मागील ४० वर्षात एकदाही महापालिकेकडून नालेसफाई नाही
10 May 2022 21:15:51
मुंबई: विक्रोळी पार्कसाईट परिसरातील वर्षानगरमधील डोंगरावरील वस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीमुळे नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो आहे. तर दुसरीकडे पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांना दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पाणी तुंबण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार असल्याने पालिकेच्या कामावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता वस्तीवरील ज्येष्ठ महिला सुंदराबाई गायकवाड म्हणाल्या, "गेली ५० वर्षे आम्ही इथे राहतो आहोत. या झोपडपट्टीत वर्षानुवर्षे आम्हाला या गटारांचा त्रास आहे. पावसाळ्यात पाणी भरतं, गटारीचे पाणी आमच्या घरात येतं. महापालिकेचे लोक कधीही इथे साफसफाई करायला वरती येत नाहीत. आम्ही सर्व लोक मिळून सणाला बाहेरून माणसं बोलवून साफसफाई करून घेतो.
स्थानिक नागरिक संदीप पाखरे सांगतात, ३५ वर्षांपासून मी इथे रहातोय. या ३५ वर्षात एकदाही मी या गटारीचे काम झाल्याचे पाहिलं नाहीये. अनेक योजना येतात. दत्तकवस्ती योजना होती. कोणीही इथे फिरकत नाही. दत्तकवस्ती योजनेअंतर्गत ७० कामगार असल्याची माहिती मला देण्यात आली. मात्र वस्तीवर १० लोक देखील काम करत नाहीत. या गटारांचे पाणी पावसाळ्यात थेट घरात शिरते. आमची लहान लहान मुलं आहेत. ते वारंवार आजारी पडतात मात्र कोणालाही आमच्या जीवाची काही पडलेली नाहीये. आम्ही तक्रारी करूनही पालिकेचे लोक येत नाहीत. १५-२० दिवस गटारातील कचरा असच पासून राहतो," अशी व्यथा पाखरे यांनी मांडली.