स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रभावळीतील क्रांतिकारक!

    27-May-2022
Total Views | 107

savarkar 8
 
 
 
 
  
१८५७ च्या सशस्त्र उठावानंतर मधल्या काही काळात असाहाय्य, असंघटित आणि अज्ञानी जनतेत स्वधर्म आणि स्वराष्ट्राविषयी स्वाभिमानाच्या अभावामुळे कुठल्याही स्तरावरून स्वातंत्र्यार्थ प्रयत्न करण्यात आला नाही. परंतु, स्वातंत्र्याच्या उपजत लालसेमुळे काहींच्या हृदयात उद्रेक होऊन त्यांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटली. महाराष्ट्रातून वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, परांजपे, चापेकर यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी जनसामान्यांत जुलमी इंग्रज राजसत्तेविरुद्ध प्रक्षोभ निर्माण केला. यांची प्रेरणा घेऊन सावरकरांनी सशस्त्रक्रांतीची शपथ घेतली. त्यांच्या या अलौकिक व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या भोवती अनेक गुणी लोकांचे वलय निर्माण झाले.
 
 
 
मदनलाल धिंग्रा
 
१९०६च्या वर्षाअखेरीस सावरकरांनी ‘फ्री इंडिया सोसायटी`ची स्थापना करून एकप्रकारे `अभिनव भारता`चे कार्य चालू ठेवले, तेही थेट शत्रूच्या शिबिरात, लंडनमध्ये! लाला हरदयाळ, भाई परमानंद, एम. पी. टी. आचार्य, पांडुरंग महादेव बापट, सरदारसिंह राणा, सिकंदर हयात खान, असफअली, अय्यर असे अनेक क्रांतिकारक एकत्र जमू लागले. यांच्यातील आणखी एका तरुणाचे नाव मदनलाल धिंग्रा. १८ सप्टेंबर, १८८३ रोजी अमृतसर येथील एका श्रीमंत घराण्यात जन्मलेला मदनलाल १९०६ साली लंडनला पुढचे शिक्षण घेण्यासाठी आला. तिथेच त्याची आणि सावरकरांनी ओळख झाली. जाज्वल्य देशाभिमान आणि देशासाठी त्यागाची तयारी हे मदनलालचे गुण हेरून सावरकरांनी त्याला ‘अभिनव भारता`त सामील करून घेतले.
 
 
 
धिंग्रा यांच्या देशभक्तीबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल स्वतः सावरकरांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ‘फ्री इंडिया सोसायटी`च्या नियमित बैठकी होत असे. एक दिवस भारत भवनात साप्ताहिक बैठक चालू असताना दुसऱ्या खोलीत मदनलालने ‘ग्रामोफोन`वर मोठ्याने गाणी लावली. याचा त्रास बैठकीला आलेल्या लोकांना झाल्याने सावरकरांनी मदनलालला काही कडवे बोल सुनावले. यानंतर मदनलाल जो भारत भवनाच्या बाहेर गेला तो काही दिवस परत आलाच नाही. अचानक एक दिवस सावरकरांच्या समोर उभा राहिला आणि विचारले, “हौतात्म्य गाजविण्याची वेळ खरोखरच प्राप्त झाली आहे, असे वाटते का तुम्हाला?” या मदनलालच्या प्रश्नाला हुतात्मा मनाने खंबीर व सिद्ध झालेला असेल, तर त्यांत हेही प्रायःगर्भित असते की, “हौतात्म्य गाजविण्याची वेळ प्राप्त झालेली आहे,” हे उत्तर सावरकरांनी दिले.
 
 
 
दि. १ जुलै, १९०९ या दिवशी मदनलालने ‘इम्पिरियल इन्स्टिट्यूट, लंडन` येथे कर्झन वायलीला गोळ्या घातल्या. इंग्रजांच्याच भूमीवर एका इंग्रज अधिकाऱ्याला एका हिंदुस्थानी माणसाने गोळ्या घालण्याचे साहसी कृत्य धिंग्रांनी केले. धिंग्रांच्या या कृत्याच्या निषेधार्थ लंडन येथील ‘कॉक्सटन हॉल`मध्ये एक सभा भरली गेली. परंतु, सावरकरांनी या सभेत धिंग्रांच्या निषेधाचा ठराव संमत होऊ दिला नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी धिंग्रांचे वक्तव्य मधल्या मध्ये दाबून टाकले, जेणेकरून त्यांचा या कृत्यामागचा उद्देश सामान्यांसमोर येणार नाही. परंतु, मूळ वक्तव्य कोणी लिहिले आहे, हे पोलिसांना माहीत नव्हते. सावरकर धिंग्रांच्या वक्तव्याच्या प्रसिद्धीचे नियोजन करू लागले. श्री ग्यानचंद वर्मा यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे आपल्याला असे कळते की, दि. २९-जुलै, १९०९ या दिवशी सावरकर ब्रायटनला निघून गेले आणि नंतर मदनलाल यांचे वक्तव्य प्रसिद्ध करण्याच्या योजनेसाठी त्यांनी ग्यानचंद यांनादेखील तिथे बोलवून घेतले.
 
