जानेवारी 1924 रोजी स्वा. सावरकरांची येरवड्याच्या तुरुंगातून मुक्तता झाली. मात्र, इंग्रजांच्या दोन अटी होत्या.
1) राजकारणात भाग न घेणे.
2) आणि फक्त रत्नागिरीमध्येच राहाणे.
येथून सावरकरांचे ‘रत्नागिरी पर्व’ सुरू होते. हे पर्व अर्थात त्यांच्या सामाजिक कार्यांनी ओतप्रोत भरलेले पर्व आहे. मात्र, समाजसुधारणेची ही संकल्पना स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये अगदी बालपणापासून भिनलेली होती. ज्याकाळी ’वेगवेगळ्या जातीतील लोक एकमेकांच्या स्पर्शाने बाटले जातात,’ अशा बिनबुडाच्या खुळचट कल्पना रूढ होत्या, अशा काळात राणूशेट शिंपी यांची मुलं परशुराम व राजाराम, वामनराव धोपावकर, भिकू वंजारी ही विविध जातीतील मंडळी सावरकरांची स्नेही होती. यांच्या घरी जाऊन सावरकर आनंदाने सहभोजन करीत, त्यांना आपल्या घरी बोलावत. सावरकरांनी जातिवादाच्या भिंती तोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांनी ’संगीत उ:शाप’(नाटक), ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘क्ष-किरणे’, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कथा, कविता’ अशा विविध वाङ्मयातून आपल्या सामाजिक विचारांचा प्रचार-प्रसार केला. त्यांचे सामाजिक कार्य फक्त लिखाणापुरते मर्यादित नसून, प्रत्यक्ष कृतीनेदेखील ते त्यांनी अमलात आणले. जातीव्यवस्था नष्ट करायची असेल, तर भारतीय समाज जो सात बेड्यांमध्ये बंदिस्त आहे, त्या बेड्या तोडणे अतिशय आवश्यक आहे, असे सावरकरांचे मत होते.
प्रसिद्ध चरित्रकार धनंजय कीर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेल्या चरित्रात म्हणतात, ''At last therefore Gandhi was a social reformer while Savarkar and Ambedkar were social revolutionaries. A reformer rebuilds the old structure, whereas revolutionary blows up the old building and build up a new one. (1-59)''
तसेच, सावरकरांनी सांगितलेल्या सप्तबेड्या तोडणे म्हणजे या समाजपरूपी इमारतीचा नवीन मजला बांधणे होय, या बेड्या पुढीलप्रमाणे:
1) स्पर्शबंदी : स्पर्श झाल्याने विटाळ होतो, धर्म लयास जातो, अमक्याने तमक्याला स्पर्श करू नये, एखाद्याची सावली पडली, तर बाटले जाऊ, यांसारख्या भ्रामक कल्पनांवर सावरकरांनी सडेतोड टीका केली. सावरकर म्हणतात,”जर त्यांच्या स्पर्शाने तुम्ही बाटले जात असाल, तर तुम्हाला आणि त्यांना बनवणारा तुमचा देव हा आधीच बाटला गेला आहे.”
2) रोटीबंदी : आधीच सांगितल्याप्रमाणे सावरकरांचे बालपणीचे स्नेही विविध जातीतील होते, हे एकमेकांकडे जाऊन सहभोजन करीत असत. कुठलेही विचार लोकांपर्यंत पोहोचवण्या अगोदर ते स्वतः
अंमलात आणीत, परधर्मीयांसोबत बसून जेवल्यावर देखील तुमचा धर्म बाटत नाही. धर्माचे स्थान पोटात नसून हृदयात असते. जे रुचेल जे पचेल, ते जगात कोणीही केलेले असेल ते कुठेही आणि कोणाबरोबरही खुशाल खा, हे त्यांचे विचार. इतकेच नव्हे, तर श्रीमंत भागोजीशेठ कीर यांनी आयोजित केलेल्या सहभोजनाच्या कार्यक्रमात सावरकरदेखील उपस्थित होते. दि. 2 मे, 1938 रोजी पुण्यात झालेल्या या सहभोजन कार्यक्रमात तब्बल एक हजार (विविध जातींचे) लोक उपस्थित होते. सावरकरांच्या मार्गदर्शनात आणि पुढे त्यांच्या देखरेखीखाली अनेक ठिकाणी सहभोजनाचे कार्यक्रम होऊ लागले. एका दगडात दोन पक्षी मारावे तसे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्शबंदी आणि रोटीबंदी या दोन्ही बेड्या एकत्रीत मोडीत निघाल्या.
3) वेदोक्तबंदी - ज्या हिंदूला वेदाध्ययनाची इच्छा असेल, त्यास ते करता आले पाहिजे, मग तो कुठल्याही जातीचा असो. धर्माच्या नावावर होणारे अनिष्ट कर्मकांड आणि स्पृश्यांची पूर्वस्पृश्यांवर (सावरकर ‘अस्पृश्य’ऐवजी ‘पूर्वास्पृश्य’ म्हणत) होणारी दंडबाजी बंद झाली पाहिजे. खरा वैदिक धर्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. फक्त या गोष्टी केवळ बोलून न दाखवता त्यांनी कृतीदेखील केली. सावरकरांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे दि. 19 मे, 1929 रोजी भरलेल्या पूर्वस्पृश्य परिषदेत पूर्वस्पृश्यांना वेदाध्ययनाचा अधिकार दिला आणि यज्ञोपवित (जानवे) यांचेदेखील वाटप केले.
