मुंबई(प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील खोतवाडी गावाच्या जंगलातून गुरुवार दि. २६ रोजी ७ शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन बंदुकांसह काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांनी शिकार केलेले दोन पिसोरे (माउस डीअर) आणि दोन ससे जप्त करण्यात आले आहेत.पुढील तपासासाठी न्यायालयाने आरोपींना ४ दिवसाची कोठडी सुनावली आहे.
खोतवाडी गावाच्या जंगलातील मांडलाई देवी पठारावर गुरुवार दि. २६ रोजी सात ते आठ लोक बंदूक घेऊन शिकारीसाठी गेले आहेत अशी माहिती वनविभागाला मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार त्वरित कारवाई करत, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा रचला. खोतवाडी ते वरेवाडी रस्त्यावर ठिकठिकाणी वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी दबा धरून बसले होते. गुरुवार दि. २६ रोजी रात्री सुमारे १२ वाजता दोन दुचाकी वरेवाडीच्या दिशेने जाताना आढळून आले. त्यांना तपासासाठी अडवल्यावर पाच जणांपैकी एका जणाने पळ काढला. तपासणी दरम्यान,या आरोपींकडून दोन विना परवाना बंदुका, तेरा जिवंत काडतुसे, शिकार केलेले दोन मृत पिसोरे, दोन मृत ससे, शिकारीसाठी वापरलेले सहा काडतुसे, तीन हेड टॉर्च आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या तपासणी नंतर सुमारे तासाभराने अजून एक संशयित दुचाकी समोरून आली, परंतु थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यात एक आरोपी वन अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडला. त्याच्याकडून एक परवानाधारी पिस्तुल तसेच प्लास्टिकच्या पिशवी मध्ये मांसाचे काही तुकडे आढळून आले. यातील पाच आरोपी प्रविण बोरगे, मारुती वरे, बाजीराव बोरगे, संजय भोसले, बाजीराव बोरगे,रामचंद्र बोरगे,
वन विभागाच्या ताब्यात आहेत. तर, दोन आरोपी अमोल खंदे, आबाजी बोरगे फरार आहेत. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
ही कारवाई मलकापूर वन क्षेत्रपाल अमित भोसले, वनरक्षक विठ्ठल खराडे, प्रशिक्ष पाटील, अक्षय चौगुले, दिविजय पाटील, रूपाली पाटील, आणि वनसेवक शंकर लवटे यांनी केली. याचा पुढील तपास कोल्हापूरचे वन संरक्षक रावसाहेब काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. हा तपास मलकापूर वन क्षेत्रपाल अमित भोसले, वनपाल मेहबूब नायकवडी, आणि वनरक्षक रुपाली पाटील करणार आहेत.