रिकामटेकडा भयंगडनिर्माता!

12 May 2022 11:01:23
 
 
 
Sri Lanka Violence 
 
 
 
 
 
खरंतर समाजमाध्यमांवरील उथळ चर्चांना गांभीर्याने घ्यायचे नाही, असे कितीही ठरविले तरी हल्ली या चर्चांच्या माध्यमातून पसरविल्या जाणार्‍या भयंगडाकडे कानाडोळा मात्र करता येत नाही. कारण, याच समाजमाध्यमांतून देशविरोधी अपप्रचार करून जनतेची माथी भडकाविणार्‍यांची संख्या निश्चितच कमी नाही. त्यातच आता श्रीलंकेतील अराजकाची परिस्थिती भारतात उद्भवू शकते, महागाई वाढली तर येथील नेत्यांची घरंही अशीच आगीच्या भक्ष्यस्थानी येतील वगैरे अफवांचे दुकान सध्या तेजीत आहे. दुर्दैवी बाब म्हणजे, ज्यांचा या विषयाशी तसूभरही संबंध नाही, तीच मंडळी या आगलावेपणात आघाडीवर दिसतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे कमाल खान उर्फ केआरके! आता समाजमाध्यमांवर हा माणूस काय काय आणि किती किती बाष्कळ बडबडतो, याची यादी तशी न संपणारी! पण, आता आडनाव ‘खान’ म्हटल्यावर या महाशयांनी श्रीलंकेतील परिस्थितीलाही जबाबदार ठरविले ते तेथील हिंदू-मुस्लीम संघर्षाला. खान यांच्या अजब तर्काप्रमाणे, “श्रीलंकेत लष्कराला दिसताच क्षणी आंदोलकांना गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा श्रीलंकेतील हिंदू-मुस्लीम राजकारणाचा परिणाम आहे. आता हिंदू-मुस्लीम कोणीही सरकारसाठी महत्त्वाचे नाही. भारतीयांकडे अद्याप श्रीलंकेकडून शिकण्यासाठी वेळ आहे. हे राजकीय नेते कोणाचेच नाहीत.” या ट्विटसोबत श्रीलंकेतील मुसलमान, ख्रिश्चनांवर कसे अत्याचार होतात, भारतातही कशा तशाच स्वरुपाच्या बातम्या आहेत, या वृत्तांचे ‘क्लिपिंग्ज’ही खानने जोडले. पण, खानचा उद्देश श्रीलंकेप्रती किंवा तेथील मुसलमानांप्रती सहानुभूतीचा मुळी नव्हताच, तर भारतातील मुसलमानांची माथी भडकाविण्यासाठी या सगळ्याचा कसा वापर करता येईल, मोदी सरकारला कसे बदनाम करता येईल, म्हणूनच हा सगळा खटाटोप. कमाल खान असो किंवा अन्य कुणी, समाजमाध्यमांवर कितीही टिवटिवाट केल्याने ‘भारताचा श्रीलंका होईल’ ही भीती कधीही सत्यात उतरणार नाही. कारण, भारताने स्वातंत्र्यापासून ते आजतागायत अनेक आर्थिक, सामाजिक, राजकीय संकटांचा कसोशीने, एकदिलाने सामना केला आहे आणि यापुढेही आपला देश तो तसा नेटाने करेलच. तेव्हा, खानसारख्या समाजमाध्यमांवर रिकामटेकड्यांनी भारताच्या एकात्मतेची आणि अर्थव्यवस्थेची काळजी तर त्याहूनही न केलेलीच बरी!
 
 
 अल्पसंख्याकांचा अल्पबुद्धी कळवळा
 
 
कमाल खानप्रमाणेच समाजमाध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर अल्पसंख्याकांच्या मानवाधिकारांची तळी उचलत बरळणार्‍यांची कीव करावी तेवढी कमीच. कारण, भारतातील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचा आक्रोश करणार्‍यांना त्यांच्याच समाजातील, धर्मातील कुठल्याही गोष्टीवर बोट ठेवण्याची मुळी हिंमतच नाही. मग विषय भारतातील मुस्लिमांचा असो किंवा जगातील मुसलमानांचा. यांना दिसतो तो फक्त भोंगे हटविण्याचा निर्णय किंवा बाबरी-ज्ञानवापीचा मुद्दा. पण, आपल्याच देशातील मुसलमानांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर या मंडळींची तोंड आपसुकच शिवली जातात. केरळमध्ये एका मुस्लीम तरुणाने इस्लाम धर्माचा त्याग केला, म्हणून त्याचा समाजाने छळ केला. त्यावर खान आणि गँग गप्प का? फुटीरतोवादी यासिन मलिकने पाकिस्तानच्या सांगण्यावरून ‘मी काश्मीरात मुस्लीम तरुणांची माथी भडकाविली,’ याची कबुली दिली, त्यावर या धर्मांधांचे काय म्हणणे आहे? हिंदूंच्या शोभायात्रांवर हल्ले झाले, त्याबद्दल यापैकी किती जणांनी निषेधाचा शब्द उच्चारला? साहजिकच एकानेही नाही! आताही भारतात अल्पसंख्याकांवर कसे अत्याचार होतात, याची री ओढणार्‍या या मंडळींनी आधी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांची आज नेमकी काय परिस्थिती आहे, त्याची किमान माहिती करून घेण्याचे कष्ट घ्यावे. एवढेच काय, तर अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पुन्हा एकदा महिलांना केलेल्या बुरखासक्तीच्या निर्णयावर खान आणि गँग टिवटिवाट करून विरोध करण्याचे धारिष्ट्य दाखविणार का? त्यामुळे अल्पसंख्याकांच्या अत्याचाराच्या नावाखाली चालवलेला हा रडीचा डाव खेळून आता उपयोग शून्यच! तेव्हा, उगाच समाजमाध्यमांवर आपल्याच समाजबांधवांची माथी ठणकाविण्याचे नापाक उद्योग करण्यापेक्षा, त्यांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी या समाजमाध्यमांचा कसा सकारात्मक वापर करता येईल, ते पाहावे. आपले खिसे भरून, दुबईला आलिशान बंगल्यांमध्ये राहून भारतातील मुसलमानांच्या दयनीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा मुळी खानसारख्यांना कदापि अधिकार नाही. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या नावाने सुरू असलेल्या या अल्पबुद्धी कळवळ्यातून हाती काहीच लागणार नाही, हेच खरे!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0