शतपैलू सावरकर...

    27-May-2022
Total Views | 155

Swatantraveer Savarkar
 
 
 
'कालजयी’ म्हणजे ज्यांची काही किंवा बहुतांश तत्त्वे किंवा धोरणे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरदेखील काही शतके आचरणीय किंवा अनुकरणीय असतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशाच महापुरुषांपैकी एक! असामान्य व्यक्ती काळाच्या दोन पावलं पुढे असतात; पण सावरकरांसारखे महापुरुष काळाच्या १०० पावले पुढे असतात. सावरकरांनी वर्तविलेले भविष्य काही दशकांनी सत्यात उतरल्यावर सामान्य व्यक्तीला त्याची प्रचिती येते. इतिहास आणि वर्तमानाचे तटस्थ, चिकित्सक आणि बुद्धिवादी दृष्टिकोनातून केलेले अध्ययन, सूक्ष्म आकलनशक्ती नि त्याचे वास्तववादी भूमिकेतून केलेले विश्लेषण, यामुळे सावरकर ‘द्रष्टे’ ठरतात. ‘सावरकर विचार पचणे अशक्य’, ‘सावरकरवाद अमलात आणणे कठीण’ अशी विविध कारणे काहीजण देतात; पण प्रत्यक्षात नकळतपणे ते सावरकरवादच आचरणात आणत असतात.
 
 
 
‘हिंदुत्व’ देशाच्या केंद्रस्थानी आल्यापासून सावरकरांवरील टीकेत वाढ झाली आहे. हिंदुत्व विचारांना पराभूत करण्यासाठी ‘हिंदुत्व’ ज्या पायावर उभे आहे, त्या हिंदुत्वाचे प्रणेते आणि हिंदुत्व चळवळीचा वैचारिक पाया मानल्या जाणार्‍या सावरकरांवर सतत आक्षेप घेतले जातात. आक्षेपांना कितीही उत्तरे दिली तरी विरोधकांचे समाधान होणार नाही, याची कल्पना आहे. पण, या आरोपांमुळे प्रामाणिक लोकांच्या, अभ्यासकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतात. सावरकरांसारख्या महापुरुषाविषयी असा संभ्रम निर्माण होणे हानिकारक आहे. कारण, देशातील नागरिकांमध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी जे घटक कारणीभूत ठरतात, त्यामध्ये ‘महापुरुष’ हाही एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे सावरकरांविषयीचे संभ्रम दूर करण्यासाठी या विशेषांकाची योजना केली आहे. नवीन लेखकांनी सावरकर विचारांचे अध्ययन करून त्यासंदर्भातील आपले विचार लेखरुपात मांडावेत, जेणेकरून ते विचार वाचले जातील, मांडले जातील आणि त्यावर चर्चा होईल, हाच या विशेषांकामागचा उद्देश. या नवलेखकांना एक मोठे व्यासपीठ मिळवून देऊन सावरकर विचार व कार्याचा अभ्यास, चिंतन, मनन आणि लेखन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’ने सुरू केलेल्या उपक्रमाचे हे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
 
 
 
शतपैलू सावरकरांच्या काही पैलूंची या विशेषांकात लेखस्वरुपात ओळख करुन दिली आहे. सावरकरांचे विचार व कार्य हे आजही राष्ट्राला व आपल्याला वैयक्तिक जीवनातही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे असे हे मौलिक विचार जनसामान्यांपर्यंत व त्यातही विशेष करून युवावर्गापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, आजची युवापिढी उद्याच्या भारताचे भविष्य आहे. पण, सावरकर विचार युवावर्गापर्यंत पोहोचायचे असतील, तर युवावर्गाला समजेल अशा साध्या, सोप्या, सुटसुटीत व युवावर्गाच्या भाषेतच ते समजावून सांगायला हवेत. म्हणून मुख्यत्वे युवा लेखक-लेखिकांची या विशेषांकासाठी निवड करण्यात आली आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मागील चारही ‘कालजयी सावरकर’ विशेषांकाला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता, असाच प्रतिसाद यावर्षीच्या ‘कालजयी सावरकर २०२२’ विशेषांकांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. या उत्तम उपक्रमासाठी आणि मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, मुख्य उपसंपादक (फीचर्स) विजय कुलकर्णी व सर्व सहकार्‍यांचे खूप खूप आभार...!
 
 
- अक्षय जोग
अतिथी संपादक
 
 
अग्रलेख
जरुर वाचा