स्वातंत्र्यवीर सावरकर : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

27 May 2022 19:47:18
 
savarkar
 
 
 
‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर` हे नाव कानावर पडताच एक नव्हे, अनेक असे त्यांचे अवतार आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. महाकवी, उत्कृष्ट वक्ता, लेखक, क्रांतिकारक, साहित्यिक, समाजसुधारक आणि विलक्षण दूरदृष्टी असलेला हिंदूनिष्ठ नेता अशा अनेक अवतारांची सांगड म्हणजे तात्याराव सावरकर. पण, त्यांची भूमिका कुठलीही असली तरी मनातले ध्येय मात्र एकच आणि ते म्हणजे राष्ट्रसेवा. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सावरकरांच्या जीवनातील अशाच काही धीरोदात्त प्रसंगांचे स्मरण करणारा हा लेख...
 
 
सावरकरांच्याच शब्दात सांगायचे झाले तर,
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले,
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले,
तुतेंची अर्पिली नवी कविता रसाला,
लेखाप्रती विषय तुंचि अनन्य झाला।
 
 
अशा रीतीने सावरकरांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी वाहून घेतले होते. सावरकरांचे चरित्र नीट अभ्यासले तर असे लक्षात येते की, त्यांनी केलेले प्रत्येक कार्य हे नियोजनपूर्वक व एक ठरावीक लक्ष्य समोर ठेवून केलेलं होतं. सावरकरांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी रचलेल्या स्वदेशीच्या फटक्यात त्यांच्यातला कवी समाजाला विचारतो,
 
 
काश्मीरातील शाली त्यजुनी
अल्पाकाला का भुलता।
मलमल त्यजुनी वलवल
चित्ती हलहलके पट का वरता?
 
 
हा केवळ एक प्रश्न नसून, त्या काळातल्या समाजाला केलेले आवाहन होते. सावरकर त्यांच्या काव्यातून अनेक युवकांची मने चेतवत होते आणि अशा युवकांना सोबत घेऊनच दि. १ जानेवारी, १९०० या दिवशी त्यांनी ‘मित्रमेळ्या`ची स्थापना केली. त्या वर्षीचा शिवजयंतीचा उत्सव केवळ ऐतिहासिक न राहता, एक राजनैतिक सोहळा झाला. त्या सोहळ्यातल्या सावरकरांच्या वक्तृत्वाने नाशिकमधील जनमानसात स्वातंत्र्य मिळविण्याची उर्मी जागी केली आणि त्यांनी लिहिलेल्या ‘स्वातंत्र्य लक्ष्मी की जय` या घोषणेने संपूर्ण नाशिक दुमदुमलं. त्याचं काळात त्यांनी रचलेल्या ‘जयोस्तुते` या अजरामर काव्यात ते म्हणतात,
 
 
मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती।
स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती।
 
 
या पुढे पुण्यात ‘अभिनव भारत`ची केलेली स्थापना आणि विदेशी कपड्यांची होळी अशा कारकिर्दींची धग भारतातच नव्हे, तर थेट ब्रिटनमध्येसुद्धा जाणवली. पण, शत्रूला नमवायचे असेल, तर शत्रूच्या गडात शिरणे आवश्यक होते, हे तात्यारावांना पक्के लक्षात आले होते. त्याच वेळेला श्यामजी कृष्ण वर्मा यांनी प्रायोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्तीच्या निमित्ताने अगदी योग्य अशी संधी सावरकरांकडे चालून आली. शिष्यवृत्ती मिळण्याकरिता स्वतः लोकमान्य टिळक व शिवराम महादेव परांजपे यांनी शिफारससुद्धा केली. दि. ९ जून, १९०६ रोजी सावरकर ‘एस. एस. पर्शिया` या बोटीने लहानग्या मुलाला, पत्नीला व भावाला निरोप देत ब्रिटनला जायला निघाले. देत ब्रिटनला जायला निघाले. बोटीवर भारताच्या अनेक प्रांतातले लोकं उपस्थित होते. त्यांच्या स्वभावानुसार सावरकरांनी चर्चेतून, सर्वांना जाणून घ्यायला सुरुवात केली. काही दिवसांतच, समुद्राचा प्रवास सहन न झाल्याने, काही भारतीय तरुण मध्येच एडनला उतरून भारतात परतण्याच्या गोष्टी करू लागले. हे कळताच सावरकरांनी मात्र गुरू गोविंदसिंग, चापेकर बंधु, वासुदेव बळवंत फडके यांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात देशसेवेची स्फूर्ती निर्माण केली. एवढंच नव्हे, तर लंडनला पोहोचण्याच्या आधीच बोटीवर ‘अभिनव भारत`ची शाखा सुरू केली. या प्रसंगातून सावरकरांच्या कुशल नेतृत्वाचा प्रत्यय लोकांना आला. त्यांच्या बोलण्यात लोकांची मने वळवण्याची ताकद होती.
 
