आज सावरकर असते तर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2022
Total Views |

savarkar 7
 
 
 
 
 
आज जवळपास सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ‘ऑडिओ बुक्स` अगदी सहज असतात. ज्ञानेश्वरी जशी ज्ञानेश्वरांनी स्वतः उलगडून म्हंटली तर ती ऐकण्यात जी मजा येईल ना, तशीच मजा सावरकरांच्या आवाजात त्यांच्या पुस्तकांचे विश्लेषण ऐकण्यात मिळाली असती. एक मात्र नक्की वाटतं, टीव्हीवर होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये सावरकरांनी भाग घेतला नसता. कारण, `क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे` या तत्त्वावर आयुष्यभर चालले होते सावरकर!
 
 
 
विषय मांडताना मी हा विषय तीन पातळींवर मांडण्याचा विचार करतोय; पहिली वैयक्तिक, दुसरी सामाजिक आणि तिसरी जागतिक, तर पहिल्या म्हणजे वैयक्तिक पातळीवर सावरकरांनी काय केले असते? मला वाटतं, त्यांनी सर्वाधिक योगदान मायबोलीतून साहित्य आणि कविता करण्यात दिलं असतं. `ने मजसी ने`सारखं विरहगीत असो वा `शत जन्म शोधिताना। शत आर्ती व्यर्थ झाल्या॥` यासारखं अजरामर प्रेमगीत असो. हे झालं कवितांचे, गद्य क्षेत्रात तर काय बहार आली असती. आज जवळपास सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ‘ऑडिओ बुक्स` अगदी सहज असतात. ज्ञानेश्वरी जशी ज्ञानेश्वरांनी स्वतः उलगडून म्हंटली तर ती ऐकण्यात जी मजा येईल ना, तशीच मजा सावरकरांच्या आवाजात त्यांच्या पुस्तकांचे विश्लेषण ऐकण्यात मिळाली असती. एक मात्र नक्की वाटतं, टीव्हीवर होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये सावरकरांनी भाग घेतला नसता. कारण, `क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे` या तत्त्वावर आयुष्यभर चालले होते सावरकर!
 
 
 
समाजमाध्यमांचा विषय निघालाच आहे, तर सामाजिक पातळीवर सावरकरांचे काय योगदान असते, त्याचा आता विचार करू. आजकाल आणि त्याही काळात ज्याने सावरकरांना कायम चर्चेत ठेवलं होतं तो मुद्दा म्हणजे ‘हिंदुत्व.` आपल्याला आज ऐकीव माहितीतून वाटणारं प्रखर सावरकरवादी हिंदुत्व आणि सावरकरांना प्रत्यक्षात वाटणारं हिंदुत्व यात खूप फरक आहे. कर्म-कांडासारख्या गोष्टींना सावरकरांच्या हिंदुत्वात अजिबात स्थान नाही. सावरकरांच्या मते, विज्ञाननिष्ठ जीवनशैली जगणं म्हणजेच ‘हिंदुत्व` होय. त्यांनी स्वतः “माझे प्रेत विद्युतदाहिनीत झोकून द्या,” असे त्या काळात म्हटले होते; जे आजही कित्येक हिंदूंना पटणे कठीण आहे. समाजप्रबोधन करताना सावरकरांनी एक महत्त्वाचा बदल केला असता, तो म्हणजे आजचा इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत. इतिहास कसा लिहावा? त्यातून काय शिकावे? आणि कसा लोकांपर्यंत पोहोचवावा? याची जाण सावरकरांइतकी फारच कमी लोकांना असेल. `१८५७ चे स्वातंत्र्यसमर` हे पुस्तक उगाच नाही त्याकाळी अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं.
 
