणि दुसरे म्हणजे शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम करणे, शिवचरित्राचा प्रचार-प्रसार करणे.
यावेळी हा कार्यक्रम सुरू करण्याचे असे काय कारण होतं याची माहिती घेतल्यावर लक्षात येतं की, १८१८मध्ये मराठेशाहीच्या अस्तानंतर पुढे ब्रिटिश काळात रायगड पूर्णत: दुर्लक्षित होता. ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांवर जायला बंदी घातली होती. रायगडावर १८१८ ते १८८३ या दरम्यान कोणीही गेल्याची नोंद नाही. गडाचे भग्नावशेष आणि महाराजांच्या समाधीची पडझड व दुरवस्था झाली होती. साधारणत: ६५ वर्षे गडावर कोणीही फिरकलेलं नव्हतं. तीन-चार धनगर कुटुंबीय यावेळी गडावर राहत होते. पुढे १८८३ साली जेम्स डग्लस नावाचा इंग्रज गृहस्थ शिवचरित्र वाचून महाराजांच्या जिज्ञासेपोटी गडावर गेला. रायगडाच्या व महाराजांच्या समाधी दुरूवस्थेविषयी त्याने ’बुक ऑफ बॉम्बे’ या पुस्तकात लिहून ठेवले की, ’‘समाधीचा आंतरभाग झाडाझुडुपांनी व्याप्त केला आहे. त्याच्या फरसबंदीतून मोठाले वृक्ष वाढले आहेत.
त्याजवळील देवालयात घाण झाली असून त्यातील मूर्ती विखुरलेल्या आहेत. या शूरवीर राजाच्या स्मारकासाठी त्यावेळच्या संस्थानिक सरदार व सामान्य जनतेने ढिलाई सोडून समाधीच्या जीर्णोद्धारासाठी जागोजाग सभा भरवून फंड जमा करण्याची तजवीज करून जगाला या राजापायी आपली कृतज्ञता दाखविली पाहिजे.” डग्लसचे हे वर्णन वाचून त्यावेळच्या भारतीय समाजात अस्वस्थता पसरली. त्याच सुमारास म्हणजे जुलै १८८५ मध्ये गोविंद बाबाजी जोशी यांनी लिहिलेले ’रायगड किल्ल्याचे वर्णन’ हे पुस्तकही प्रसिद्ध झाले. त्याचा परिणाम म्हणून १८८५ साली रावबहादुर जोशी, लोकमान्य टिळक, न्या. तेलंग, न्या. रानडे, न्या. कुंटे इत्यादी समाजधुरिणांनी पुण्याला एका सभेचे आयोजन केले. त्यात समाधी जीर्णोद्धाराच्या कार्याचे सूतोवाच करण्यात आले. याची दाखल घेऊन ब्रिटिश सरकारने सालाना पाच रुपये तजवीज करून ठेवली.
पुढे दि. ३० मे, १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा जंगी सभेचे आयोजन केलं. या सभेत रायगडावरील महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची कल्पना मांडण्यात आली. यासाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले.श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली सेनापती दाभाडे, लो. टिळक, बापूसाहेब कुरूंदवाडकर, सरदार पोतनीस, अनेक संस्थानिक, सरदार व पुण्यातील नामवंत व्यक्ती या सभेला उपस्थित होत्या. शिवस्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी फंड उभा करण्याचं आवाहन या सभेला केलं गेलं. त्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे ’श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ.’ लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’तून फंड उभारणीचं आवाहन केलं. त्यांच्यावर काही स्वकीय मंडळींनी टीका सुरू केल्यावर टिळकांनी ‘केसरी’मध्ये दि. १९ मे आणि दि. २६ मे, १८९६ रोजी ’विघ्नसंतोषीपणा नव्हे काय?’ आणि ‘थोर पुरुषांची चरित्रे’ असे दोन लेख लिहिले. ज्युनिअर कुरूंदवाडाचे प्रमुख श्रीमंत बापूसाहेब पटवर्धन यांनी समाधीवर छत्री बांधण्याचा, नित्य पूजा करण्याचा व प्रतिवर्षी रायगडावर उत्सव सुरू करण्याचा ठराव मांडला. दाजी आबाजी खरे यांची अध्यक्ष म्हणून व लोकमान्य टिळकांची कोषाध्यक्ष-चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकार्यांच्या उपस्थितीत दि. २४ व २५ एप्रिल, १८९६ असे दोन दिवस शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
