‘हार्दिक’ अभिनंदन!

19 May 2022 09:46:18
 
 
 
hardik patel
 
 
 
 
 
गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षप्रवेश करणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला बुधवारी रामराम ठोकला. खरंतर आज ना उद्या काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले हार्दिक पटेल राजीनामा देणार, हे उघड होतेच. त्यांनी यासाठी फक्त मुहूर्त साधला तो काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतरचा. पटेल यांनी ट्विटरवर आपल्या राजीनाम्याचे सोनिया गांधींना उद्देशून पत्र लिहिले आणि राजीनाम्याची कारणंही स्पष्ट केली. त्या पत्रात नेमके काय आहे, ते सोशल मीडियावर प्रसिद्धही झाले. एवढेच नाही, तर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला केलेले उपदेशही तसे नवीन नव्हेच. कारण, यापूर्वीही ज्या ज्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, त्यांनीही त्याच मुद्द्यांवर बोट ठेवत काँग्रेसमधून निरोप घेतला होता. याचाच अर्थ, उदयपूरमध्ये काँग्रेसचे चिंतन झाले असले तरी या खंडीभर राजीनामापत्रांचा मात्र कदापि विचार झालेला दिसत नाही हार्दिक पटेल यांनी आपल्या पत्रातून तीन मुद्द्यांतून काँग्रेसच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाला गुजरातमध्ये काडीमात्र रस नसून इथे लक्ष द्यायलाही त्यांच्याकडे वेळ नाही. त्यातच काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते गुजरात आणि गुजरातींकडे दुजाभावाने बघतात, असा आरोपही पटेल यांनी केला. दुसरा मुद्दा म्हणजे, स्थानिक काँग्रेस नेत्यांची चाटूगिरी. ‘गुजरात दौर्‍यावर आलेल्या काँग्रेस नेत्यांना चिकन सॅण्डविजेस कशी वेळेवर मिळतील, यासाठी नेत्यांची धडपड सर्वस्वी केविलवाणी म्हणावी लागेल,” असे म्हणत गुजरात काँग्रेसची दयनीय अवस्था पटेल यांनी प्रकर्षाने अधोरेखित केली. तसेच, तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, काँग्रेसचे विकास सोडून केवळ विरोधकेंद्रित राजकारण. ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘कलम-३७०’, ’जीएसटी’ अशा सगळ्याच देशहिताच्या निर्णयाला काँग्रेसने केवळ विरोध केला. पण, देशाला या समस्यांवर दीर्घकाळापासून समाधान हवे होते. परंतु, काँग्रेसने केवळ त्यात अडसरच निर्माण केल्याचे पटेल यांनी नेमके शब्दांत मांडले. हार्दिक पटेल यांनी आपल्या पत्रात मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यांत तथ्य आहेच. यापूर्वीही अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडताना आपली व्यथा वेळोवेळी मांडली. पण, त्यांना विचारतयं तरी कोण म्हणा... कारण, आजची काँग्रेस ही आपल्या ऐषोरामी रम्य चिंतनातच व्यग्र दिसते.
 
 
चिंतनाच्या नंदनवनात...
 
 
एखादी व्यक्ती त्याच त्याच चुका वारंवार करत असेल, आधीच्या चुकांमधून कोणताही धडा घेत नसेल, तर ती व्यक्ती अधोगतीच्या मार्गाला लागली, असे समजावे. काँग्रेसच्या बाबतीतही नेमके हेच झालेले दिसते. पराभवानंतर पराभवाचे धक्के पचवणारा काँग्रेस पक्ष चिंतन, आत्मचिंतन करूनही सुधारण्याची लक्षणे शून्यच. खरंतर ज्याप्रमाणे एखादी संस्था सोडून जाताना, कर्मचार्‍यांचे ‘एक्झिट इंटरव्ह्यू’ घेतले जाण्याची एक प्रथा आहे. त्याअंतर्गत संबंधित कंपनीचे ‘एचआर’ व्यवस्थापन कंपनी सोडून जाणार्‍या कर्मचार्‍याला त्यासंबंधीची कारणे विचारते, कंपनी यासाठी काही करू शकते का वगैरे प्रश्न विचारून त्या कर्मचार्‍याकडून त्याच्या नाराजीची कारणे रीतसर नोंदवली जातात. पण, इतर सर्व बाबतीत ’कॉर्पोेरेट कल्चर’च्या धर्तीवर चालणारा काँग्रेस पक्षाला अशा काही ‘कॉर्पोरेट’ नियमांचे मात्र वावडेच. म्हणूनच काँग्रेसमध्ये ‘इन्कमिंग’ कमी आणि ‘आऊटगोईंग’ जास्त अशी सद्यःस्थिती. काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले पंजाबचे सुनील जाखड असतील अथवा हार्दिक पटेल यांच्या ‘एक्झिट’नंतर पक्षनेतृत्वाने त्याला तसूभरही महत्त्व दिले नाही. उलट हे नेतेच कसे पक्षविरोधी, नेतृत्वविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते, याची ‘री’ ओढत त्यांच्यावर टीकास्त्र डागले गेले. एकूणच काय, तर महाराष्ट्राचे विखे-पाटील असतील, आसामचे हिमंता बिस्वा सरमा किंवा मध्य प्रदेशचे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारख्या दिग्गजांनी पक्ष सोडल्यानंतरही तीच गत, त्यात मग हार्दिक पटेलसारखे एक-दोन वर्षांपूर्वी पक्षात सामील झालेल्यांना विचारतयं तरी कोण? त्यामुळे चिंतनाच्या नंदनवनात वावरणार्‍या काँग्रेसने असा सार्वजनिक पातळीवर ‘आम्ही सुधारतोय’ असा कितीही आव आणला तरी सत्य हेच की, काँग्रेस जशी आहे, तशीच राहणार. या देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या या अवस्थेसाठी सर्वस्वी जबाबदार आहे ते विद्यमान काँग्रेस नेतृत्व, ज्यांना विषयांची अजिबात समज नाही आणि लोकांची जाण तर त्याहूनही नाही. तेव्हा, जोपर्यंत काँग्रेस पक्ष गांधी परिवाराच्या जोखळदंडातून मुक्त होणार नाही, तोपर्यंत तरी या पक्षात नवसंजीवनी संचारणे कर्मकठीणच!
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0