स्वातंत्र्यवीर सावरकर... एक क्रांतिकारक, एक समाजसुधारक, एक भाष्यकार, एक लेखक आणि ज्ञात-अज्ञात गोष्टींचे जनक. ‘अज्ञात गोष्टींचे जनक’ हे अशासाठी की, आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही ठरावीक विषयांपुरतेच माहिती आहेत. पण, यानिमित्ताने सावरकरांचे आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबतचे आणि भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे, याबद्दलचे विचार जाणून घेणे हे आजही तितकेच महत्त्वाचे आणि उपयोगी देखील आहे आणि उद्याही राहील.
स्वातंत्र्यवीर सावरकर... नुसतं हे नाव जरी उच्चारलं तरी प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात त्यांच्याबद्दल एक पराकोटीच्या आदराची भावना उत्पन्न होते, इतकं थोर हे व्यक्तिमत्व. परंतु, दुर्देवाने आपण सावरकरांना काही ठरावीक गोष्टींपुरतेच सीमित करून ठेवलं आहे. जरा वेगळ्या चष्म्यांतून सावरकरांच्या या अज्ञात पैलूंकडे बघितल्यास जाणवेल की, सावरकर हे द्रष्टे होते.
इथे एक उल्लेख करणे आवश्यक आहे की, सावरकर हयात असतानाच्या काळात दोन महायुद्धे झाली. त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबतचे विचार आणि त्याबद्दलची मतेही १९३७ सालानंतर आपल्याला उजेडात आलेली दिसतील. याचे कारण म्हणजे, सावरकर रत्नागिरीला १९३७ पर्यंत स्थानबद्ध असल्यामुळे आणि त्यांना राजकारणात भाग घेण्यास बंदी असल्यामुळे पहिल्या महायुद्धापेक्षा दुसर्या महायुद्धाबद्दल त्यांनी आपले विचार व्यक्त केल्याचे जास्त जाणवेल. इथे असे म्हणायला वाव आहे की, सावरकर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्याबाबतीत अत्यंत ‘प्रॅक्टिकल’ विचार करणारे होते, हे आपल्याला त्यांचे विचार वाचल्यावर लक्षात येईल.
तेव्हा भारत स्वतंत्र व्हायचा होता. दुसर्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. अशावेळेस दोन मुख्य मुद्द्यांवर सावरकरांचे आंतरराष्ट्रीय धोरणाबद्दलचे विचार आधारलेले होते. ते दोन मुद्दे म्हणजे-
1) स्वतःच्या देशाचे हितरक्षण आणि 2)जो शक्तिवान आहे त्यालाच जग नमस्कार करतं.
अगदी परराष्ट्र धोरणाबद्दल बोलायचं झाल्यास, ज्याच्याशी मैत्री केली असता आपला लाभ होण्यासारखा असेल, त्याच्याशीच सख्य जोडावे म्हणजे त्यांच्याशीच संबंध प्रस्थापित करावेत. थोडक्यात, भारताने स्वतःचा स्वार्थ पाहावा.
सावरकर कुठल्याही ‘इझम’चे भोक्ते नव्हते. एका विशिष्ट ‘इझम’मुळे किंवा ‘वादा’मुळे आपल्याला साध्य साधता येईल, अशाही विचारांचे ते समर्थन करत नव्हते. प्रथम राष्ट्रहित आणि मग बाकी सगळं! भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, हा तेव्हाचा काळ होता. म्हणून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो अनुकूल आहे, तो आपला मित्र आणि जो आपल्या स्वातंत्र्याच्या आड येतो आहे, तो आपला शत्रू, इतकी सरळसोट मांडणी सावरकरांनी केली आणि म्हणूनच त्याला आपण अत्यंत ‘प्रॅक्टिकल’ विचार असं म्हणू शकतो.
