जन्मजात जातिभेदाचा उच्छेद आणि गुणजात जातिभेदाचा उद्धार, असे विचार सावरकरांनी प्रखरपणे मांडले. अस्पृश्यता निवारण, सप्तबेड्या तोडणे, सहभोजन समारंभाचे आयोजन करून त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध फक्त भाषणेच नाही, तर स्वतः सक्रिय पुढाकार घेतला, समाजजागृती केली. ‘जातिभेदाचे उच्चाटन केल्याशिवाय विज्ञानधर्माची स्थापना अशक्य अन् विज्ञानधर्माशिवाय मानवविकास होणार नाही,’ हा त्यांचा सिद्धांत होता.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार काळाची गरज आहे. आजही आपल्या देशात जातिभेद हा खूप मोठ्या प्रमाणात मानसिकरित्या व काही अंशी व्यावहारिकरित्या दिसून येतो. भारतात अनेक व्यक्तींच्या पुढाकारामुळे सामाजिक सुधारणांना चालना मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दक्षिणेत नारायण गुरु, उत्तरेत पंडित मदनमोहन मालवीय, संपूर्ण भारतात गांधीजी, तर रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना वीर सावरकर अशा कैक श्रेष्ठ व्यक्ती जातिप्रथेच्या विरोधात सक्रिय होत्या.
’केला जरी पोत, बळेची खाले, ज्वाला तरि ते वरती उफाळे!’ ही पंक्ती सावरकरांनी खरी करून दाखवली. अर्थात, प्रतिबंधामुळे ते सामाजिक कार्याकडे वळले. परंतु, परिस्थितीने त्यांना समाजसुधारक बनविले, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, त्यांची मनःस्थितीच समाजसुधारकाची होती.१९०२ मध्ये म्हणजे वयाची विशी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी एका कवितेतून विधवा स्त्रीचे दुःख शब्दबद्ध केले होते आणि ’जर विधुर व्यक्तींना पुनर्विवाहाला अनुमती आहे, तर विधवा स्त्रियांना अशी अनुमती का नाकारता?’ असा रोखठोक प्रश्न प्रस्तुत केला होता.
समाजातील उच्चनीचता व अस्पृश्यता संपुष्टात यावी, लहानपणापासूनच पुरुषांप्रमाणे स्त्रियाही समान अधिकाराच्या स्वामिनी व्हाव्यात, हा त्यांचा आग्रह होता. अन्न किंवा पोट हे धर्माचे स्थान नसून अंतःकरण, आत्मा यामध्ये धर्माचा निवास असतो. जन्मजात जातिभेदाचा उच्छेद आणि गुणजात जातिभेदाचा उद्धार, असे त्यांनी प्रखरपणे मांडले. अस्पृश्यता निवारण, सप्तबेड्या तोडणे, सहभोजन समारंभाचे आयोजन करून त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध फक्त भाषणेच नाही, तर स्वतः सक्रिय पुढाकार घेतला, समाजजागृती केली. ‘जातिभेदाचे उच्चाटन केल्याशिवाय विज्ञानधर्माची स्थापना अशक्य अन् विज्ञानधर्माशिवाय मानवविकास होणार नाही,’ हा त्यांचा सिद्धांत होता.
स्पृश्यांचा विरोध असतानाही महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहास सावरकरांनी मनोमन पाठिंबा ‘श्रद्धानंद’ या पत्रातून दिला. डॉ. आंबेडकरांनी नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाची घोषणा केली होती. त्यावेळी फक्त सावरकरांनी मंदिर प्रवेशाला जाहीर पाठिंबा दिला. सवर्णांनीच सर्व अस्पृश्यांचे स्वागत करावे नि मंदिर मोकळे करावे, हे जाहीर केले व तसे पत्रकही वाटले होते. १९२९ च्या सप्टेंबर महिन्यात आंबेडकर रत्नागिरीत गेले असताना सावरकरांनी आंबेडकरांना मंदिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु, काही कारणास्तव हे शक्य झाले नसल्याने अभिप्राय देताना ते म्हणाले,“अस्पृश्यवर्ग हिंदू समाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही, तर चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे, ज्या थोड्या लोकांना यांची आवश्यकता वाटली आहे, त्यापैकी सावरकर एक आहेत!”