 
 
आजचा शालेय इतिहास थोडासा सनावळ्यांमध्ये आणि पराभवाच्या कथांमध्ये जास्त गुंतलेला दिसतो, तो नक्कीच पुनर्लेखन करून सावरकरांनी त्यांच्या शैलीत मांडला असता. तसेच, अजून एक नको ती गोष्ट इतिहासात व आजही अधोरेखित होताना दिसते, ती म्हणजे `अहिंसा.` बरेचसे लोक ‘अहिंसा परमो धर्म:।` इथपर्यंतच अडकलेले दिसतात, पण `अहिंसा परमो धर्म:। धर्महिंसा तथैवच॥` हे तत्व रुजवण्यात सावरकरांनी नक्कीच मोठे योगदान दिले असते. आपण स्वतः प्रचंड शक्तिशाली असूनही उगाच कुणावर पहिला वार करत नाही, याला ‘अहिंसा` असे म्हटले पाहिजे आणि या अहिंसेला खरा मान असतो. पण, समोरच्याने काही केलं तर त्याला त्याच्या दुप्पट ताकदीने खाडकन उत्तर देण्याची शक्ती असणारा भारत देश निर्माण करण्यावर सावरकरांनी भर दिला असता. भारत आजही शक्तिशाली आहेच, पण आक्रमण करताना वा कार्यवाही करताना काही मतांचे राजकारण आड येते; ते तसे येऊ नये तशी रक्षणप्रणाली संपूर्ण वेगळी ठेवण्यावर सावरकरांनी भर दिला असता आणि मग कोणाची हिंमत नसती झाली ‘सर्जिकल स्ट्राईक खरंच झाला का?` असं विचारायची. मला विचाराल तर सावरकरांनी संरक्षणमंत्री व्हायला हवं. कारण, राष्ट्राच्या सीमा तलवारीने आखायच्या असतात, हे एकदम पक्कं होतं त्यांच्या मनात. त्यामुळे आज बरेच प्रश्न निकाली लागले असते आणि त्यावर होणारा खर्चही वाचला असता. आज ‘सीएए‘, ‘एनआरसी‘ यांसारख्या कित्येक विषयांवर अशाच तडक निर्णयाची गरज आहे, असं सारखं वाटतं. हे झालं सामाजिक व राष्ट्रीय स्तरावर.
 
 
 
जागतिक स्तरावर `वसुधैव कुटुम्बकम्‌` हे तत्त्व आचरण्यात सावरकरांचा सगळ्यात मोठा हात असता. जी गोष्ट सृष्टीच्या विरोधात असेल, मग ती आपल्या धर्माची असो वापर धर्माची! कडाडून विरोध करून ती रीत बंद करण्यात सावरकरांनी नक्कीच मोठे योगदान दिले असते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लढताना पण किती सरळ दृष्टिकोन होता या माणसाचा! ‘जोपर्यंत ब्रिटिश भारतातल्या नागरिकांचे निसर्गदत्त हक्क हिरावून घेतात, तोपर्यंतच त्यांचे आणि माझे शत्रुत्व असेल; ज्या दिवशी ते असं करणार नाहीत, त्या दिवशी आमचं शत्रुत्व संपेल आणि उद्या जर कोणी ब्रिटिशांवर असा अन्याय केला, तर त्यांच्या स्वातंत्र्यासाठी हा सावरकर असाच झटेल` इतकं म्हणणाऱ्या माणसाने आज जगाला किती जवळ आणलं असतं, याची तर कल्पनासुद्धा करवत नाही. बाकी सावरकर मला नेहमी समुद्रासारखेच वाटतात. अथांग... विषय कोणताही घ्या, सावरकरांच्या मताचा थांग सहसा कोणाच्या मनाला शिवत नाही. त्याचं कारणही तसंच असावं, समुद्र कितीही छान वाटत असला तरी त्यात थोडा साखारटपणा असतोच; तो सहन केल्याशिवाय समुद्राची ओळख होत नाही. अगदी तसंच सावरकरांच्या सद्यःस्थितीत मनाला न पटणाऱ्या खारट विचारांना आपलंसं केल्याशिवाय सावरकरांची ही ओळख पटत नाही, तर अशा या सतत काळाच्या दहा पावले पुढे राहणाऱ्या स्वातंत्र्यवीराला वंदन करून मी माझं लिखाण थांबवतो.
 
 
 
- हर्षल चौधरी
himanshu070293@gmail.com
@@AUTHORINFO_V1@@