Custom Heading

‘कालजयी सावरकर’च्या निमित्ताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2022
Total Views |

kalajayi

 
 
 
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर... या महान भरत पुत्राला जवळून अभ्यासताना एक लक्षात येतं की, बंधने, चौकट, मर्यादा हे शब्द बहुधा त्यांच्या शब्दकोशात नसावेच! कुठल्याच गोष्टीचे अधिष्ठान त्यांनी विज्ञान आणि विवेकाची साथ सोडून सहजासहजी मान्य केलेले दिसत नाही, अशा या व्यक्तिमत्त्वाचे आणि खासकरून त्यांच्या विचारांचे जागरण चलचित्र माध्यमाचा आणि त्यासोबत येणार्‍या असंख्य मर्यादांचा स्वीकार करत करणे, हे काम अत्यंत अवघड होते. यामध्ये सावरकर अभ्यासक आणि लेखक अक्षय जोग यांची संशोधक म्हणून मोलाची मदत झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यातील विविध कंगोरे लघुपटाची मर्यादा लक्षात घेऊन मांडणे लेखक म्हणून डॉ. समीरा गुजर आणि माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. पण, जवळपास दीड वर्षांच्या अभ्यासानंतर एक दिवस सावरकरांच्या काळातील विचारांचा एक धागा सापडला आणि ‘कालजयी सावरकर’ या लघुपटाची गोष्ट गुंफली गेली. त्याबद्दल...


 
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट सांगायची म्हणजे त्यांच्या आयुष्यातील काही ठरावीक प्रसंग, घटना या अभ्यासाच्या निमित्ताने पुढे येणार, हे स्वाभाविक होतेच. चलचित्र माध्यमातून गोष्ट सांगायची आहे म्हटल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील नाशिक, पुणे, लंडन, अंदमान आणि रत्नागिरी या पाच पर्वांचा अभ्यास करणे ओघाने आलेच. पण, हा सगळा अभ्यास एकीकडे सुरू असताना, हाती मात्र अशाच गोष्टी लागत होत्या, ज्या यापूर्वी अनेकांनी सांगितल्या होत्या. आपण सावरकरांची गोष्ट सांगताना त्यात काय वेगळेपण आणू शकतो? असा विचार सुरू असताना माझी योगायोगाने भेट झाली ‘विवेक समूहा’चे प्रमुख दिलीप करंबेळकर आणि लघुपटाचे ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ विनोद पवार यांच्याशी!



या प्रोजेक्टचा श्रीगणेशाच मुळात या दोघांच्या पुढाकाराने झाला. पहिल्या प्राथमिक भेटीनंतर सावरकरांच्या विषयाच्या निमित्ताने भेटीगाठी वाढल्या. अनेक बैठकांनंतर अनेक ड्राफ्ट्स हाताखालून गेले. पण, सावरकर आणि त्यांची गोष्ट काही हाती लागत नव्हती. अखेर जवळ जवळ एक महिन्यानंतर हाती काहीतरी लागतंय, असं वाटू लागलं. दीड वर्षांहून अधिक काळ जो वेळ आपण या अभ्यासावर खर्ची केला आहे, त्याचे फलित हळूहळू दिसू लागले. याच दरम्यान अभिनेत्री आणि लेखिका डॉ. समीरा गुजर यांनीही कथेचे पटकथेत रूपांतर करून गोष्टीला एक वेगळी नाट्यमयता मिळवून दिली आणि यानंतर अखेर गोष्ट दृष्टिपथात दिसू लागली.
 
 
 
चलचित्राच्या माध्यमातून सावरकरांच्या आयुष्यातील मोजके आणि ठरावीक घटनाक्रम चितारणे या पलीकडे जाऊन आपण त्यांचे कालातीत विचार लोकांपर्यंत पोहोचवायला हवे, असं हळूहळू सगळ्यांनाच वाटू लागलं. अर्थात, सावरकरांच्या विचारांमध्ये अशी काय जादू होती, ज्यामुळे आम्हाला त्यांचे विचार लघुपटातून मांडावेत असे वाटत होते? या प्रश्नाला अर्थातच एकच उत्तर होतं आणि ते म्हणजे सावरकरांचे कालजयी...कालातीत विचार! ‘कालजयी’ यासाठी कारण त्यांच्या मृत्यूच्या इतक्या वर्षांनंतरही आजही त्यांचे विचार समकालीन वाटतात आणि कालातीत यासाठी, कारण ते काळाच्या खूप पुढचे आणि खर्‍या अर्थाने पुरोगामीही वाटतात. वाटतात नाही, तर किंबहुना ते तसे आहेतच!
 
 
 
अखेर लघुपटाच्या गोष्टीचा मुख्य धागा सापडल्यानंतर सावरकरांनी त्याकाळी मांडलेले विचार अधिक बारकाईने यादरम्यान अभ्यासले गेले. अर्थात, सावरकरांच्या विचारांचा पसाराही खूप मोठा आणि खोल आहे, हेही वेळोवेळी आम्हाला सर्वांनाच जाणवत होते. यादरम्यान ऐतिहासिक तथ्ये तपासण्यासाठी अक्षय जोग यांनी ‘सावरकर अभ्यासक’ या नात्याने वेळोवेळी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. भारत एक राष्ट्र म्हणून आज ज्या पद्धतीने जगाच्या या पसार्‍यात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर एक सशक्त आणि समृद्ध अशी प्रतिमा तयार करतोय, त्या विचारांचे मूळही सावरकरांचेच विचार आहेत. या गोष्टीला पूरक असलेला आणखी एक समान धागा लेखक म्हणून मला गवसला आणि खर्‍या अर्थाने गोष्ट लिहून पूर्ण होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आपण लघुपटातून गोष्ट जरी सावरकरांची सांगत असलो, तरी त्या गोष्टीतही एक वेगळेपण आणि नावीन्य आहे, हे गोष्ट वाचताना मनोमन पटत होते.