जातिभेद व अस्पृश्यता या दोषांमुळे कलंकित झालेल्या हिंदू समाजात स्पृश्य आणि अस्पृश्य हे दोन्ही अन्यायास कारणीभूत आहेत. कारण, पोटजाती परस्परांबाबत अस्पृश्यता पाळतात, असे सावरकरांचे निरीक्षण होते. मानवी वेदनांना किंमत न देता, जातीलाच महत्त्व देणे मानवतेच्या विरोधी आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सात दशके उलटली, पण आपली मानसिकता अजूनही अपेक्षित प्रमाणात बदललेली नाही, आपण व्यापकपणे विचार करत नाही, हे वर्तमान आहे. एक नक्की, समाजसुधारणांचा पल्ला दूरवरचा आहे. आपल्या या मातृभूमीत एकेक जण अमृतपुत्र आहे. समाजसुधारणांचा संस्कार अनादी काळापासून केला जात आहे, हा समाजसुधारणांचा संस्कार, ही शिकवण सावरकरांनी आयुष्याची ८३ वर्षे आपल्याला दिली. परंतु, ही शिकवण आजही कित्येकांच्या व्यवहारात उमटत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
सावरकरांनी १३ वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक क्रांतीच घडवून आणली, यावर सगळ्यांचे मतैक्य आहे. व्यायाम प्रसार, साक्षरता प्रसार, स्वदेशी प्रसार, विज्ञाननिष्ठतेचा प्रसार या हेतूच्या पूर्तीसाठी नाना प्रयास करताना वेगवेगळ्या मंडळींकडून विरोधही झाला. सहभोजनाच्या संदर्भात सनातन्यांकडून, वेदोक्ताच्या अधिकाराबाबत शास्त्री पंडितांकडून, हिंदूंच्या संघटनाबाबत मुस्लिमांकडून, साक्षरताप्रसाराबाबत सर्वसाधारण नागरिकांकडून असा चहुबाजूने विरोध झाला.
‘वरं जनहितं ध्येयं, केवला न जनस्तुति:’ हा मंत्र तर सावरकरांनी आयुष्यभर अमलात आणला. जनस्तुतीकडे पाठ फिरवून जनहिताची कास धरायची, हे व्रत आयुष्यभर आचरले. नरहर कुरुंदकर, पु. ल. देशपांडे, प्रभाकर पाध्ये वगैरे विचारवंतांनी मुक्तकंठाने सावरकरांची स्तुती केली आहे.
लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “लोकभ्रम, अंधश्रद्धा, जातिभेद इत्यादी मागासलेपणाची अवलक्षणे नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाज बलवान होणार नाही, हे जाणून सावरकरांची रूढी व परंपरा यावर बुद्धिवादाचे प्रखर अस्त्र चालविले.” सावरकरांच्या रत्नागिरीतील कार्याने प्रभावित होऊन महर्षी शिंदे म्हणाले होते, “देवाने माझे उर्वरित आयुष्य सावरकरांना द्यावे.” ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू’ हा भाव सावरकरांच्या हृदयात होता, आपण जर मनाने विशाल, व्यापक झालो आणि जाती, पोटजाती यामध्ये न रमता हिंदूपणात रमलो, तर भेदभावांच्या प्रश्नाला कायमची मूठमाती देता येईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. २०१७ मध्ये केरळ प्रांतात ‘त्रावणकोर देवस्थान बोर्डा’ने पाच पूर्वास्पृश्य दलित युवकांची मंदिरात पुजारी म्हणून नेमणूक केली आहे, अशा सामाजिक क्रांतीनेच वीर सावरकरांच्या आत्म्याला शांती मिळेल.
- पूजा बागडे