मुंबई (प्रतिनिधी): हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार पुढील पाच दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर, विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
आजपासून पुढील चार दिवस राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले. हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
नैऋत्य मान्सूनने सोमवारी दि. १६ रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचला आहे. या पावसाने चार महिन्यांच्या मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे, अशी भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. हवामान विभागाने सांगितले की, नैऋत्य वाऱ्यांच्या जोरामुळे अंदमान आणि निकोबार बेटे आणि लगतच्या भागात पाऊस पडत आहे. पुढील 2-3 दिवसांत, नैऋत्य मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, संपूर्ण अंदमान बेटे आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे जाण्यास अनुकूल आहे. लक्षद्वीप आणि उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या उपस्थितीमुळे, पुढील पाच दिवसांत केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकच्या वेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.