kalajayi


 
 
 
गोष्ट लिहिताना सावरकरांच्या ज्या वैचारिक बैठकीचा आम्ही सर्वजण अभ्यास करत होतो, तो करताना अनेकवेळा मनात येऊन गेलं की, खर्‍या अर्थाने पुरोगामी आणि पुढारलेल्या विचारांचा कायम पुरस्कार करणार्‍या सावरकरांना आपल्या समाजाने या ना त्या प्रकारे आजपर्यंत उपेक्षित ठेवलं, दुर्लक्षित केलं. यामुळे सावरकरांचं व्यक्ती म्हणून वैयक्तिक नुकसान होण्यापेक्षा आपलं राष्ट्र म्हणून खूप मोठं नुकसान झालं आहे. दुर्दैवाने आपण सावरकरांना, त्यांच्या चरित्राला आणि खासकरून त्यांच्या विचारांना रोजच्या न्यूज चॅनेलच्या डिबेटमध्ये ‘स्लॉट’ तर दिला, पण डिबेटच्या पलीकडे आपण त्यांना समजावून घेण्यात निश्चितच कमी पडलो, याबद्दल माझी हळूहळू खात्री पटत गेली. त्यामुळे यानिमित्ताने मनात तयार झालेलं वादळ पेनाद्वारे झरझर पानावर गोष्टीरूपात येण्यास सुरुवात झाली. संदर्भग्रंथांतून, पुस्तकांतून जेव्हा जेव्हा सावरकरांबद्दल काही वाचलं जायचं, तेव्हा तेव्हा दरवेळी काहीतरी नवीन अर्थ हाती लागत होता.
 
 
 
भारताचे परराष्ट्र धोरण, युद्धनीती, स्वदेशी चळवळ आणि यांसारख्या असंख्य विषयांवर त्यांनी केलेले भाष्य आजच्या काळातही किती बोलके आणि समर्पक आहे आणि ते विचार आजच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत लोकांपर्यंत पोहोचविणे कसे गरजेचे आहे, हेही आत्तापर्यंत आम्हा सर्वांनाच पटू लागले होते.
 
 
 
एकीकडे लिखाण सुरू असताना दुसरीकडे जाहिरात क्षेत्रातलं एक मोठं नाव या लघुपटाच्या टीमसोबत दिग्दर्शक म्हणून जोडलं गेलं. गोपी कुकडे यांनी दिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि गोष्ट अगदी डोळ्यासमोर मोठ्या पडद्यावर दिसतेय, असे वाटू लागले. अभिनेते आणि अभिनेत्रींच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्यावर लघुपटातील सर्वच पात्रं आणि त्यांचा ‘ऑनस्क्रीन लूक’ डोळ्यांपुढे तरळून जाऊ लागला.
 
 
 
नुकतेच या लघुपटाचे चित्रण पूर्ण झाले आहे आणि आता लघुपटाच्या प्रदर्शनाबाबत जशी मला लेखक म्हणून उत्सुकता आहे, तशीच प्रेक्षक म्हणूनही अनेक लोक याबाबत आमच्याकडे विचारणा करीत आहेत. जूनच्या पुढील महिन्यात हिंदू साम्राज्य दिनाच्या पूर्वसंध्येला (11 जून) महाराष्ट्रातील शहरा-शहरात, गावागावात जाऊन विविध संस्थांच्या माध्यमातून हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करायचास, असा आमचा मानस आहे.
 
 
 
‘हिंदू साम्राज्य दिन’ हे तर केवळ निमित्त आहे, पण या प्रदर्शनाच्या निमित्ताने चलचित्र माध्यमात गोष्ट सांगण्याची एक नवी आणि धाडसी सुरुवात होतेय, याचा मला आनंद आहे. आपल्यापैकी कोणाला एखाद्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपर्‍यात सदर लघुपट प्रदर्शित करायचा असल्यास आपले या उपक्रमात स्वागत करायला आम्हाला नक्कीच आवडेल. अधिक माहितीसाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकता.
 
 
 - अमोघ पोंक्षे
@@AUTHORINFO_V1@@

Custom Heading

जरुर वाचा
भारतीय गणिती परंपरा आणि पाश्चात्त्यांना ज्ञानपरंपरेचे वावडे

भारतीय गणिती परंपरा आणि पाश्चात्त्यांना ज्ञानपरंपरेचे वावडे

आज गणितातील प्रमेये, सिद्धांत हे पाश्चात्त्य गणिततज्ज्ञांच्या नावे असले, तरी भारतीय गणिती परंपरा ही ज्ञानसमृद्ध आणि काळाच्या पलीकडचा विचार करणारी होती. परंतु, दुर्दैवाने वसाहतवाद आणि युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांतामुळे प्राचीन भारतीय गणिती परंपरा पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळे ती काहीशी अडगळीत पडली. पण, आज सर्वच क्षेत्रांत भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण होत असताना, गणिती परंपरेचा समृद्ध वारसाही प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, भारतीय ..

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..