रायगडाचा ताबा ब्रिटिश सरकारकडे असल्याने मंडळाच्यावतीने शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराचीपरवानगी मागण्यात आली. पण, ती ब्रिटिश सरकारने नाकारल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. त्यावेळेचे मंडळाचे अध्यक्ष दाजी आबाजी खरे यांनी १९०६ साली ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टनकडे एक अर्ज दाखल केला व सुनावलं की, “शिवाजी महाराजांच्या प्रती आम्हां सर्व प्रजेला सार्थ अभिमान आहे. राजांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. त्या राजाला शोभेल अशी स्मारकाची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी करण्याचा संकल्प मंडळाने सोडला आहे.” लोकवर्गणीतून जमा झालेला निधी डेक्कन बँकेत ठेवण्यात आला होता. परंतु, ही बँक १९१३ साली बुडीत निघाल्याने स्मारक फंडाचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीची कुणकुण लागताच टिळक आणि खरे पुणे फर्स्टक्लास न्यायालयात गेले. त्यांनी फिर्याद करून व्याजासह रु. ३३ हजार, ९११ किमतीचे हुकुमनामे मिळविले. परंतु, त्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी बँक ‘लिक्विडेशन’मध्ये निघाली. अखेर तब्बल ३० वर्षे संघर्ष केल्यावर लोकमान्य टिळकांच्या हयातीनंतर ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’च्या पदाधिकार्यांना यश आले व दि. ६ फेब्रुवारी, १९२५ ला ब्रिटिश सरकारने रु. १९ हजार, ०४३ च्या खर्चास मान्यता दिली. यापैकी मंडळाने उभा केलेला १२ हजार रुपयांचा फंड ब्रिटिश सरकारचे रु. पाच हजार व पुरातत्त्व खाते वेस्टर्न सर्कलच्या सुपरिटेंडने रु. २ हजार, ०४३ इतका भार उचलायचे ठरवले. रत्नागिरीच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्यावतीने व रायगड मंडळाच्या देखरेखीने प्लॅन तयार करून कामाला सुरुवात झाली आणि पुढील वर्षी १९२६ साली आज आपण पाहतो ती शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारीतसमाधीची वास्तू उभी राहिली. यासंबंधीचा ब्रिटिशकालीन कागदोपत्री पुरावा आजही ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’कडे उपलब्ध आहे.
मंडळाच्यावतीने आजपर्यंत शिवपुण्यतिथीचे अनेक कार्यक्रम गडावर पार पाडले. महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीला १९८० साली पंतप्रधान इंदिरा गांधी उपस्थित होत्या. १९९९ साली त्यावेळेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गडावर आले होते. 1981 साली गृहमंत्री झैलसिंगजी, त्याअगोदर उपपंतप्रधान जगजीवनरामबाबू, शरद पवार दोन वेळा या उत्सवात येऊन गेले. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, सरसंघचालक रज्जुभैय्या, विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, आजपर्यंत झालेले राज्याचे बहुतांश मुख्यमंत्री गडावर येऊन गेले. आचार्य किशोरजी व्यास, भैय्युजी महाराज इ. अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरही शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमासाठी गडावर येऊन गेले.
आजपर्यंत ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’ने अनेक विधायक कामे पुरातत्त्व खात्याच्या मर्यादा असतानाही केली आहेत. ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’चे कार्य फक्त शिवपुण्यतिथी कार्यक्रमापुरते मर्यादित नसून मंडळाने संपूर्ण रायगडाचे व गडावरील संपूर्ण वास्तूंचे जतन करण्यात यावे, याकरिता स्वातंत्र्यपूर्व काळातही प्रयत्न केले होते व आजही ते चालू ठेवले आहेत. रायगड किल्ल्याचा विकास व्हावा, येणार्या लोकांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात याकरिता मंडळातर्फे पाहणी करण्यात येऊन महाराष्ट्र शासनास १९८७ साली ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ सादर करण्यात आला. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याने काही सुधारणा केल्या. पण त्या अद्याप अपुर्याच आहेत. वयोवृद्ध व्यक्तींसाठी गडावर येणे कठीण होते. त्यासाठी १९९६ साली मंडळाने पुण्यातील प्रसिद्ध ‘जोग इंजिनिअरिंग’ कंपनीच्या साहाय्याने रोप-वेची उभारणी केली. ज्यामुळे वर्षासाठी साधारणत: रायगडावर येण्याच्या शिवभक्तांची संख्या दहा हजारांवरून पाच लाखापर्यंत गेली.
गडावर अजूनही बरीच कामे शिल्लक आहेत. गडाचा ताबा केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे आहे. अलीकडे स्थापन झालेल्या किल्ले रायगड प्राधिकरणामार्फत होत असलेल्या कामांची गती अजून वाढणे आवश्यक आहे. आज समाधीरूपाने जे शिवस्मारक उभे आहे, ते १९२६ साली बांधले आहे. युगपुरूषाला शोभेल, असे शिवस्मारक व त्याचे सुशोभीकरण करण्याची गरज आहे.
- सुधीर थोरात
(लेखक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह आहेत.)