जगात जेव्हा म्हणून कधी युद्धजन्य परिस्थिती उद्भवते तेव्हा आर्थिक आणि अन्नधान्यविषयक समस्या डोके वर काढत असतात. आज जग रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या गडद छायेतून मार्गस्थ होत आहे. अशा वेळी तुलनेने मागे असलेल्या आफ्रिका खंडाला अन्नधान्यविषयक समस्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. युक्रेनच्या संकटाचा विपरित परिणाम आफ्रिका खंडावर झल्याचे दिसून येत आहे, ज्याकडे जगाचे आतापर्यंत फारसे लक्ष गेले नव्हते. मात्र, ही समस्या आता भीषण स्वरूप तर धारण करणार नाही ना? अशी शंका जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम आफ्रिका खंडातील दुर्गम भागातील देशांमध्ये चिंतेचा विषय बनत आहे. या देशांचे अन्नसंकट पूर्वीपेक्षा गंभीर होत चालले आहे. खरंतर, आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये, दीर्घकाळ चालणारा दुष्काळ, अंतर्गत हिंसाचार आणि इतर कारणांमुळे आधीच अन्नसंकट होते. गहू, मका, खाद्यतेल आदींसारख्या मुख्य खाद्यपदार्थांसाठी यापैकी बरेच देश मुख्यत्वे युक्रेन आणि रशियावर अवलंबून होते. याशिवाय त्यांना या देशांतून मोठ्या प्रमाणात रासायनिक खतेही मिळाली, ज्यावर त्यांची स्वतःची अन्नउत्पादन क्षमता अवलंबून आहे.
परदेशी प्रकल्प आणि तज्ज्ञांनी आफ्रिकेतील इतर प्रकल्पांतर्गत रासायनिक खतांचा विकास केला आहे. कीटकनाशके आणि महागड्या बियाण्यांवर आधारित शेतीचा ताण निर्माण झाला असून, त्यामुळे पूर्वी स्वयंपूर्ण असलेली येथील जमीन आता रासायनिक खतांच्या आयातीवर अधिक अवलंबून आहे. युक्रेन युद्धाच्या उद्रेकामुळे अन्न आणि खतांची आयात कमी झाल्यामुळे आफ्रिका खंडातील अनेक देशांतील अन्नाची स्थिती बिकट झाली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, युद्ध सुरू होण्याआधीच, जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत आणि इतर संस्थांचे अधिकारी यावर्षी अन्नसंकट पूर्वीपेक्षा भयंकर असू शकते असा इशारा देत होते.
जागतिक अन्न कार्यक्रमही आफ्रिकन अन्नसंकटाने त्रस्त असलेल्या प्रदेशांमध्ये अन्न उपलब्धी कार्यक्रम चालवणार्या अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संस्थांपैकी एक आहे. यासाठी, या कार्यक्रमाद्वारे प्रथम युक्रेनमध्ये धान्य खरेदी करण्यात आले, पूर्व आफ्रिकेत, ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ प्रदेशात दुष्काळ पडला. या नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमुळे हा भाग अधिक प्रभावित झाला. त्यात प्रामुख्याने सोमालिया, इथिओपियासारखे मोठे देश आणि केनियाचा काही भाग यांना मोठा फटका बसला. अलीकडच्या वर्षांत येथे फारच कमी पाऊस झाला आहे. अंतर्गत हिंसाचाराशी संबंधित समस्यादेखील आहेत. त्याच्या संमिश्र परिणामामुळे येथील अन्नपदार्थांची स्थिती खूपच बिघडली आहे. हवामान बदलाच्या या युगात प्रतिकूल हवामानाची भीती वाढली आहे. या परिस्थितीत नागरिकांनी शांतता राखणे अत्यंत आवश्यक आहे.
पण शोकांतिका अशी आहे की, या संवेदनशील आणि नाजूक काळातही आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत हिंसाचार उसळला आहे. आणि इथिओपिया, नायजेरिया आणि सुदान यांसारख्या मोठ्या देशांना या हिंसाचाराचा मोठा फटका बसला आहे. गृहयुद्धानंतर सुदान दोन देशांमध्ये विभागला गेला. सुदान आणि दक्षिण सुदान वाढत्या उपासमारीच्या समस्येदरम्यान, हेदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे की, १९७१-२०११ या ४० वर्षांच्या दरम्यान सेहल, ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ आणि इतर प्रदेशात उपासमार आणि दुष्काळामुळे लाखो लोक मरण पावले आहेत.
जागतिक विकास आणि पर्यावरण आयोगाने १९८७ मध्ये अहवाल दिला की, गेल्या तीन वर्षांत, आफ्रिकेत दुष्काळ आणि उपासमारीने सुमारे दहा लाख लोक मरण पावले. १९७० ते २०२२ या ५२ वर्षार्ंत इतर कोणत्याही प्रदेशात उपासमारीने मृत्यू झाल्याचे दुसरे उदाहरण नाही. याआधी, १९५९-६० च्या सुमारास चीनमध्ये ’ग्रेट लीप’च्या काळात दुष्काळ आणि उपासमारीने जास्त मृत्यू झाले होते. २०२१ च्या सुरुवातीस, अन्न आणि कृषी संघटना आणि जागतिक अन्न कार्यक्रमाने ’हंगर हॉटस्पॉट्स’ नावाने एक अहवाल तयार केला, ज्यामध्ये जगातील २० देश ओळखले गेले, जेथे भुकेची समस्या जास्त आहे आणि भविष्यात ती अधिक तीव्र होऊ शकते. या २० देशांपैकी १२ देश आफ्रिका खंडातील होते. त्यामुळे केवळ आपला अहंकार जोपासण्यासाठी सुरू झालेला संघर्ष आता जागतिक पातळीवर उपासमारीचे मोठे कारण म्हणून समोर येत आहे. या घटनेचा आता माणूस म्हणून कुठेतरी नक्कीच विचार होणे आवश्यक आहे.