अमरावती: आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली किनारपट्टीवर मंगळवारी संध्याकाळी एक रहस्यमय सोनेरी रंगाची रथासारखी रचना दिसली. हा रथ दक्षिणपूर्व आशियाई देशांमधील मठाच्या आकाराशी जुळत आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने हा रथ किनाऱ्यावर आणण्यात आला.
आसनी चक्रीवादळाच्या तडाख्यात हा रथ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर भरकटल्याचा संशय आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आलेल्या भरतीच्या लाटांमुळे हा रथ किनाऱ्यावर वाहून गेला असावा, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. म्यानमार, थायलंड, मलेशिया किंवा इंडोनेशियासारख्या अंदमान समुद्राजवळच्या देशातून ते भारतीय किनार्यावर पोहोचले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की ते कदाचित दुसर्या देशातून आले असावे आणि त्यांनी त्याच्या स्रोताची चौकशी करण्यासाठी गुप्तचर आणि उच्च अधिकार्यांना कळवले आहे.
काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ते परदेशातून आलेले नसून, भारतातील चित्रपटाच्या सेटवरून आलेले असू शकते. संताबोमाली तहसीलदार जे. चलमय्या म्हणाले, "आम्हाला शंका आहे की हा रथ भारतीय किनारपट्टीवर कुठेतरी चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरला गेला होता आणि उच्च भरती-ओहोटीमुळे तो श्रीकाकुलम किनाऱ्यावर आला असावा."