स्वअस्तित्वाची साक्ष देणारी ‘साक्षी’

11 May 2022 10:10:04
 
 
 
 
 
 
 
 
swimmer sakshi
 
 
 
 
 
संकट-प्रसंगाचा सामना करत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारणार्‍या नाशिकची जलतरणपटू साक्षी तेजाळे हिच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
 
  
लीखोगे पढोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब,’ अशी आपल्या समाजाची धारणा असल्याची अनुभूती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने सर्वांनाच प्राप्त होत असते. मात्र, आजपर्यंत काळ आणि समाजाचा खेळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. संकट-प्रसंगांचा सामना करत खेळाकडे वळलेल्या खेळाडूची मजल राष्ट्रीय पातळीपर्यंतजाते, तेव्हा तो खेळाडू नक्कीच दखलपात्र ठरतो.
असाच काहीसा प्रवास आहे नाशिकच्या साक्षी सुनील तेजाळेचा. साक्षीच्या वडिलांना स्लीप डिस्कचा त्रास होता. आजारपण दूर होण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना पाण्यात चालण्याचा व्यायाम प्रकार सांगितला. स्वा. सावरकर जलतरण तलावात साक्षीचे वडील हे पाण्यात चालत अशाच वेळी आपल्या मुलांनाही पोहणे शिकविले पाहिजे, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. यातूनच केवळ वयाच्या पाचव्याच वर्षी साक्षीने जलतरणास सुरुवात केली.
त्यानंतर आई-वडील प्रेरणास्थान असलेल्या साक्षीने जलतरणात कधीही मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक आव्हानात्मक स्पर्धांचा सामना करत साक्षीने स्वअस्तित्व निर्माण केले. नाशिक येथील एका प्रतिथयश महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेली साक्षी ही सध्या ‘विप्रो’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत प्रकल्प अभियंता म्हणून कार्यरत आहे. तिच्या महाविद्यालयात कंपनीच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीत तिला नोकरीसाठी आवश्यक असलेल्या ‘आयटी’ क्षेत्राबाबत इतरांपेक्षा जरा कमीच माहिती होती. मात्र, ही मुलगी तिला जे माहित नाही ते सर्व सहज आणि कमी वेळात आत्मसात करू शकेल, याची खात्री मुलाखतकारांना साक्षीचे व्यक्तिमत्व पाहून झाली. आपल्या या व्यक्तिमत्त्वाचे श्रेय साक्षी आपल्या जलतरणास देते.
आजवर साक्षीने जिल्हास्तर ते राष्ट्रीय पातळीवरील अनेकविध स्पर्धांत आपली चमक दाखविली आहे. साक्षीने आजवर ‘लाँग डीस्टनस’, ‘सी स्वमिंग’, ‘ट्रायथ लॉन’,(स्वमिंग, सायकलिंग व रनिंग) ऍक्वाथ लॉन (स्वमिंग व रनिंग) आदी प्रकारात विशेष प्राविण्य प्राप्त केले. साक्षी सायकलिंग आणि मॅरेथॉन आदी स्पर्धात नियमित सहभाग नोंदवत असते.
साक्षीने वयाच्या दहाव्या वर्षापासूनच समुद्रात पोहण्यास सुरुवात केली. तिने कुलाबा येथे भारतीय नौदलातर्फे आयोजित करण्यात येणार्‍या सहा किमीच्या ‘सी स्वमिंग’ प्रकारात सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेततिने अखिल भारतीय स्तरावर दहावा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच, पश्चिम बंगाल येथे भागीरथी नदीमध्ये आयोजित १९ किमी स्पर्धेत उत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तसेच, वयाच्या केवळ १२व्या वर्षी साक्षीने गुजरातमध्ये अरबी समुद्रात आयोजित २९ किमीची समुद्र स्पर्धा सर केली. सकाळी ८.३० वाजता समुद्रात उतरलेल्या साक्षीने संध्याकाळी ४.३० वाजता समुद्राबाहेर पाऊल टाकले. या स्पर्धेत तिने तब्बल साडेआठ तास पोहत आठवा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत साक्षी ही सर्वात लहान खेळाडू होती. या स्पर्धेने साक्षीच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविले. आत्मविश्वास, स्वहिमतीची ओळख आणि स्व जिद्द यांची ओळख साक्षीला झाली. या स्पर्धेसाठी तिच्या वडिलांनी अपार मेहनत साक्षीकडून करवून घेतली होती. खूप कष्ट केले. विविध स्पर्धेत पदकांची कमाई केली.
गुजरातच्या स्पर्धेनंतर आपल्यातीलच क्षमता आपल्याला कशा नव्याने जाणवत असतात, याची जाणीव झाल्याची साक्षी आवर्जून नमूद करते. ही स्पर्धा मुलांची स्पर्धा म्हणून खास करून ओळखली जाते. मात्र, मुलांसाठी असणारे अंतर एवढ्या लहान वयातील मुलीने पार केल्याने साक्षीचे कौतुक झाले.
आपल्या जलतरणाच्या प्रवासात साक्षीने आजवर अनेकविध मोठ्या व मान्यवर स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढला असल्याचे ती आवर्जून नमूद करते. त्यामुळेच इतर विद्यार्थ्यांपेक्षा आपले व्यक्तिमत्त्व हे वेगळे बनत गेल्याचे ती सांगते. जे अवघड आहे ते शिकण्याची मनोवृत्तीची वाढ होण्यास जलतरणाचे खूप मोठे योगदान असल्याचे साक्षी सांगते.
जीवनात जलतरणाचे महत्त्व विशद करताना साक्षी सांगते की, “जलतरणामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वसमावेशक विकास होण्यास चालना मिळते. वेळेचे व्यवस्थापन कसे करावे,” याची जाणीव जलतरणामुळे समृद्ध होत असल्याचे साक्षी सांगते. अभ्यास, खेळ, वडिलांचा व्यवसाय यांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य ही जलतरणाचीच देण असल्याचे ती आवर्जून नमूद करते. आजपर्यंत ‘ऑल राऊंडर’ व्यक्तिमत्व अशी ओळख आपल्याला जलतरणामुळेच मिळाल्याचे ती आवर्जून सांगते.
वयाच्या आठव्या वर्षी गिर्यारोहण करत असताना मार्ग चुकलेल्या साक्षीने न डगमगता योग्य मार्गाचा अवलंब करत, आपल्या लहान भावालाही आधार देत ते गिर्यारोहण पूर्ण केले. मनाची स्थिरता आणि संकटांना सामोरे जाण्याची ही वृत्ती जलतरणामुळेच विकसित झाल्याचे ती सांगते. आगामी काळात वडिलांसह ‘आयर्नमॅन’ स्पर्धा पूर्ण करण्याचे स्वप्न साक्षी उराशी बाळगून आहे. तिच्या आगामी वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0