 
 
काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी अमेरिका, जर्मनी व इतर काही देशांत वक्तव्याच्या प्रसिद्धीची सोय केली आणि धिंग्रांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वी त्यांचे वक्तव्य लंडनच्या बातमीपत्रांत येण्यासाठी डेव्हिड गार्नेट या इंग्रज सहकाऱ्याच्या मदतीने `डेली न्यूज` या वृत्तपत्रात धिंग्रांचे वक्तव्य छापले. १६ ऑगस्ट म्हणजे धिंग्रांना फाशी देण्याच्या अगदी आदल्या दिवशी सकाळी लंडनमध्ये एकच हाहाकार उडाला. कारण, धिंग्रांचे ‘द चॅलेंज` हे पोलिसांनी दाबून ठेवलेले वक्तव्य प्रसिद्ध झाले होते.
 
 
 
“एक हिंदू म्हणून माझी भावना आहे की, माझ्या मातृभूमीशी केलेले गैरकृत्य हे देवाचा अपमान आहे. तिचे कार्य हे प्रभू रामचंद्रांचे कार्य आहे. तिची सेवा ही भगवान श्रीकृष्णाची सेवा आहे. बुद्धिमत्ता आणि शक्ती यांत कमी असलेला माझ्यासारख्या तिच्या पुत्राकडे आपल्या रक्तावाचून तिला समर्पित करण्याजोगे काहीच नाही. म्हणूनच मी तिच्या चरणी माझे रक्त समर्पित करत आहे. ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की, याच मातृभूमीपोटी मी पुन्हा जन्म घ्यावा आणि पुन्हा याच कार्यासाठी बलिदान द्यावे, जोवर माझी मातृभूमी मानवतेच्या भल्यासाठी आणि देवकार्यासाठी स्वतंत्र होत नाही, तोवर हे अविरत सुरू राहावे,” हे असे होते धिंग्रांचे तेजस्वी वक्तव्य!
 
 
 
लाला हरदयाळ
 
पंजाबमध्ये जन्मलेले लाला हरदयाळ हे तैलबुद्धीचे हुशार विद्यार्थी होते. सरकारी शिष्यवृत्ती मिळवून ते पुढचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. पुढे सावरकर लंडनला गेल्यावर “श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याबरोबर भारत भवनात गेले असता-हिंदू विद्यार्थ्यांची चौकशी करत असता हरदयाळ यांचे नाव प्रामुख्याने माझ्यापुढे आले,” असे सावरकरांनी लिहून ठेवले आहे. हरदयाळांच्या मनावर क्रांतिकारी विचारांचा पगडा बसू लागला आणि त्यांनी सावरकरांसमोर सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्लंडची हिंदुस्थानावरची पकड ढिली करण्यासाठी हिंदुस्थानच्या बाहेरून दहशत निर्माण करण्याची हरदयाळांची योजना होती.
 
 
 
सावरकरांच्या सांगण्यावरून क्रांतीच्या तत्त्वांचा हिंदुस्थानात प्रचार करण्यासाठी ते हिंदुस्थानात परत आले आणि पंजाबमध्ये एक आश्रम, ‘न्यू इंडिया सोसायटी`चे केंद्र त्यांनी उघडले. १९०८ मध्ये ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेने हरदयाळ यांच्या भारतातील कारवायांविषयीच्या अहवालात म्हटले आहे की, ''He had been engaged in writing the Indian version of the Mutiny, which, when completed, will be translated in all languages and circulated throughout India.'' म्हणजेच त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, हरदयाळ हे १८५७च्या स्वातंत्र्यसमरावर ग्रंथ लिहीत होते. परंतु, वास्तवात हा ग्रंथ सावरकरांचा एक वर्षापूर्वीच लिहून पूर्ण झाला होता.
 
