वाॅशिंगटन: 'पेनसिल्व्हेनिया'च्या 'डॅनव्हिल' भागात “शांती मंदिर” नावाचे एक हिंदू मंदिर आणि सामुदायिक केंद्र उभारण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १५ मे रोजी होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल एक दशलक्ष डॉलर्स इतका निधी लागणार आहे.
मंदिर निर्माणासाठी डॅनव्हिल' भागात ३० एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. या जागेत एका तलावाचा देखील समावेश आहे. या वास्तूचे बांधकाम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमिपूजन सोहोळ्यामध्ये गणेश पूजा, शुद्धीकरण प्रक्रिया, नवग्रह पूजा आणि महाआरतीचा समावेश असेल. पुढील वसंत ऋतुपर्यंत मंदिर कार्यान्वित होईल अशी आशा अमेरिकेतील भारतीयांनी व्यक्त केली आहे. या मंदिरात दसरा, दिवाळी, होळी, पोंगल असे विविध सण साजरे करण्याची योजना आहे. त्याचबरोबर मोफत अन्न-कपडे वाटप आणि आरोग्य उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या मध्ये योग आणि ध्यान वर्ग, युवा उपक्रमांचा समावेश असेल. या देऊळ संकुलात दुर्गा, गणेश, लक्ष्मी, राधा-कृष्ण, राम-परिवार, सरस्वती, शिव, श्रीनाथजी, व्यंकटेश्वर इत्यादी विविध देवतांच्या मूर्तींचा समावेश करण्याची योजना आहे.
उपभोगवादी समाजातील अनेक विचलनामध्ये हिंदू अध्यात्म, संकल्पना आणि परंपरा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. आणि हे मंदिर या दिशेने मदत करेल अशी आशा युनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिंदूइझमचे अध्यक्ष राजन झेड यांनी व्यक्त केली.