सावरकरांचे हिंदुत्व अपप्रचार आणि वास्तव

27 May 2022 19:53:44

savarkar 9
 
 
 
 
 
 
सावरकरांचे हिंदुत्व अपप्रचार आणि वास्तव‘हिंदुत्व’ ही एक सामाजिक-राजकीय संकल्पना आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे, तर हिंदूंच्या न्याय्य, नागरी आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण म्हणजे ‘हिंदुत्व.’ फक्त हिंदूंच्याच न्याय्य, नागरी आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण करा, असे सावरकर कधीही म्हणालेले नाहीत.
 
 
 
हिंदू शब्दांची व्याख्या
आसिंधु सिंधु पर्यन्ता,
यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥
 
 
 
अर्थात, सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत ही भारतभूमी ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो ‘हिंदू.’ ‘पितृभू’ म्हणजे केवळ वडिलांची भूमी नव्हे. ‘पितृभू’ म्हणजे पितर किंवा वाडवडिलांची भूमी, यात आई-वडील, आजी-आजोबा या सगळ्या पितरांचा समावेश होतो. म्हणून ‘मातृभू’ऐवजी ‘पितृभू’ शब्द योजिला आहे. ज्या धर्मांचा या भूमीत उगम झाला आहे, ज्यांचे तत्त्ववेत्ते, ऋषी, अवतार, धर्मगुरू, धर्मप्रणेते या भूमीत जन्मले, त्यांना ही भूमी तीर्थभूमी वाटते आणि त्यांची तशी निष्ठा असते. त्याला सावरकरांनी ‘पवित्रभू’ किंवा ‘पुण्यभू’ असे नाव दिले आहे.
 
 
 
‘पितृभू’ आणि ‘पुण्यभू’ हे दोन्ही निकष जो एकाचवेळी एकत्र पूर्ण करेल तो ‘हिंदू.’ सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदू, बौद्ध, नवबौद्ध, जैन, शीख, लिंगायत, आर्यसमाजी, ब्राह्मोसमाजी, प्रार्थनासमाजी इत्यादी सर्व हिंदू ठरतात, इतकंच काय निधर्मी, कुठलाच धर्म न मानणारे, नास्तिकही हिंदू ठरतात. ‘हिंदू विवाह कायदा १९५५’ कलम-२ आणि भारतीय संविधानाच्या कलम-२५(२)(ब) सावरकरांच्या व्याख्येत समाविष्ट असणार्‍या वरील सर्व पंथांनाच लागू होतात. म्हणजे सावरकरांचे नाव न घेता सावरकरांची व्याख्या अप्रत्यक्षपणे मान्य केलेली आहे.
 
 
 
‘पुण्यभू’ हा शब्द म्हणे सावरकरांनी मुस्लिमांना वगळण्यासाठी योजिला आहे, असा काहींचा आक्षेप आहे. मुळात ‘हिंदुत्व’ ही ‘हिंदू कोण?’ची व्याख्या आहे. मग त्यात मुसलमानांना वगळण्याचा प्रश्न येतोच कुठे? त्यांना वगळलं नाही, तर ते वगळले जात आहेत व मुसलमानही ‘आम्हाला हिंदुत्वात समाविष्ट करून घ्या,’ असे म्हणत नाहीत. कारण, ती भारतीय नागरिकत्वाची किंवा देशभक्तीची व्याख्या नाही. हिंदुत्वाच्या कक्षेत न येणारे मुसलमान व इतर अहिंदू हे भारतीय नागरिक व देशभक्त आहेत. ते हिंदू नाहीत, पण भारतीय आहेत. बरं, फक्त मुसलमान वगळले गेलेत का? तर नाही. ख्रिश्चन, पारशी व ज्यू हेही वगळले गेलेत. तसेच, समाजशास्त्रीय व्याख्या कधीही काटेकोर नसते. त्याला अपवाद असतातच, पण अपवाद म्हणजे नियम नव्हे.
 
 
 
त्यामुळे ज्यांची ‘पुण्यभूमी‘ या देशात नाही, ते हिंदू नाहीत, इतकंच सावरकरांना म्हणायचे आहे. मुसलमानांना किंवा अहिंदूंना सावरकरांनी नागरिकत्व नाकारलेले नाही किंवा ते देशभक्त नाहीत, असेही सावरकर कुठे म्हणालेले नाहीत. इंग्लंड-अमेरिकेत स्थायिक झालेले हिंदू त्या त्या देशाचे नागरिक होऊ शकतात. भारताबाहेर स्थायिक झालेली हिंदू कुटुंबातील दुसर्‍या, तिसर्‍या पिढीतील मुले, त्यांचे वडील जरी भारताबाहेर जन्मले तरी त्यांच्या वाडवडिलांची भूमी भारत असल्यामुळे ते हिंदूच ठरतात. ‘हिंदू कोड बिल’ ज्यांना लागू आहे तेच सर्व सावरकरांच्या व्याख्येनुसार ‘हिंदू’ ठरतात. म्हणजे, सावरकरांचे नाव न घेता नकळतपणे हिंदुत्वाची व्याख्या घटनेला अनुरूप आहे. सावरकरांची व्याख्या अव्याप्ती आणि अतिव्याप्तीच्या दोषापासून मुक्त आहे.
 