सावरकर क्रांतिकारक होते. त्यांनी सैनिकीकरणावर भर दिला. ‘शेरास सव्वाशेर’ हा विचार त्यांनी मांडला. आपल्या देशातल्या तरुणांमध्ये लढाऊ वृत्ती हवी, या मताचे सावरकर होते. हिंदी तरूणांनी आंतरराष्ट्रीय धोरण निश्चित करून त्यादृष्टीने संघटित प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हा इंग्रज आपल्यावर राज्य करत होते म्हणून इंग्लंडचे जे शत्रू आहेत, त्यांच्याशी आपण मैत्री केली पाहिजे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ हे धोरण सांगितले अगदी तेच धोरण हिंदुस्थानाचे असले पाहिजे, असे सावरकर म्हणतात. ‘एक वेळ आमच्या तरुण लोकात लेखक, कवी नसले तरी चालतील, वाङ्मयावर व्याख्याने नाही झाली तरी चालतील, पण आमची लढाऊ वृत्ती फिरून फोफावलीच पाहिजे,’ हे सांगण्याबरोबरच सावरकरांनी सगळीकडे रायफल संघ काढण्याचा सल्ला दिला, तसा विचार व्यक्त केला.
ज्याप्रमाणे आपले हित कशात आहे, हे सावरकरांनी सांगितले तसेच हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण कसे, असावे हेसुद्धा त्यांनी सांगितले. सावरकर पाकिस्तानबद्दल सांगतात की, “पाकिस्तानचा जन्म हाच मुळी धर्मावर अधिष्ठित मूलतत्ववादावर आधारला आहे, त्यामुळे पाकिस्तानकडून भारताला धोका आहे. भारताबरोबर पाकिस्तानने युद्ध केले आहे” आणि काश्मीरप्रश्न सतत आंतरराष्ट्रीय पटलावर मांडत ठेवला आहे, हे यानिमित्ताने सिद्ध होते.
जेव्हा ‘हिंदी चिनी भाई भाई’चे गोडवे गायले जात होते, तेव्हा सावरकरांनी या तकलादू धोरणावर टीका केली होती. चीनचे मनसुबे ठीक नाहीत, चीन तिबेटवर कब्जा करू शकतो, हे सावरकरांनी आधी ओळखलं होतं. अरुणाचल प्रदेशाबाबतही त्यांनी हेचं सांगितलं होतं.
एक महत्त्वाचा मुद्दा इथे नमूद करायचा म्हणजे, जो शक्तिवान आहे, ताकदवान आहे, अशाच राष्ट्राला इतर राष्ट्र किंमत देतात. हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणूनच भारताने स्वसंरक्षणक्षम बनणं खूप आवश्यक आहे. यासाठी सावरकर भारताला बलवान होण्याचा सल्ला देतात. यासाठी ते अॅबिसिनिया आणि चीन यांची उदाहरणं देतात. चीनला जपानने गिळंकृत केले, तर अॅबिसिनियाला इटलीने हरवलं. सावरकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे इटलीच्या रायफल्सचा आणि मशीन गन्सचा पल्ला हा अॅबिसिनियाच्या रायफल्स आणि मशीन गन्सपेक्षा प्रभावी ठरला आणि म्हणूनच ‘कवितेपेक्षा तलवारीला जास्त मान’ या शब्दात सावरकर संपूर्ण शक्तिवान राष्ट्रच इतरांपेक्षा जास्त सरस ठरतात, असेच जणू मांडत आहेत.
इस्रायलबाबत सावरकरांचे धोरण नरमाईचे होते. भारताने इस्रायलला पाठिंबा द्यायला पाहिजे, या मताचे सावरकर होते. जर इतर मुस्लीम राष्ट्र पाकिस्तानच्या बाजूने भारताविरुद्धच्या युद्धात उतरली तर इस्रायल आपल्या मदतीला धावून येईल, असा सावरकरांना विश्वास होता. यासाठी भारताचे इस्रायलबरोबर मैत्रिपूर्ण संबंध हवेत, असं त्यांना वाटत होतं.
सावरकरांनी सुभाषचंद्र बोस यांनासुद्धा प्रोत्साहित केलं. सुब्रमण्यम स्वामी यांच्या म्हणण्यानुसार, सुभाषबाबूंना पुढे नेण्यात सावरकरांची महत्त्वाची भूमिका होती. नेपाळबाबत सावरकर म्हणतात, “नेपाळ हे हिंदूराष्ट्र असण्यात भारताला फायद्याचं आहे.” कारण, नेपाळ हा भारताचा हक्काचा मित्रच आहे, यादृष्टीने सावरकर बघत होते.
