केंटीश प्लोवर पक्ष्याचे तामिळनाडूतून पुण्यात स्थलांतर
24 May 2022 16:15:46
मुंबई (उमंग काळे): तामिळनाडूमध्ये टॅग केलेला केंटीश फ्लोवर हा पक्षी पुण्याजवळील भिगवणमध्ये आढळून आला आहे. बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) संशोधकांनी पक्षी स्थलांतरच्या अभ्यासाकरिता या पक्ष्याला टॅग केले होते.
'बीएनएचएस'कडून देशातील स्थलांतरित पक्ष्यांकरिता महत्त्वाच्या असणार्या पाणथळ जागांचा अभ्यास करीत आहे. तसेच, या पक्ष्यांचा स्थलांतरणाचा मार्ग व पद्धती यांचाही अभ्यास करीत आहेत.
याकरीता त्यांना विशिष्ट प्रकारचे फ्लॅग आणि रिंग पक्ष्यांच्या पायाला लावल्या जातात. पक्षी स्थलांतराच्या अभ्यासासाठी पक्ष्यांच्या पायात गोलाकार लोखंडी कडीबरोबरच 'कलर फ्लॅग' लावण्यात येतात. प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय नियमांना स्वीकारून त्यांच्या देशामधील पक्ष्यांच्या पायांना लावण्यात येणाऱ्या 'फ्लॅग'चा रंग ठरवलेला आहे. स्थलांतर करताना पक्षी ज्या वायुमार्गांचा वापर करतात त्याला फ्लाय वे (उड्डाणमार्ग) असे म्हटले जाते.
जगात पक्षी स्थलांतराचे मुख्य आठ उड्डाणमार्ग आहेत. भारतात मध्य आशियाई उड्डाणमार्गावरुन पक्ष्यांचे स्थलांतर होते. या उड्डाणमार्गवरुन स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या अभ्यास करण्यासाठी बीएनएचएस प्रयत्नशील आहे. यामाध्यमातून तामिळनाडूतील नागपट्टणम जिल्ह्यातील पॉइंट कॅलिमेर येथे बीएनएचएसने केंटीश प्लोवर या पक्ष्याच्या पायाला रिंग आणि फ्लॅग लावला होता. आता हा पक्षी पुण्याजवळील भिगवणमध्ये आढळून आला आहे. ग्रुप कॅपटन अनिल भगवानानी यांनी या पक्ष्याचे छायाचित्र टिपले आहे. या पक्ष्याला 'बीएनएचएस'च्या टीमने सात महिन्यांपूर्वी पॉइंट कॅलिमरमध्ये टॅग केले होते. उजनी धरणाच्या कोंडपाणी क्षेत्रात पसरलेले भिगवणचे पाणथळ क्षेत्र पक्ष्यांच्या जैवविविधतेने समृद्ध आहे. याठिकाणी दरवर्षी लाखो पक्षी स्थलांतर करत असतात.