4. सिंधुबंदी - या बेडीस सावरकर कृतिशीलतेने तोडतात. वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी ते सिंधुबंदी मोडून लंडनला गेले. तेथे शिक्षणाबरोबर अनेक देशहित कार्यही केले.
5. व्यवसायबंदी - जात ही मुळात ’जन्मजात’ नसून ती ’पोथीजात’ असते, असे ते सांगत. हिंदू धर्मातील थोतांडवर सावरकर कडाडून टीका करीत. पोथीजात चार वर्ण आणि त्यातून आपण जन्माला घातल्या शेकडो जाती आणि पुढे त्यांच्या हजारो पोटजाती, सगळ्या व्यवसायांशीच निगडीत. रत्नागिरीत पूर्वास्पृश्य कलावंतांना एकत्र करून ‘हरिजन भजन मंडळ’ सुरू केले. मंदिरात त्यांच्या भजनाचे कार्यक्रम होत असे. इतकेच नव्हे, तर बँकेमधून कर्ज काढून पूर्वस्पृश्य बॅण्ड सुरू केले. 1929 पासून सुरू केलेल्या अखिल हिंदू गणेशोत्सवामधील भंगी बुवांचे कीर्तन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असे, हरिजन भजन मंडळ, महिलांची प्रकट भाषणे इत्यादी सुधारणा त्यांनी घडवल्या.
6. शुद्धिबंदी - ही बंदी मोडणे अतिशय आवश्यक असे सावरकर सांगतात. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना स्वधर्मात येण्याची इच्छा असल्यास त्यांना आनंदाने परत आणावे. सावरकर सांगतात बळजबरीने किंवा नाईलाजाने झालेले धर्मांतरण यामुळे होणारे नुकसान तत्काळ दिसत नसले तरी भविष्यात याचे पडसाद फार वाईट आणि भयंकर असतात. शेवटी संख्याबळ हेदेखील एक बळ आहे. शुद्धीकार्य सावरकरांनी अविरत सुरू ठेवले.
7. बेटीबंदी - आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विवाहासाठी जात हा निकष असू नये. गुण, शील, प्रीती, आरोग्य या गोष्टी अनुरुप आहेत का, हे पाहावे.
या सात बेड्या तोडून भारतीय समाजाची नवीन इमारत उभी राहावी, हे सावरकरांचे स्वप्न होते. या सातबंदीच्या बिमोडामध्येच भारतीय समाजाचे हित दडले आहे. अखिल हिंदूंना एकत्र पद्धतीने देवदर्शन करता यावे, याकरिता भागोजीशेठ कीर यांच्यासह 1931 ला रत्नागिरीमध्ये पतितपावन मंदिराचे निर्माण केले. 1925 ला असेच कार्य शिरगावच्या गुरव समाजातील एक सद्गृहस्थ महादेव लक्ष्मण यांनी केले. सर्व जातीकरिता त्यांनी मंदिर बांधले. तेथे श्री हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यासाठी सावरकर यांना आमंत्रित केले. ‘देव हा दर्शनाने बाटत नाही. जर तो बाटत असेल, तर तो देवच नव्हे,’ हे कृतिशीलरित्या सावरकरांनी दाखवून दिले.
सावरकरांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयी अनेक मान्यवरांनी गौरवोद्गार काढले आहेत.
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात, त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे. जर अस्पृश्यवर्ग हिंदू समाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल, तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही. चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे. ज्या थोड्या लोकांना याची आवश्यकता पटली आहे, त्यापैकी आपण एक आहात, हे सांगावयास मला आनंद वाटतो.” (स्वातंत्र्यवीर सावरकर - धनंजय किर पृ. 202)
2. महर्षी वि. रा. शिंदे सावरकरांना उद्देशून म्हणतात की, ‘’ही सामाजिक क्रांतीची चळवळ यशस्वी झालेली पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की, देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांसच (सावरकरांना) द्यावे.” (सत्यशोधक - दि. 5 मार्च, 1933)
3. प्रबोधनकार ठाकरे सावरकरांविषयी म्हणतात की, ‘’हिंदूंची संघटना होणे अवश्य आहे, हा सिद्धांत पटल्यावर जात्युच्छेदनाचा कार्यक्रम कितीही तापदायक असला तरी तो हाताळल्याशिवाय गत्यंतर नाही. या दृष्टीने सावरकरांचे प्रयत्न अभिनंदनास पात्र आहेत.” (स्वराज्य, मुंबई - दि. 2 सप्टेंबर, 1936)
या विभूतींव्यतिरिक्त मागासवर्गीय नेते पतितपावनदास अर्थात केशव नारायण, पुण्यातील मागासवर्गीय पुढारी पां. ना. राजभोज, भाई बागल, अस्पृश्य नेते श्री सोनवणे यांनी सावरकरांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे.
देशाचा विकास व्हावा, देश एकजूट राहावा, सामाजिक समरता यावी, यासाठी सचोटीने सावरकर यांनी प्रयत्न केले. टीका करणारे त्यांच्यावर बिनबुडाच्या टीका करत राहतील. पण, सावरकरांचे सामाजिक सुधारणेचे अंतरंग समजून घेणे आणि त्यांचा प्रचार-प्रसार करणे ही आज काळाची गरज आहे, हे आपण विसरता कामा नये.
akshay2smishra@gmail.com
- अक्षय मिश्रा