 
 
‘हिंदुत्व’ म्हणजे ‘हिंदू धर्म’ नव्हे. ‘हिंदुत्व’ ही धार्मिक किंवा आध्यात्मिक संकल्पना नाही. ‘हिंदुत्व’ ही एक ऐहिक, राजकीय व सामाजिक संकल्पना आहे, याला सावरकरांनीच ‘हिंदू राजकारण’(कळपर्वी झेश्रळीूं) हा समर्पक इंग्रजी शब्द सुचवला आहे. ‘हिंदुत्व’ म्हणजे इंग्रजीमध्ये ‘कळपर्वीपशीी’ किंवा मराठीत ’हिंदूपणा.’ ‘हिंदुत्व’ ही एक सामाजिक-राजकीय संकल्पना आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे, तर हिंदूंच्या न्याय्य, नागरी आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण म्हणजे ‘हिंदुत्व.’ फक्त हिंदूंच्याच न्याय्य, नागरी आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण करा, असे सावरकर कधीही म्हणालेले नाहीत.
 
 
 
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या २१व्या कोलकाता अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकर म्हणतात, “हिंदू संघटनवादी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार सर्व नागरिकांना समान अधिकार नि कर्तव्ये राहतील. मग त्यांची जात, पंथ, वंश वा धर्म कोणतेही असोत. मात्र, त्यांनी या हिंदुस्थानच्या राज्याशी पूर्णपणे एकनिष्ठ आणि कृतज्ञ राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. भाषण, विचार, धर्म नि संघ इत्यादी संबंधीचे स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना सारखेच उपभोगता येतील. हिंदुस्थानची भावी राज्यघटना या व्यापक तत्त्वांवर आधारण्यात येईल... सामान्य हिंदी राष्ट्राच्या वाढीशी हिंदूराष्ट्राची कल्पना कोणत्याही प्रकारे विसंगत नाही,” तर १९व्या कर्णावती अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणतात, “हिंदी राज्य मात्र, निर्भेळ हिंदीच असू द्या. कोणताही मनुष्य हिंदू आहे की, मुसलमान आहे की, ख्रिस्ती आहे की, ज्यू आहे, इकडे लक्षच दिले जाऊ नये.
 
 
 
त्या हिंदी राज्यातील सर्व नागरिक सर्वसामान्य लोकसंख्येतील त्यांची धार्मिक किंवा जातीय शेकडेवारी विचारात घेतली न जाता, त्यांच्या वैयक्तिक गुणावगुणानुसार वागविले जाऊ द्यात... कोणतीही जाती किंवा पंथ, वंश आणि धर्म विचारात न घेता ‘एक मनुष्य एक मत’ असा सर्वसामान्य नियम होऊ द्या, अशा स्वरूपाचे हिंदी राज्य जर दृष्टीपुढे धरावयाचे असेल, तर हिंदू संघटनवादी स्वतः हिंदू-संघटनांच्याच हितार्थ त्या राज्याला अंतःकरणपूर्वक पाहिल्याने आपली निष्ठा अर्पितील. मी स्वतः व मजप्रमाणेच सहस्रो ‘हिंदूमहासभा’वाले यांनी आपल्या राजकीय चरिताच्या प्रारंभापासून अशा हिंदी राज्याचा आदर्श आमचे राजकीय साध्य म्हणून सतत दृष्टीपुढे ठेविलेला आहे आणि आमच्या जीविताच्या अंतापर्यंत त्याच्या परिपूर्तीकरताच संघर्ष करणे आम्ही चालूच ठेवणार.” म्हणजे सावरकरांनी धर्म, वंश, जात, पंथ यावरून भेदभाव केला जाणार नाही, असे सांगून सर्व मानव एकसमान म्हणजे मानवतेचा पुरस्कार केला आहे.
 
 
 
हिंदी नागरिक या नात्याने प्राप्तव्य असेल, त्याहून काहीही अधिक हिंदू मागत नाही. ”आम्ही हिंदू या देशात प्रचंड बहुसंख्येने आहोत; तथापि हिंदूजगतासाठी म्हणून आम्ही कोणतेही विशेषाधिकार मागत नाही.” म्हणजे सावरकर बहुसंख्याकांना जे अधिकार मागत होते, तेच अल्पसंख्याकांना देत होते, कोणालाही संख्याबळानुसार विशेषाधिकार देत नव्हते व काढूनही घेत नव्हते. “अल्पसंख्याकांचा धर्म, संस्कृती नि भाषा त्यांच्या संरक्षणाची हमी आम्ही त्यांना केव्हाही देऊ, पण तद्वतच आपलाही धर्म, संस्कृती नि भाषा रक्षिण्याच्या हिंदूंच्या समान स्वातंत्र्यावर त्यांचे होणारे कोणतेही अतिक्रमण आम्ही यापुढे सहन करणार नाही. जर अहिंदू अल्पसंख्याकांचे रक्षण व्हावयाला पाहिजे, तर हिंदुस्थानातील कोणत्याही अतिक्रामक अल्पसंख्याकांपासून बहुसंख्य हिंदूंचेही रक्षण निश्चितपणे झालेच पाहिजे.
 
