अलीकडच्या भारतीय निर्यातीच्या आकड्यांनी भारतीयांच्या मनात आनंद निर्माण केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात केवळ वस्तूंच्या निर्यातीतून ४२० अब्ज डॉलर्सचे परकीय चलन भारताला मिळणे, ही बाबा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. २०२०-२१ मध्ये, संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यापार एका विशिष्ट पातळीवर स्थिरावला होता. पण, त्याआधी २०१९-२० मध्ये, भारताचे निर्यातीतून उत्पन्न ३३० अब्ज डॉलर होते. कोरोनासारख्या महामारीच्या पश्चात निर्यातीत होणारी वृद्धी ही नक्कीच स्पृहणीय आहे. मात्र, भारतीय निर्यातीचे २०२१-२२ मधील निर्यातीचे आकडे मात्र निर्यात क्षेत्रात आनंद देत आहेत. देशाचे आयात देयक ६१२ डॉलर अब्जांवर आले आहे. म्हणजे इतका चांगला निर्यात डेटा असूनही, १९२ अब्ज डॉलरची व्यापार तूट डोक्यावर आहे. हा आकडा फक्त २०१२ मध्ये यापेक्षा जास्त होता, जेव्हा तो २०२ अब्ज डॉलर इतका होता.
जर आपण सेवा क्षेत्राचा व्यवसाय स्वतंत्रपणे पाहिला, तर गेल्या वर्षी त्यांची निर्यात २५० अब्ज डॉलर होती आणि आयात ११८ डॉलर अब्ज होती. या उपलब्ध डेटावरून भविष्यासाठी भारताला काय संकेत आहेत, हे येणारा काळच सांगणार आहे. कोरोनानंतरच्या जगात भारत एक प्रमुख निर्यातदार देश म्हणून आपले स्थान निर्माण करत असल्याचे हे द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र, ही प्रतिष्ठा कायम टिकविण्यासाठी भारताला व भारतीयांना अधिक परिश्रम करावे लागणार आहे, हेच यंदाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांच्या यादीत भारत आठव्या क्रमांकावर आहे.
चीन, अमेरिका, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स आणि नेदरलँड्स हे सात देश वरच्या स्थानावर आहेत. अमेरिका भारताच्या तिप्पट निर्यात करतो, तर चीन आपल्यापेक्षा पाचपट निर्यात करतो. निष्कर्ष असा आहे की, भारत जगातील दहा मोठ्या निर्यातदारांमध्ये आहे आणि त्याची गती वरच्या दिशेने जात आहे. परंतु, ही चढाई नक्कीच अधिक अंतराची आहे. भारताने निर्यातीच्या आधारावर ४२० अब्ज डॉलर कमावले आहेत. त्यापैकी १०१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे एक चतुर्थांश ’इंजिनिअरिंग गुड्स’ची विक्रीपासूनची कमाई आहे. विशेषतः स्टील, कारचे भाग आणि उपचारांसाठी वापरलेली उपकरणे यांचा यात समावेश आहे.
यामागे ’मेक इन इंडिया’ धोरणाचीही भूमिका नक्कीच महत्त्वाची आहे. परदेशी कंपन्या भारतात माल तयार करीत आहेत आणि त्यांचे भांडवल आणि तंत्रज्ञान लावून बाहेर विकत आहेत. याला १०० टक्के भारतीय निर्यात म्हणणे अवघड आहे. मात्र, भारताला निर्यात क्षेत्रात गती येण्यास ‘मेक इन इंडिया’ हे महत्त्वाचे ठरत असल्याचेदेखील हे एक चिन्ह आहे. जर ही निर्यात पुढे गेली, तर दुसरी सर्वात मोठी निर्यात पेट्रोलियम उत्पादनांची आहे. ज्याची विक्री ५५.५ अब्ज डॉलर आहे. आपल्या आयात बिलाचा सर्वात मोठा भाग कच्च्या तेलाच्या आयातीचा आहे. मोठ्या खासगी मालकीच्या भारतीय ‘रिफायनरी’ पेट्रोल-डिझेल आणि इतर लहान आशियाई देश आणि काही आफ्रिकन देशांना पुरवण्यासाठी आयात केलेले कच्चे तेल वापरत आहेत. पेट्रोकेमिकल्स पुरवठा निर्यातीचा तिसरा सर्वात मोठा घटक म्हणजे ५०.२१ अब्ज डॉलर्सची कृषी उत्पादने आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाच्या निर्यातीत २८८ टक्के वाढ झाली आहे. खरे सांगायचे, तर संपूर्ण भारतीय निर्यातीत सर्वात आश्चर्यकारक वाढ कृषी उत्पादनांमध्ये दिसून आली आहे. यंदा हा आकडा अधिक आश्चर्यकारक ठरला असता, पण एकीकडे युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाचे भाव वाढले, तर दुसरीकडे सरकारी गोदामांमध्ये गव्हाचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घालण्यात आली. चौथी सर्वात मोठी निर्यात रत्ने आणि दागिन्यांमध्ये नोंदवली गेली आहे, जी भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची फार पूर्वीपासून आधारशिला आहे. आयात केलेले सोने आणि मौल्यवान खडेदेखील रुपयाच्या विनिमय दराचे अवमूल्यन करण्यात मोठी भूमिका बजावत असल्याचे दिसून आले आहे. परंतु, दुसरी बाजू अशी आहे की, दागिने बनवताना मोठ्या प्रमाणात मूल्यवर्धन होत असते. भारताची निर्यात क्षेत्रात होणारी गती ही नक्कीच स्पृहणीय आहे.