उघूरांबद्दलची उदासिनता

26 May 2022 09:30:29

uigar

भारतात कसे मुस्लिमांवर अन्याय- अत्याचार होत आहेत, असा बनाव रचून पाकिस्तान कायम आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वचपा काढण्यात व्यस्त असतो. दुसरीकडे हाच देश भारताचा दुसरा शेजारी आणि विस्तारवादी शत्रू असलेल्या चीनच्या मांडीला मांडी लावून बसलेला दिसतो. मात्र, या देशात होणार्‍या उघूर मुस्लिमांवरील अत्याचाराबद्दल ‘ब्र’ काढण्याचीही हिंमत दाखवित नाही. चीनचा विरोध करणे तर सोडाच, परंतु आजवर पाकिस्तानने या देशात राहणार्‍या उघूर मुस्लिमांच्या अत्याचाराबद्दल साधी वाच्यताही केलेली नाही.


अर्थात अर्थव्यवस्थेचा कणा मोडलेला देश तशी हिंमत पुन्हा करेल, याची कुठलीही शक्यताही नाही. कारण, चीनला जाब विचारला, तर भीकेची झोळी पसरवणार कुणाकडे? या सगळ्यात एक भयानक बाब उघडकीस आली ती म्हणजे चीनमध्ये उघूर मुस्लिमांविरोधात सुरू असलेल्या अत्याचाराला दुजोरा मिळाला आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये नेमके काय सुरू आहे, याबद्दल सहज माहिती मिळेल, अशी शाश्वती नाहीच. माहिती बाहेर येण्यासाठी केवळ सरकारी माध्यमे असल्याने विरोधात माहिती लवकर बाहेर येईल, असे काही नाही. असो.

तूर्त उघड झालेल्या माहितीनुसार चीन हा उघूर मुस्लिमांबद्दल किती क्रूर आहे, याबद्दलची दाहकता दिसून येईल. चीनच्या शिनजियांग प्रांतातील पोलिसांच्या संगणक यंत्रणेला ‘हॅक’ करून मिळविलेल्या माहितीत ही त्यांच्या अत्याचाराची कहाणी बाहेर आली आहे. डेटाद्वारे शिनजियांगमध्ये कैदेत असलेल्या केंद्रात अत्यंत गोपनीय छायाचित्र प्रकाशित करण्यात आली आहेत. चीनमध्ये नजरबंदीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या उघूरांना थेट गोळ्या झाडून ठार केले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शिनजियांग पोलीस फाईलमध्ये असलेली आकडेवारी या वर्षाच्या सुरुवातीलाच बाहेर आली होती. मात्र, त्याची सत्यता पडताळणीसाठी इतका वेळ गेला.


त्यानंतर आता एका जागतिक वृत्तसंस्थेने ही प्रकाशित केली आहे. तसेच, संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार प्रमुख मिशेल बाचेलेत हे शिनजियांग दौर्‍यावर आहेत. त्यांच्याच दौर्‍यानिमित्ताने हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे की काय, अशी शंका यावी. जरी तसे असले तरीही असल्या दौर्‍यांमध्ये काही निष्पन्न होईल, असे नाही. आधीच या दौर्‍यावर सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे मिशेल तेच पाहतील जे त्यांना दाखविले जाईल. उघूर मुस्लिमांची नजरबंदीची ठिकाणे ते पाहतील, तर तसे अजिबात नाही. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी दक्षिणी शहर गुआंगझोउमध्ये सोमवारी मिशेल यांची भेट घेतली. ते गुआंगझोउ ते काशगर आणि शिनजियांगची राजधानी उरुमकी जाणार आहेत.


विशेष बाब म्हणजे, शिनजियांगच्या नजरबंदी खान्यांमध्ये लाखो उघूर बंदीवान आहेत. त्यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या येतच असतात. दरम्यान, चीन याच ठिकाणांना शैक्षणिक केंद्र म्हणून उल्लेख करतो. परंतु, आत शिक्षणाशिवाय उघूरांवरील चिनी अत्याचारांच्या क्रूर कहाण्या लिहिल्या जातात. ‘कोविड’ काळापूर्वी चीनने शिनजियांग हे शहरच पूर्णपणे उघूरांच्या नजरबंदी खान्यांनी भरून टाकले आहेत. यालाच चीन ‘शैक्षणिक केंद्र’ असे नाव देते. या शहरांची लोकसंख्या आणि इतर गरजा लक्षात घेता, इतक्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक केंद्रांची गरजच काय? शिवाय या केंद्रांमध्ये फक्त उघूर मुस्लीमच का आहेत? हे काही सर्वसाधारण प्रश्न उपस्थित होतात.


गंगेत समाधीस्त झालेली प्रेतं दाखवून भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या पितपत्रकारिता करणार्‍या माध्यम संस्थांना या प्रश्नावर कधीही प्रश्न उपस्थित करावासा आजवर वाटला नाही. रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या भारतातील घुसखोरीबद्दल अक्कल पाजळणार्‍या लिबरलांना कधी या प्रश्नावर दोन शब्दही बोलावेसे वाटले नाहीत. उघूर मुस्लिमांवर दहशतवाद, फुटीरतावादाचे आरोप लावून आजन्म त्यांच्यावर अन्याय- अत्याचार, जुलूम-जबरदस्ती केली जाते. याच आरोपांमुळे उघूरांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करण्याचे काम याच नजरबंदी केंद्रांमध्ये केले जाते.


या सगळ्याला ‘शिबीर’ असे गोंडस नाव दिले जाते. कित्येक वर्षे चिनी उघूरांचा प्रश्न चीनमध्ये कायम आहे. मात्र, त्याबद्दल कधी मुस्लीम राष्ट्रांनी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी, पाकिस्तान आणि पाकची भाषा बोलणार्‍यांनी आवाजस उठवला नाही. तेव्हा उघूरांबद्दलची उदासिनता ही मानवाधिकारांच्या नावाखाली जागतिक दुटप्पीपणाचे दर्शन घडविणारीच म्हटली पाहिजे.


Powered By Sangraha 9.0