 
 
सर्व धर्माच्या लोकांना धर्मपालन व धर्मसंरक्षण करायचा अधिकार दिला आहे.” आता सांगा, सावरकरांची ‘हिंदूराष्ट्र’ संकल्पना धर्मनिरपेक्ष किंवा इहवादी भारतीय राज्यघटनेच्या/संविधानाच्या विसंगत नाही, तर मग सावरकरांचे ‘हिंदुत्व/हिंदूराष्ट्र’ कसे काय देशाला घातक ठरेल? भारतीय राज्यघटना व सावरकरांनी वर्णिलेले ‘हिंदूराष्ट्र’ यात कायदेशीरदृष्ट्या काय फरक आहे? आमच्या स्वप्नातील ‘हिंदूराष्ट्रा’चे निर्बंध वेगळे असतील, असे सावरकर कधीही म्हणाले नाहीत. कारण, आजचा भारत व भारताचे संविधान हेच सावरकरांचे ‘हिंदूराष्ट्र’ आहे. त्यामुळे ‘हिंदूराष्ट्र’ निर्माण करण्याची आवश्यकताच नाही, केवळ आहे त्या नियमांची कोणाचाही अनुनय न करता योग्य व न्याय्य अंमलबजावणी व्हावी, इतकीच अपेक्षा आहे. तसेच, सावरकरांचा ’भारत’ शब्दालाही आक्षेप नाही, जसे भारताला ‘हिंदुस्थान’ व ‘भारत’ या इतर नावानेही संबोधितो, त्याच अर्थाने सावरकर ’हिंदूराष्ट्र’ नावाचा उल्लेख करतात व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हिंदुत्वाच्या व्याख्येतही सावरकर ’यस्य भारतभूमिका’ शब्द वापरतात ’यस्य हिंदूराष्ट्र भूमिका’ किंवा ’यस्य हिंदुस्थान भूमिका’ असे म्हणत नाहीत.
 
 
 
‘हिंदू कोण?’ची व्याख्याही त्यांनी तत्कालीक गरज म्हणून केली होती. ‘’एखाद्या भविष्यकाळी ’हिंदू’ हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबद्ध असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म ’वाद’ म्हणून न राहता, ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील, अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी, अशा या सिद्धीची पहिली रेखासुद्धा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युद्धघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही, तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.” (समग्र सावरकर वाडमय खंड ६, समग्र सावरकर वाडमय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभा, पुणे, १९६५, पृष्ठ ५४) भविष्यात ‘हिंदू’ शब्दाचे ‘पितृभू-पुण्यभू’ निकष शिथिल करायचीही त्यांची तयारी होती.
 
 
 
पण, अजून मानवराज्याचे स्वप्न साकार झालेले नसतानाही सध्याच्या या भौतिक नि स्वार्थी जगात हाच सिद्धांत योग्य आहे, असा त्यांना विश्वास होता. कारण, ‘’जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे, असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण, आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद ५०० वर्षे तरी जीवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल.” (सावरकर, शां. शि. तथा बाळाराव. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व, वीर सावरकर प्रकाशन, १९७६, पृष्ठ २०१) ‘’मानवजातीचे ऐक्य साधण्याचा पक्ष मांडण्यापूर्वी, एक राष्ट्रीय किंवा सामाजिक संघ टिकून राहण्यास आपण सर्वसमर्थ आहोत हे तुम्ही आधी सिद्ध करून दाखविले पाहिजे.” (समग्र सावरकर वाडमय खंड ६, समग्र सावरकर वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभा, पुणे, १९६५, पृष्ठ २८४) म्हणून सावरकरांचे ‘हिंदुत्व’ आणि ‘राष्ट्रवाद’ हे मानवतावादाशी सुसंगत व अविरोधी आहेत. सावरकरांनी जागतिक शासननिर्मिती, मानवता हा एकच धर्म, पृथ्वी हे एकच राष्ट्र हे सर्व राजकारणाचे व समाजकारणाचे अंतिम ध्येय सांगितले होते. सावरकरांच्या विचारांचा हाच गाभा होता. त्यामुळे सावरकरांचे विचार आजही मानवतेसाठी अत्यावश्यक आहेत.
 
 
 
 
- अक्षय जोग
Powered By Sangraha 9.0