पेटत्या लंकेचे ‘राज’भोग

11 May 2022 09:40:01
 
rajpakshe
 
 
 
घराणेशाहीचा स्वार्थी आणि खिसेभरु कारभार अख्ख्या देशालाच कसा बुडीत काढू शकतो, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे श्रीलंका. रामायणात दुष्ट रावणाच्या सोन्याच्या लंकेला हनुमानाने भस्मसात केले होते. आज श्रीलंकेच्या सर्वार्थाने पिचलेल्या, महागाईच्या बोज्याखाली दबलेल्या नागरिकांनीच लंका पुन्हा पेटवली. दशमुखी रावणाप्रमाणे राजपक्षे घराण्यातील अशाच चार-दहा जणांच्या हातात सत्ता एकटवल्याने श्रीलंकेच्या नशिबात हे ‘राज’भोग आले आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री, पर्यटनमंत्री, सुरक्षामंत्री असे सगळेच राजपक्षे. त्यामुळे साहजिकच राजपक्षे घराण्याच्या हातातच श्रीलंकेच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. पण, जनतेचे भले करण्यापेक्षा या राजघराण्याने केवळ आणि केवळ आपले आणि आपल्या कुटुंबाचे खिसे भरण्यातच धन्यता मानली.
 
 
 
 
 
पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी तर आपलाच भाऊ असलेल्या राष्ट्रपती गोटाबायांकडे राजीनामा सुपूर्द केला. पण, राजपक्षेंच्या राजीनाम्यामुळे देशातील जनतेतला धुमसता रोष अजिबात शमला नाही. उलट राजपक्षेंच्या हंबनटोटा भागातील पूर्वजांच्या घरालाही संतप्त आंदोलकांनी स्वाहा केले. एवढेच नाही, तर या आंदोलकांनी अशाच काही सत्ताधारी खासदारांच्या घरांवरही हल्ले चढवले. या चकमकीत एका सत्ताधारी खासदाराचा मृत्यू झाल्याचेही समजते. पण, अन्न, पाणी, वीज, इंधन, अशा सगळ्याच मूलभूत गरजांपासून वंचित श्रीलंकन नागरिकांच्या आक्रोशाचा हा भडका उडणे अगदी साहजिकच. परिणामी, श्रीलंकेत सध्या अराजकाची परिस्थिती शिगेला असून, या देशात कोणत्या क्षणी काय घडेल, याचा अजिबात नेम नाही.
 
 
 
 
 
श्रीलंकेत आणीबाणी असून, मोठ्या प्रमाणात सैन्यतैनाती असली तरी जनसामान्यांच्या रोषाला रोखण्यास सरकारला नाकीनऊ आले आहेत. याचे कारण म्हणजे, यंदा केवळ श्रीलंकेतील गरीब, पिचलेला वर्गच नव्हे, तर मध्यमवर्गही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली. शाळा, महाविद्यालये बंद पडली. कामगारांनीही संप पुकारला. त्यामुळे श्रीलंकेतील बहुतांश कारभार ठप्प झाले असून, पर्यटनावर अवलंबून असलेल्या या देशात आता जोपर्यंत स्थिरता, शांतता पुनर्प्रस्थापित नाही, तोपर्यंत या देशाकडे पर्यटकांची पाऊले वळणे कठीणच! परंतु, जर देशाला रुळावर आणायचे असेल, तर काळजीवाहू सरकारशिवाय पर्याय नक्कीच नाही. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंनी असेच सर्वपक्षीय सरकार श्रीलंकेत स्थापन करण्यासाठी संसदेची लवकरच बैठक बोलावली आहे. पण, विरोधक मात्र राजपक्षे घराण्यातील एकाही शेहजाद्याशिवाय हे काळजीवाहू सरकार चालविण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे श्रीलंकेला या गर्तेतून बाहेर काढायचे असेल, तर सर्वप्रथम सत्ताधारी आणि विरोधकांनाही आडमुठेपणा सोडून चर्चेतूनच या राष्ट्रीय संकटावर मार्ग काढावा लागेल. पण, राजपक्षे घराण्यातील सदस्यांनी त्यांचा हेकेखोरपणा जर असाच कायम ठेवला, तर श्रीलंकेत त्यांना श्वास घेणेही मुश्किल होऊन बसेल. त्यामुळे आंदोलक असतील अथवा विरोधक, यांच्याशी सामंजस्याची भूमिका घेण्यातच राजपक्षे घराण्याचे हित आहे, हे मात्र नक्की.
 
 
 
 
पण, दुर्दैवाची बाब म्हणजे, देश या अभूतपूर्व संकटात असतानाही राजपक्षेंच्या समर्थकांनी मात्र आंदोलनकर्त्यांवरच हल्ला करून त्यांचा अधिक रोष ओढवून घेतला. त्यामुळे राजपक्षेंनी आपल्या कार्यकर्त्यांची फौज आंदोलकांचा बिमोड करण्यापेक्षा आता श्रीलंकेला सावरण्यासाठी मैदानात उतरविणे खरंतर गरजेचे आहे. पण, त्या देशाचे दुर्दैव की, हे राजपक्षे अद्याप त्यांच्या धुंदीत मस्त आहेत. कारण, संपत्तीचा केलेला अमाप साठा. एका अहवालानुसार, राजपक्षेंनी जवळपास २०-२५ अब्ज डॉलर्सच्या घरात माया गोळा केली आहे. त्यामुळे श्रीलंकेतील नागरिक भूकेकंगाल होऊन मेले तरी राजपक्षे घराणे आणि त्यांच्या वंशजांवरही कधी तशी वेळ येऊ नये, याची तजवीज या मंडळींनी केलेली दिसते. पण, जर श्रीलंकेतील आंदोलक राजपक्षेंचे जुने घर, त्यांच्या वडिलांचे स्मारक उद्ध्वस्त करू शकतात, तर राजपक्षे घराण्याची धुळीस मिळालेली प्रतिष्ठा यावरून लक्षात यावी. तेव्हा, आगामी काळात श्रीलंकेतील परिस्थिती निवळली नाही, तर राजपक्षे घराण्यावर जीव मुठीत घेऊन देश सोडून जाण्याची वेळ आलीच, तर आश्चर्य वाटायला नको. तसेच, यानंतर श्रीलंकेत जेव्हा कधी निवडणुका होतील, त्यामध्ये राजपक्षे या राजकीय घराण्याचा अस्त झालेला दिसू शकतो. पण, यासाठी गरज आहे ती विरोधकांच्या एकतेची आणि राष्ट्रीय नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0