बुध्दपौर्णिमे निमित्त निसर्ग अनुभव कार्यक्रम संपन्न

23 May 2022 20:11:31
KP
 
मुंबई(विशेष प्रतिनिधी): बौध्द पौर्णिमेनिमित्त दि. १६ मे रोजी कोल्हापूर वन्यजीव विभागामध्ये घेतलेल्या निसर्गानुभव कार्यक्रमातंर्गत वन्यजीव गणना करण्यात आली. या गणनेत एका बिबटसह ७५३ प्राण्यांची नोंद करण्यात आली. या उपक्रमात सहभागी मंडळींनी राधानगरी, दाजीपूर व सागरेश्वर वनपरिक्षेतील एकुण ३८ मचाणीवर रात्रभर बसून पाणवठयावर येणाऱ्या वन्य प्राण्यांचे निरीक्षण केले.
 
कोल्हापूर वन्यजीव विभागामधील सर्व निसर्गप्रेमींनी तसेच पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्य करण्याच्या स्वयंसेवी संस्थानांकडून मचाण आरक्षित करण्यात आले होते. कोविड (१९) च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष हा निसर्ग अनुभव वन विभागातील वन कर्मचाऱ्यांच्या सहभागाने पूर्ण करण्यात येत होता. पण या वर्षी लोक उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या मध्ये कोल्हापूर, पुणे, मुंबई, सातारा या जिल्हयातील निसर्ग प्रेमी आणि स्वयंमसेवी संस्थांचा सहभाग होता. मचाणीवर बसण्यापुर्वी सहभागींना सूचना व अटी समजावून सांगण्यात आल्या. आणि प्रत्येक निसर्ग प्रेमीसोबत एक वन कर्मचारी मचाणीवर पाठविण्यात आला होता. तसेच महिला निसर्गप्रमी सोबत महिला वनकर्मचारी मचाणीवर बसण्यसाठी पाठविण्यात आले होते.
 
 
 
 
या कार्यक्रमांतर्गत सांबर, रानगवे, मोर, अस्वल, चितळ, भेकर, रानकोंबडा, अजगर, मुंगुस, माकड, रानडुक्कर, चितळ, ससा, साळिंदर, कोल्हा, घोणस, शेकरु, मलबार, धनेश, बिबट, भेकर असे एकुण ७५३ नमुने लोकांनी पाहिले. यापैकी राधानगरी वनपरिक्षेत्रामध्ये १०८ दाजीपूर वनपरिक्षेत्रामध्ये ४३ व सागरेश्वर वनपरिक्षेत्रामध्ये ५९९ प्राणी प्रत्यक्षात पाणवठयावर नोंदवले गेले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक एन.एस.लडकत व विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर विशाल ह.माळी यांनी मोलाची कामगिरी बजावली. वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) राधानगरी सुहास पाटील तसेच दाजीपूर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी व सागरेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण आणि सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
Powered By Sangraha 9.0