मुंबई: “महाविकास आघाडीने राज्यसभा निवडणुकीच्या बाबतीत छत्रपती संभाजी राजेंना पाठिंबा देण्याच्या संदर्भात एकत्रितरित्या भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र, एकीकडे शरद पवार संभाजीराजेंना सहकार्य करण्याची भाषा वापरतात, तर दुसरीकडे पवारांचे प्रवक्ते असलेले संजय राऊत वेगळी विधाने करतात. संभाजीराजेंना पाठिंब्याची भूमिका जाहीर करूनही जर महाविकास आघाडीचे नेते अशाप्रकारची वक्तव्ये करत असतील, तर त्यातून छत्रपती संभाजीराजेंचा ‘गेम’ करण्याचा महाविकास आघाडीचा प्लान नाही ना,” असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. ‘ओबीसी’ आरक्षण, राज्यसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रश्नांवर दरेकर यांनी गुरुवार, दि. 19 मे रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
‘ओबीसीं’ना आरक्षण न देण्याचीच सरकारची मानसिकता!
“ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा बट्ट्याबोळ करून दाखवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने करून दाखवले आहे. दोन ते अडीच वर्षे उलटल्यानंतरही राज्य सरकारने ‘ट्रिपल टेस्ट’ किंवा आयोगाची स्थापना न केल्यानेच हे आरक्षण गेले आहे. राज्य सरकारची इच्छाच ओबीसींना आरक्षण देण्याची नाही. कारण, ज्या प्रकारे मध्य प्रदेश सरकारने जलदगतीने पावले उचलत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करत ओबीसींना आरक्षण देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केल्या, तशी कुठलीही हालचाल महाराष्ट्र सरकारच्यावतीने आजपर्यंत करण्यात आली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही जर मध्य प्रदेशातील ओबीसींना आरक्षण मिळत असेल, तर मग महाराष्ट्र सरकारला ते का जमत नाही? मुळात ओबीसींना आरक्षण देण्याची महाविकास आघाडी सरकारची मानसिकताच नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जर झाल्या, तर त्याला सर्वस्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. राज्य सरकार भांबावलेले असून त्यांना वसुलीशिवाय इतर काहीही दिसत नाही. केवळ खुर्ची टिकविणे हाच या सरकारचा अजेंडा आहे. सत्ताधारी पक्षातील काही मंडळीच ओबीसींना आरक्षण मिळू नये, यासाठी दबाव निर्माण करत असून त्यांच्या दबावामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.”
केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल
“राज्यसभेच्या दोन जागा भाजप लढवणार असून तिसर्या जागेबाबत आमचे केंद्रीय संसदीय मंडळ अधिकृत निर्णय घेईल. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील केंद्रीय नेतृत्वाला याबाबतीत माहिती देतील आणि त्यानुसार पुढील गोष्टी ठरतील. कुठल्याही पक्षाला आपला खासदार निवडून यावा, अशी भावना वाटत असेल तर त्यात काही गैर नाही. त्यामुळे जर राज्यसभेच्या तिसर्या जागेवर भाजपचा खासदार निवडून येत असेल, तर पक्ष त्याचा विचार करेल,” असे दरेकर म्हणाले.
संस्कृतीचे गोडवे गाणार्या सुप्रिया सुळेंचे ‘ते’ वक्तव्य अशोभनीय
स्मृती इराणींच्या कार्यक्रमानंतर झालेल्या राड्यावर आणि सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, ”सुप्रिया सुळेंचे वक्तव्य अशोभनीय आहे. जनतेला शांतता आणि सौहार्दाचे आवाहन करणार्या पवारांच्या कन्या जर अशाप्रकारे हातपाय तोडण्याची भाषा वापरत असतील, तर ते नक्कीच दुर्दैवी आहे. संस्कृतीचे गोडवे गाणार्या सुप्रिया सुळेंच्या तोंडून अशा प्रकारची भाषा जर येत असेल, तर नेमकी त्यांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. इतरांच्या प्रक्षोभक वक्तव्यावर कारवाई करणारे सरकार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर शांत आहे. त्यामुळे सुप्रियाताईंना कायदा लागू होत नाही का, हा सवाल उपस्थित होतो. राज्यात होत असलेले प्रकार हे सरकार पुरस्कृत दहशतवादाचे उदाहरण आहे.”
आजही बाळासाहेबांना यातना होत असतील
“राज्यात निर्माण झालेले महाविकास आघाडीचे समीकरण पाहायला आज बाळासाहेब हवे होते. मात्र, वस्तुस्थिती अशी की, जेव्हापासून राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली आहे, तेव्हापासून ते आजही बाळासाहेबांना हे सरकार पाहून यातनाच होत असतील. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना कुठल्या विचारांनी प्रेरित केले होते आणि आज पक्ष कुठल्या विचारांवर चालतो आहे हे राज्यातील जनता पाहत आहे. सत्तेच्या लाचारीपोटी आणि सत्तेच्या धुंदीत शिवसेनेचे ‘स्पिरिट’च संपुष्टात आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात टोकाची भूमिका घेणार्या बाळासाहेबांचे नातू जर असे वक्तव्य करत असतील तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीही असू शकत नाही.”