 
दि. ३ जुलै, १९०६ रोजी तात्याराव लंडनला पोहोचले. ते बोटीवर असतानाच लंडन ऑफिसमध्ये भारतातून गेलेल्या गुप्त रिपोर्टमध्ये असे लिहिलेले सापडते की, ''He (Savarkar) holds somewhat the same opinion as Damodar Hari Chapekar. In short, he promises to be a firebrand.'' या कारणास्तव सावरकरांवर नजर ठेवणे गरजेचे आहे, असे तिथल्या हेरखात्याला सांगण्यात आले होते. लंडनला ‘इंडिया हाऊस`मध्ये ते उतरले. एका बाजूला बॅरिस्टरचे शिक्षण, दुसऱ्या बाजूला पुस्तकांचे लेखन आणि तिसरीकडे वक्तृत्वाच्या माध्यमातून अनेक युवकांची मने देशसेवेकडे वळवणे, अशी अनेक कामे तात्याराव करीत होते. त्यांच्या प्रावीण्यदर्शक व्याख्यानांनी प्रभावित होऊन पुष्कळ तरुण ‘अभिनव भारत`च्या कार्यात सहभागी होऊ लागले. पुढच्या अडीच महिन्यांमध्ये त्यांनी ‘जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण` या मूळ इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर पूर्ण केले.
 
 

savarkar 
 
 
एवढ्यावरच सावरकर थांबले नाहीत, तर पुढे लगेचच ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर` हे पुस्तक त्यांनी लिहिले. मात्र, ब्रिटिशांना याचा आधीच सुगावा लागल्याने इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पुस्तकावर प्रकाशनापूर्वीच बंदी लावण्यात आली. तरीही मोठ्या हुशारीने ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्याच वेळेस भारतात पाठविण्यासाठी शस्त्रास्त्रांची व्यवस्था करणेसुद्धा सुरू होते. हे असे एक नव्हे, अनेक कार्य सावरकर करत होते. मात्र, यातले अनेक मुद्दे ब्रिटिशांनी पुढे त्यांच्या विरोधात वापरले. याच सुमारास स्टुटगार्ट, जर्मनी येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेमध्ये भारताचा स्वतंत्र ध्वज फडकाविणे, हा त्यांच्या राजनीतीचा एक मोठा भाग होता. मादाम भिकाजी कामा यांनी तिथे ध्वज फडकावून इतिहास घडवला. पुढच्या वर्षात सावरकरांनी १८५७च्या स्वातंत्र्यलढ्याची पन्नाशी साजरी करण्याकरिता भव्य असा कार्यक्रम आयोजित केला. ज्या लढ्याला ब्रिटिशांनी विश्वासघाताचा रंग दिला होता, तो बदलून लोकांमध्ये त्या लढ्याबद्दल अभिमान बाणवला गेला. ‘अभिनव भारता`च्या निमित्ताने सावरकरांनी रशिया चीन, आयर्लंड आणि इजिप्तमधल्या क्रांतिकारकांशी संवाद प्रस्थापित केला होता. त्यांच्या व्यापक अशा दृष्टिकोनामुळे या संपर्काचा उपयोग पुढे शस्त्रविद्या शिकण्यासाठी आणि भारतात गुप्तरीतीने शस्त्र पाठवण्यासाठी झाला.
 
