मोदींना पर्याय मोदीच!

12 May 2022 10:35:27
  
 Narendra Modi 
 
 
 
 
मोदींना पर्याय मोदीच असू शकतात. मोदी ही व्यक्ती नसून एक विचार आहे. एक संकल्पना आहे. ही गोष्ट ज्यांना समजली, त्यांना मोदी समजले असे म्हणावे लागेल.  
 
 
 
जकीय चर्चेत आता २०२४च्या निवडणुका हा विषय आहे. नरेंद्र मोदी यांना पर्याय कोणता? याबद्दल बहुतेक राजकीय विश्लेषक आपल्या राजकीय ज्ञानाप्रमाणे व बुद्धीप्रमाणे चर्चा करीत असतात. मोदींना पर्याय देणे आवश्यक आहे, असा त्यांचा युक्तिवाद असतो. मोदींना पर्याय का हवा, याची पुढील कारणे दिली जातात.
 
 
* मोदींमुळे लोकशाही धोक्यात येत चालली आहे.
* मोदींमुळे देशात जातीय तेढ वाढत चालली आहे.
* मुसलमान समाजाला राजकीयदृष्ट्या एकाकी पाडले जात आहे.
* यामुळे देशाचे ऐक्य धोक्यात आले आहे, धार्मिक राजकारण देशासाठी धोकादायक आहे.
* मोदींच्या शासनामुळे उदारमतवादी, मानवाधिकारवादी,पर्यावरणवादी यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्यांचा पक्ष घेणारे पत्रकार आणि लेखक, विचारवंत यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
 
 
पुढील निवडणुकीनंतर ‘मोदी नकोत’ यांची आणखी कारणे देताना, हे ज्ञानी आणि बुद्धिमान लेखक मांडतात की, देशातील फक्त दोन टक्के लोक श्रीमंत झाले आहेत. अन्य आहेत त्या ठिकाणी आहेत. बेकारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. नवीन रोजगार उपलब्ध होत नाहीत. चीनसंदर्भातील परराष्ट्रीय धोरण अयशस्वी झाले आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत जशी अराजक परिस्थिती आहे तशी परिस्थिती मोदी पुन्हा निवडणूक आल्यास होईल.
बुद्धिमान आणि ज्ञानी राजकीय विश्लेषकांच्या मांडणीतील हा सारांश आहे. त्यांनी मोदींना पर्याय कोण कोण असू शकतात, अशा नावाची चर्चादेखील केली आहे. पंजाबच्या निवडणुका केजरीवाल यांनी जिंकल्यामुळे अनेक बुद्धिमान केजरीवालमय झाले आहेत.
 
 
ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये विजय मिळवल्यामुळे ममतादीदी याच मोदींना पर्याय आहेत, असेही या ज्ञानी लोकांना वाटते. शरद पवारांनी महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर ठेवले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले, तेच उद्याच्या भारताचे ‘किंगमेकर’ आहेत. संजय राऊत यांना वाटते की, उद्धव ठाकरे उद्याचे पंतप्रधान आहेत. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे कोणी नाव घेत नाही, हे आश्चर्य वाटणारे आहे, असे विश्लेषण करणारे ज्ञानी आणि बुद्धिमान असल्यामुळे ‘तुम्ही अर्धवट आहात, मोदी द्वेषाची कावीळ तुम्हाला झाली आहे,’ असे आपल्याला म्हणता येणार नाही. ‘आम्ही म्हणजे भारताची बुद्धी आणि आमच्या बुद्धीने भारत चालतो,’ असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते, जनतेने त्यांच्या कानाखाली २०१४ साली लगावली. २०१९ साली दुसर्‍या कानाखाली ठेवून दिली आता २०२४ साली त्यांच्या पेकाटात लाथ बसणार आहे. आपली जनता बिचारी साधीभोळी असते. तिला या ज्ञानी लोकांचे अवजड शब्द समजत नाहीत. ती मोदींचे मूल्यमापन दोन कसोटीवर करते. १) ते प्रामाणिक आणि सत्यवादी आहेत का? २) सर्वांना सारखी वागणूक देऊन न्याय करणारे आहेत का? या दोन्ही गोष्टी एकत्र करून एका वाक्यात सांगायचे, तर मोदी धर्माने चालणारे आहेत का? या प्रश्नांचे जनतेचे उत्तर ‘होय’ असेच असेल.
मोदींना पर्याय मोदीच असू शकतात. मोदी ही व्यक्ती नसून एक विचार आहे. एक संकल्पना आहे. ही गोष्ट ज्यांना समजली, त्यांना मोदी समजले असे म्हणावे लागेल. नेहरू-इंदिरा कालखंडाचा विचार एक संकल्पना म्हणून करावा लागतो. या कालखंडातील नेहरू-इंदिरा संकल्पनेचे मुख्य बिंदू असे होते-
 
 
* समाजवादी समाजरचना
* खासगी उद्योगांवर बंधने
* सरकारीकरणावर भर
* नोकरशाहीचा विस्तार व वरचष्मा
* यातून निर्माण झालेला भ्रष्टाचार
* मुस्लीम-ख्रिश्चन समुदायाचे तुष्टीकरण
* पाकिस्तान, चीन संबंधित मवाळ धोरण
* प्रादेशिकतावादाला खतपाणी
* आंतरराष्ट्रीय स्तरावर उपदेशकांची भूमिका
 
 
या संकल्पनेला नाव देण्यात आले ‘सेक्युलर विकासाचे उदारमतवादी मॉडेल.’या रचनेमुळे देशाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. विकासाचा दर तीन-चार टक्के राहिला. इस्लामी दहशतवाद जन्माला आला. मिशनर्‍यांमार्फत प्रचंड धर्मांतरे झाली. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशामुळे देश पोखरला गेला. याचा परिणाम म्हणून काँग्रेस पक्ष लोकांच्या मनातून उतरला. २०१४ साली काँग्रेसची विचारधारा लोकांनी नाकारली, मोदींची विचारधारा स्वीकारली आणि देशात मूलगामी क्रांती झाली. २०१४चे सत्तांतर ही एकाअर्थाने अहिंसक राज्यक्रांती आहे. ज्ञानाचे आणि बुद्धीचे ओझे झाल्यामुळे आपल्या राजकीय विश्लेषकांना हे समजायला अडचण निर्माण होते.
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0