वर चर्चिलेल्या मुद्द्यांवरून एक गोष्ट इथे स्पष्ट होते आणि ती ही की, सावरकरांना भारतीय आधुनिक वास्तववादाचे (ठशरश्रळीा) जनक म्हणणं वावगं ठरणार नाही, इतकं सावरकरांचं योगदान महत्त्वाचं आहे.
अहिंसा हे तत्व ठीक असलं, तरीसुद्धा उद्या जर कुठल्या राष्ट्राने युद्ध पुकारलं, तर त्याला अहिंसा उपयोगी येणार नसून केवळ आपलं स्वतःचं बळ उपयोगी येईल. त्यामुळेच बलवान राष्ट्र असेल, तर परराष्ट्र धोरणसुद्धा बलवान होईल, असाच याचा अर्थ आहे. आजच्या संदर्भात बोलायचं झाल्यास, एकविसाव्या शतकात जी जागा अमेरिकेची आहे, तीच योग्य आहे असं आपल्याला लक्षात येईल. आज अमेरिका महासत्ता आहे. अमेरिका स्वार्थी आहे. अमेरिका स्वतःचं हित बघते. सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर १९९२ नंतर राहिली आणि ते राष्ट्र म्हणजे अमेरिका. याचा अर्थ अमेरिकाचं सगळं काही आहे असा नाही. इथे फक्त अमेरिका महासत्ता आहे, हे दाखवण्याचा हेतू, म्हणजे अमेरिकेचं जगातलं स्थान दाखवण्याचा उद्देश आहे. आर्थिक ताकद असणं हे आजच्या युगात महत्त्वाचं मानलं जातं. महासत्ता होण्यासाठी जे निकष आहेत, ते विसाव्या शतकापेक्षा आज एकविसाव्या शतकात थोडे बदलले आहेत. म्हणजे अगदी मागच्या काही दशकापर्यंत लष्करी जोरावर महासत्ता गणल्या जायच्या आज त्याची जागा आर्थिक गोष्टींनी घेतली आहे. ज्याच्या हातात आर्थिक नाड्या, ज्याच्या हातात अद्ययावत तंत्रज्ञान, तो आज महासत्ता म्हणून घेण्यास पात्र आहे.
आज आपला प्रवास आधुनिक जगाकडून अत्याधुनिक जगाकडे असा सुरू झाला आहे. एकच उदाहरण घ्यायचं झाल्यास, अमेरिकेने स्वतःच्या सैन्यदलांबरोबर ‘स्पेस फोर्स’ म्हणजे अंतराळ दल तयार केलं आहे. पुढचं युद्ध कदाचित अंतराळात खेळलं जाईल, अशी परिस्थिती आहे. सध्या रशिया-युक्रेन लष्करी युद्ध सुरू आहे. कदाचित काही काळाने रशिया युक्रेन यांच्यामध्ये तह होईल, शांतता नांदेल, चर्चा होतील. दुसरीकडे एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्नही चालू राहतील. पण, जो शक्तिशाली आहे त्याचाच विजय होईल. इथल्यासंदर्भात कदाचित रशियाचा विजय होईल. याचा अर्थ असा की, युक्रेन बलशाली नाही असा नाही, तर रशिया युक्रेनपेक्षा बलवान आहे आणि जो बलवान आहे, त्याचाच युद्धात विजय निश्चित आहे, हे तर इथे सिद्ध होते.
या सगळ्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल की, सावरकर जे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या नीतिबद्दल सांगत होते, तेच इथे रशिया-युक्रेन युद्धाने सिद्ध होत आहे.
आजच्या परिप्रेक्षात विचार करायचा झाल्यास स्वहित आणि बलवान असणं, हे महासत्ता होण्याचे नाही तरी निदान एक प्रभावशाली सत्ता होण्याचे निकष आहेत आणि म्हणूनच सावरकरांचे विचार आजही कालजयी आहेत.
याप्रसंगी सावरकरांचे स्मरण आपल्याला झाले, त्यांचे विचार उक्तीतून कृतीत उतरवले, तर येणारा भारत निश्चितच योग्य दिशेने मार्गक्रमण करेल, यात शंका नाही.
निखिल कासखेडीकर
nikhilkaskhedikar@gmail.com