 
 
हरदयाळ यांच्यावर सरकारी वॉरेंट निघाले. अनेक ठिकाणी स्थलांतर करत अखेर ते इंग्लंडला परतले. नंतर पॅरिसमध्ये राहून त्यांनी `वंदे मातरम्‌‍` हे पत्र सुरू केले. याच काळात सावरकरदेखील पॅरिस येथेच होते. त्यांनी पाठवलेले बॉम्ब, पिस्तुल्स हिंदुस्थानात धडाडू लागल्या आणि कारवाईसाठी देशभक्तांचे छळ होऊ लागले. आपल्या सहकारी, अनुयायांच्या छळाच्या बातम्या ऐकून सावरकर अस्वस्थ होत. हरदयाळ त्यांचे सांत्वन करीत असत. पुढे सावरकरांना अटक होऊन काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि ‘न्यू इंडिया सोसायटी` विस्कळीत झाली.
 
 
 
महायुद्धाचे ढग दाटून आल्यावर इंग्रजांचा शत्रू जर्मनी बरोबर हातमिळवणी करून काही साध्य करता येते का, म्हणून हरदयाळ जर्मनीत गेले आणि तिथून पुढे अमेरिकेत. तेथून ते `गदर` नावाचे वर्तमानपत्र सात भाषांमध्ये चालवू लागले. त्यांतून ते सावरकरांच्या १८५७च्या ग्रंथाचे भाषांतर करून प्रत्येक अंकात प्रसिद्ध करू लागले. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा प्रचार होऊ लागला म्हणून इंग्लंडने अमेरिकेवर दडपण टाकून हरदयाळ यांना पकडण्यास सांगितले. हरदयाळ यांना अटक झाली, पण लवकरच त्यांनी अमेरिकेच्या कैदेतून पलायन केले. १९१४-१९१७च्या काळात लाला हरदयाळ व काही इतर क्रांतिकारकांनी जर्मन सरकारबरोबर मिळून एक कट आखला होता. अंदमानवर हल्ला करून सावरकरांना आणि तेथील सर्व क्रांतिकारकांना मुक्त करून हिंदुस्थानातील इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारायचे. परंतु, मध्येच खिलाफत चळवळीने जोर घेताच बंड उभारण्याची योजना विरून गेली. आपल्या मातृभूमीसाठी आयुष्यभर कष्ट सोसत क्रांतीसाठी झगडणाऱ्या या महान क्रांतिकारकाला शेवटी आपल्या मायभूमीचे दर्शन झालेच नाही!!
 
 
 
डेव्हिड गार्नेट आणि गाय अल्ड्रेड
 
सावरकरांनी ‘अभिनव भारत` संघटनेची स्थापना करून अनेक देशभक्तांना सशस्त्र क्रांतीचा नवीन मार्ग दाखवला. केवळ हिंदुस्थानी तरुण नव्हे, तर आयरिश, रशियन क्रांतिकारकांशी संपर्क करून इंग्रजांविरुद्ध योजना आखल्या. डेव्हिड गार्नेट आणि गाय अल्ड्रेड यांसारख्या ब्रिटिशांनादेखील क्रांतीची प्रेरणा देऊन आपले सहकरी बनवून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील करून घेतले. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना डेव्हिडची काही राष्ट्रभक्त तरुणांशी ओळख झाली. सुखसागर दत्त आणि निरंजन पाल यांच्याबरोबर तो सतत भारत भवनात येऊ लागला आणि त्याची सावरकरांशी ओळख झाली. धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा वध केल्यावर त्यांचे वक्तव्य लंडनच्या बातमीपत्रात प्रसिद्ध होणे अत्यंत गरजेचे होते. `डेली न्यूज` या पत्राचा संपादकीय विभागात काम करणारा रॉबर्ट लिंड हा डेव्हिड गर्नेटच्या ओळखीचा होता.
 
