महापालिकेच्या अनास्थेमुळे मैदानाचा उकिरडा

25 May 2022 13:15:11
 
 
 
TMC
 
 
 
 
 
ठाणे: ठाणे पालिका क्षेत्रातील माजिवडा येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या आरक्षण क्र. ७ सेक्टर ४ या भूखंडाचा अक्षरश: उकिरडा झाला आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे हे मैदान खेळाडूंसाठी गैरसोयीचे ठरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनपाकडून या मोकळ्या मैदानाची अवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याचे समोर आले आहे. दाट वाढलेली झाडी आणि राड्यारोड्यामुळे या परिसरात राहणार्‍या झोपडपट्टीवासीयांना प्रात:विधीसाठी मोकळे रान मिळाले असल्याचा आरोप ‘ठाणे सिटिझन्स फाऊंडेशन’ने केला आहे.
 
 
ठाण्यातील मोकळ्या जागांची संख्या कमी होत असून, मनपाकडून आरक्षित करण्यात आलेल्या मैदानांची देखभाल व नियोजनही ढेपाळले आहे. वर्तकनगर आणि पोखरण भागातील अनेक स्थानिक क्रिकेटप्रेमी या मैदानामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येतात. परंतु, त्यांना येथील गैरसोईंचा सामना करावा लागतो. मैदानावर वाढलेले गवत, दगडांचा खच, मद्यपींकडून फेकण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्यांच्या काचेचे तुकडे आणि आसपासच्या झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांनी केलेली हागणदारी यामुळे या भागात खेळणे अचडणीचे ठरत आहे.
 
 
नियोजनाअभावी आरक्षित मैदान बनले खुले शौचालय
 
 
नियोजन नसल्यामुळे हे आरक्षित मैदान खुले शौचालय बनले असून संपूर्ण जागाच अस्वच्छ झाली आहे. हे मैदान तातडीने सुधारावे, अशी मागणी सोसायटीतील रहिवाशांकडून केली जात आहे. ठाणे मनपाचे खेळाच्या मैदानाचे आरक्षण असलेली विस्तीर्ण जागा मनपाच्या दुर्लक्षामुळे गैरप्रकाराचे केंद्रबिंदू ठरू लागली आहे.
 
 
खेळण्यासाठी मैदानांची वानवा
 
 
ठाण्यात आधीच खेळण्यासाठी मैदानांची वानवा आहे. आता वर्तकनगर, पोखरण रोड परिसरातून खेळण्यासाठी येणार्‍या क्रीडापटूंनी पालिका आयुक्तांकडे जानकी मंदिर, ‘अवर लेडी ऑफ द’ या चर्च आणि लिटिल फ्लॉवर हायस्कूलजवळील ठाणे मनपाचे मैदान विकसित करण्याची विनंती केली आहे. हे मैदान विकसित झाल्यास खेळाडूंना खेळासाठी विस्तीर्ण जागा मिळेल, अशी मागणी ‘ठाणे सिटिझन फाऊंडेशन’ने केली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0