 
 
दि. १ जुलै, १९०९च्या रात्री ८च्या सुमारास मदनलाल धिंग्रा या युवकाने कर्झन वायलीला चार गोळ्या घालून ठार केले. मदनलाल धिंग्रा यांचे प्रेरणास्थान अर्थात सावरकर होते. वायलीच्या मृत्यूनंतर धिंग्रा यांनी केलेल्या कृत्याच्या निषेधात एक सभा भरली. धिंग्रा यांच्या विरोधात ठराव मान्य होणार इतक्यात त्या सभेत एक आवाज गरजला, ''No! Not unanimously!'' आणि ठरावाला सर्वसंमती मिळाली नाही. त्या एका वाक्याने सभेचे उद्दिष्ट तर असफल झालेच, पण त्याचबरोबर सावरकरांनी त्यांची बाजू तिथल्या वृत्तपत्रांनादेखील मान्य करायला भाग पाडले. १७ जुलैला धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. याच सुमारास बाबारावांना (सावरकरांचे थोरले बंधू) देशद्रोहाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. त्या धक्क्यातून सावरकर सावरायच्या आतच त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली की, त्यांचा चार वर्षांचा मुलगा प्रभाकर गेला. या अशा परिस्थितीत सावरकरांचे मन अत्यंत विषण्ण झाले होते. त्या मन:स्थितीत असताना ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर, तात्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि चित्तातल्या तीव्र भावना जणू शब्दांचे रूप घेऊन मुखातून प्रकट झाल्या- ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...` मनावर झालेल्या जबरदस्त आघाताचे रूपांतर ‘न्युमोनिया` आणि ‘क्युट ब्रोंकायटिस`सारख्या शारीरिक आजारांमध्ये झाले.
 
 
 
म्हणून वायुपालटासाठी सावरकर फ्रान्सला आले. भारतात मात्र त्या वेळेला एकच बातमी फिरत होती - अनंत लक्ष्मण कान्हेरे या तरुणाने दि. २१ डिसेंबर, १९०९ ला जॅक्सनवर गोळ्या झाडल्याची. ज्या पिस्तुलाने गोळ्या मारल्या होत्या ते भारतात पोहोचवण्यात सावरकरांचा सहभाग असल्याने ब्रिटिश सरकारने तातडीने त्यांच्या नावाने वॉरंट जारी केला. कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली आहे, हे कळताच सावरकरांनी लंडनला परतण्याचा निश्चय केला. हे धाडस त्यांनी पूर्ण विचारांती केले होते, हे त्यांच्या पुढील निर्णयांवरून लक्षात येते. लंडनमध्ये अटक होऊन ज्या वेळेला सावरकरांना खटल्यासाठी भारतात नेण्यात येणार होते, त्याच्या आदल्या दिवशी सावरकरांनी व्ही. व्ही. एस अय्यर यांना, `आपण मार्सेलिसच्या दक्षिण किनाऱ्यावर भेटू` हे गुप्तपणे सांगितले होते. दि. ८ जुलै, १९१० ला सावरकरांनी ‘मोरिया` या नावेवरून स्वतःला अपरिचित समुद्रात झोकून दिले. ‘पोर्ट होल`मधून निघताना झालेल्या अनेक जखमा शरीरावर घेऊन त्यांनी खाऱ्या पाण्यात उडी मारली आणि तब्बल नऊ फूट उंचीचा धक्का चढून हा अविश्रांत योद्धा फ्रान्सच्या भूमीवर आला. पण, काही कारणाने अय्यर व मादाम कामा यांना तिथे पोहोचायला उशीर झाला आणि अवैधरित्या सावरकरांना पुन्हा अटक करून बोटीवर नेण्यात आले. मात्र, सावरकरांच्या या जलदिव्यामुळे पहिल्यांदाच भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर आला आणि सावरकरांसोबत जे झालं तो अन्याय होता, हे न्यायालयाला मान्य करावे लागले.
  
शेवटपर्यंत ब्रिटिश शासन, मुस्लीम लीग, काँग्रेस आणि अहिंसेच्या मार्गाने संभ्रमित झालेला हिंदू अशा अनेक आघाड्यांवर तात्याराव एकटे झुंजत होते, असा हा विरळा महापुरुष ज्याने पडतील ते कष्ट सोसत, अविरत ‘भारतभू`ची सेवा केली, राष्ट्रहितासाठी स्वतःच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी केली आणि तरीही नावलौकिक मिळवण्याची इच्छा ज्याच्या मनाला शिवली नाही, अशा सावरकरांनी दि. २६ फेब्रुवारी, १९६६ या दिवशी प्रायोपवेशन करून मुंबई येथे देह ठेवला. आचार्य अत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे, `‘गेल्या दहा हजार वर्षांत असा युगपुरुष झाला नाही आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही,” असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर!
 
 
- अवनी करंदीकर
 
Powered By Sangraha 9.0