 
 
रॉबर्टच्या मदतीने त्यांनी वक्तव्य रातोरात छापले. सावरकरांना अटक झाल्यावर डेव्हिडने त्यांना कायदेशीर सुटका कशी मिळेल आणि त्यासाठी लागणारा पैसा जमा करण्याचे खूप प्रयत्न केले, ब्रिटिश सरकारच्या न्यायाची थट्टा करणारे लेख प्रसिद्ध केले. गाय अल्ड्रेड हा लंडनमधल्या 'Anarchist' (शासनविरोधक) समूहाचा सदस्य होता. १९०५ मध्ये पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी `इंडियन सोशियालॉजिस्ट` या नावाचे नियतकालिक सुरू केले. १९०७ मध्ये ते पॅरिसला गेल्यावर हे नियतकालिक छापण्याची जबाबदारी गाय अल्ड्रेडकडे आली. धिंग्रांनी लंडनमध्ये आपला पराक्रम गाजवला. त्या वर्षी अल्ड्रेडने ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केलेल्या नियतकालिकात मदनलालचे समर्थन केलेले लेख होते. इंग्रजांची वक्रदृष्टी `इंडियन सोशियालॉजिस्ट` कडे वळली आणि परिणामी गाय अल्ड्रेडला दि. २५ ऑगस्ट, १९०९ या दिवशी अटक झाली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी कारावास भोगणारा गाय अल्ड्रेड हा पहिला इंग्रज होता.
 
 
 
शिक्षा भोगून बाहेर येताच त्याला कळले की, सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याने लगेच इतर क्रांतिकारी सहकाऱ्यांबरोबर `सावरकर डिफेन्स कमिटी` स्थापन केली. त्याने सावरकरांच्या संपूर्ण खटल्याचा अभ्यास सुरू करून इंग्रज सरकार विरुद्ध त्यांच्या न्यायव्यवस्थेविरुद्ध लेख प्रसिद्ध केले. त्याने 'Herald of Revolt' हे नियतकालिक सुरू करून त्यातून इंग्रजांविरुद्ध आणि सावरकरांच्या कार्याची स्तुती करणारे लेख प्रसिद्ध केले - ''The Hindu patriot who will be released from the Andaman Prison. Dec २४th १९६०'' असे लिहून एक संपूर्ण अंक सावरकरांना अर्पण केला. नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरदेखील ‘दि वर्ड` या मासिकातून सावरकरांवर विशेषांक काढला. १९४८ मध्ये दुर्दैवाने गांधीहत्येच्या खटल्यात एक दोषी म्हणून सावरकरांना उभे केल्यावरदेखील सावरकरांची बाजू मांडणारा विशेषांक अल्ड्रेड यांनी प्रसिद्ध केला.
 
 
 
भारतीय क्रांतिकारकांचा जो पुरस्कार या इंग्रजी क्रांतिकाऱ्याने केला तो स्वदेश बांधवांनादेखील नाही करता आला! स्वातंत्र्यकवी आबा दरेकरांना स्वातंत्र्यावर कविता करण्यासाठी प्रोत्साहन देणारे सावरकर आणि देशगौरव सुभाषचंद्र बोस यांना देशाच्या बाहेरून सैन्य उभारून स्वातंत्र्याचे प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन आणि पूर्ण पाठिंबा देणारेदेखील सावरकरच! आचार्य अत्र्यांनी ज्यांना ‘क्रांतिकारकांचे कुलपुरुष` असे म्हटले आहे, त्या सावरकरांच्या प्रभावळीतील, त्यांच्यापासून प्रेरित झालेले, हिंदुस्थानच्या हिताकरिता जगभरात पसरून सशस्त्र क्रांतीचे प्रयत्न करणाऱ्या या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन. त्यांनी या राष्ट्राकरिता केलेल्या त्यागाबद्दल आपण भारतीयांनी कृतघ्न न होता वेळोवेळी त्यांचे स्मरण करून त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवून त्यांच्याप्रति कृतज्ञ राहावे, हीच अपेक्षा!
 
 
 
संदर्भ : 
 
१) तेजस्वी तारे, लेखक - स्वा. विनायक दामोदर सावरकर.
२) लंडनची बातमीपत्रे, लेखक - स्वा. विनायक दामोदर सावरकर.
३) `अभिनव भारत` अथवा सावरकरांची क्रांतिकारक गुप्त संस्था, लेखक - डॉ. विष्णू महादेव भट.
४) सावरकर चरित्र, लेखक - शिवराम लक्ष्मण करंदीकर.
५) HAR DAYAL : Hindu Revolutionary and Rationalist, by Emily C. Brown.
६) कालजयी सावरकर विशेषांक २०१९ : मृत्युंजय सावरकर, प्रकाशन -दै. मुंबई तरुण भारत.
 
 
 
- सोहम देशपांडे
अग्रलेख
जरुर वाचा