आला, पाऊस आला!

23 May 2022 14:54:20
rain
 
 
 
मान्सूनपूर्व पावसाचे दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात नुकतेच आगमन झाले. आता हा पाऊस मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. उन्हाने त्रस्त झालेल्या महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. या वर्षी मान्सून लवकर येणार या आनंदात सारे खूश आहेत. पण हा मान्सून येतो कुठून आणि कसा, याचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...
 
 
येत्या काही दिवसांतच मान्सून येऊ घातला आहे. पण, मान्सून असा एकाच वेळी धडकत नाही. त्याऐवजी मान्सूनपूर्व सरींच्या रूपाने आपली चाहूल देतो. याला ‘वळीवाचा पाऊस’देखील म्हटले जाते. मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटानेच होते. हा पाऊस लोकांमध्ये उत्साह निर्माण करतो. लहान मुले पावसात इकडे तिकडे धावताना, नाचताना, खेळताना दिसतात. हा मान्सून येतो आणि सर्वांना ताजातवाना करतो.
 
 
जून ते सप्टेंबर हा काळ ’नैऋत्य मान्सून’चा कालावधी म्हणून ओळखला जातो. हा काळ भारतीय उपखंडातील मुख्य पावसाळी हंगाम आहे. या कालावधीत ‘नैऋत्य मान्सून’ देशभरात पोहोचतो आणि बरसतोदेखील! ‘नैऋत्य मान्सून’चे महत्त्व फार मोठे आहे. जून ते सप्टेंबर दरम्यानचा पाऊस हा देशाच्या कृषी उत्पादकतेची स्थिती ठरवतो. परिणामी, अर्थव्यवस्थेची स्थिती ठरते. जमीन आणि महासागरावरील तापमानाच्या बदलत्या स्थितीमुळे मान्सून उदयास येतो. उन्हाळ्यात राजस्थानमधील थारच्या वाळवंट परिसरात तीव्र उष्णतेमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि मान्सून सक्रिय होण्यास मदत मिळते. ही निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी हिंद महासागरातून आर्द्र वारे नैऋत्येकडून भारताकडे वाहू लागतात. हे वारे वाहताना ढगांची उंची वाढते आणि तापमानात घट होऊन पाऊस पडतो. ‘नैऋत्य मान्सून’ भारतात पोहोचल्यावर त्याचे दोन भाग होतात. एक भाग अरबी समुद्राच्या उत्तरेकडे आणि पश्चिम घाटाच्या किनारपट्टीच्या बाजूने वर सरकतो. दुसरा बंगालच्या उपसागरावरून वाहतो, आसाममधून जातो आणि पूर्व हिमालयाकडे सरकतो.
 
 
अरबी समुद्राच्या उत्तरेला वाहणार्‍या नैऋत्य मोसमी वार्‍यांसमोर उभा असतो, तो बलाढ्य सह्याद्री. ही सह्याद्री पर्वतरांग या आर्द्र वार्‍यांना रोखून धरते आणि वार्‍याच्या बाजूने असलेल्या परिसरात जोरदार पाऊस पडतो. पलीकडल्या बाजूला कमी पाऊस पडतो. उदाहरणार्थ - पश्चिम किनारपट्टीवरील मुंबईत सुमारे 200 सेंमी पावसाची नोंद आहे, तर पुण्यात या हंगामात केवळ 50 सेंमी पाऊस पडतो. अरबी समुद्रावरून वाहणार्‍या शाखेचा एक भाग नर्मदा-तापी खोर्‍यात पोहोचतो आणि पुढे मध्य भारतात वाहतो. परंतु, या भागात कमी पाऊस पडतो. कारण, वार्‍याच्या मार्गात अडथळे नसतात. या शाखेचा दुसरा भाग सौराष्ट्र आणि कच्छला धडकतो. त्यानंतर पश्चिम भारतात उत्तर-पूर्व दिशेने पुढे सरकतो.
 
 
येथील आरवली पर्वतरांग मान्सून वार्‍यांच्या दिशेला समांतर आहे. त्यामुळे मार्गात अडथळा नसताना मान्सूनचे वारे पश्चिमेला जास्त पाऊस न पाडताच उत्तरेकडे सरकतात. पुढे ‘नैऋत्य मान्सून’च्या अरबी समुद्राचा भाग बंगालच्या उपसागराच्या भागात सामील होतो. हे दोन भाग मिळून पश्चिम हिमालयीन प्रदेशात पाऊस पाडतात. म्यानमारच्या किनार्‍यालगत असलेल्या अरकान पर्वतरांगांमुळे हे वारे भारत आणि बांगलादेशकडे वळतात. नैऋत्य दिशेऐवजी आग्नेयेकडून पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात प्रवेश करतात. हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर हे वारे पुन्हा पश्चिमेकडे वळतात आणि भारताच्या उत्तरेकडील पठारांवर मुसळधार पाऊस पाडतात. बंगालच्या उपसागराच्या शाखेचा एक भाग ब्रह्मपुत्रा खोर्‍यात सरकतो आणि ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. चेरापुंजीपासून सुमारे 16 किमी पश्चिमेला आणि ‘खासी हिल्स’च्या शिखरावर असलेल्या ‘मावसिनराम’मध्ये जगातील सर्वाधिक सरासरी पाऊस पडतो. ‘नैऋत्य मान्सून’च्या कालावधी दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हवामान तसे कोरडे राहते. त्याला पावसाळ्यात ‘ब्रेक’ म्हणतात. भारतातील प्रमुख भागांमध्ये सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाळा संपतो.
 
 
आता मान्सूनच्या आगमनासाठी मोजकाच वेळ उरला आहे आणि या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस शेतकर्‍यांसाठी पूरक आणि जंगलांसाठी पोषक ठरेल, अशी आशा आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0