मलेरिया संकट आणि भारत

01 May 2022 20:46:29

malaria
सन २०२० मध्ये जगाने ‘कोविड’चे संकट अनुभवले. जगातील द्वितीय क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताने कोरोना संकटावर विविध उपाययोजना वेळीच केल्याने मोठी जीवितहानी टळली. याची यशोगाथा जगाने पाहिली आणि अनुभवलीही. मात्र, आता जगावर आणि भारतावर मलेरियाचे संकट घोंघावत आहे.सध्या एकीकडे संपूर्ण जग ‘कोविड-१९’ साथीच्या रोगावर मात करण्यासाठी रणनीतींवर विचारमंथन करत आहे. अशावेळी मलेरियासारखा प्राणघातक रोग जगात आपले डोके वर काढतानाचे चित्र मात्र दिसून येते. त्यामुळे याबद्दलदेखील आता जगाच्या पाठीवर विचारमंथन सुरू आहे.
नुकताच ‘जागतिक मलेरिया अहवाल, २०२१’ प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार २०१९ मध्ये जगात मलेरियाचे २२.७० दशलक्ष रुग्ण होते, जे २०२० मध्ये वाढून २,४१० दशलक्ष झाले. जर आपण मलेरियामुळे होणार्‍या मृत्यूंची माहिती घेतली, तर २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये हा जागतिक आकडा १२ टक्क्यांनी वाढला आहे, म्हणजे ६ लाख, २७ हजार मृत्यू झाले आहेत. हा वाढणारा आकडा आता चिंतेचा विषय ठरत आहे. भारताच्या बाबतीत हा आकडा भयानक आहे. २०२० मध्ये, दक्षिण-पूर्व आशियामध्ये मलेरियाचे पाच दशलक्ष रुग्ण आढळले. यापैकी मलेरियाच्या एकूण ५० रुग्णांपैकी ९९.७ टक्के प्रकरणे असलेले तीन देश होते आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण (८२.५टक्के) भारतात होते. दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशात मलेरियामुळे सर्वाधिक मृत्यू (८२ टक्के) भारतात आहेत. रोगाशी लढण्यासाठी आणि त्याला पराभूत करण्यासाठी, आपल्याला आरोग्य योजनांमध्ये अधिक तत्परतेने लक्ष देण्याची गरज यामुळे प्रतिपादित होते.
२०१५ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत भारतातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचे वचन दिले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर, मलेरिया निर्मूलनासाठी ‘राष्ट्रीय फ्रेमवर्क’ आणि मलेरिया निर्मूलनासाठी ‘राष्ट्रीय धोरणात्मक योजना (२०१७-२२)’ देखील २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. त्याचे परिणाम लगेच दिसून आले. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील मलेरियाचे रुग्ण 69 टक्क्यांपर्यंत कमी झाले. भारत हा एकमेव देश आहे, जिथे २०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये १७.६ टक्क्यांनी घट झाली आहे. उल्लेखनीय आहे की, २०२० मध्ये मलेरियाच्या एकूण १ लाख, ५७ हजार, २८४ रुग्णांची नोंद झाली होती, तर २०१९ मध्ये हा आकडा होता २ लाख, ८६ हजार, ०९१. म्हणजेच २०२०मध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये सुमारे ४५ टक्के घट झाली आहे. तथापि, कोरोनाच्या साथीने देशभरातील आरोग्य कार्यक्रमांवर परिणाम केला आणि २०२० मध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये झालेली घट ही या कालावधीत नोंदवलेल्या कमी संख्येशी संबंधित आहे. ज्यामध्ये मलेरियाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, कीटकनाशकयुक्त मच्छरदाणी आणि दीर्घकाळ टिकणारी कीटकनाशक जाळी या मलेरियापासून बचाव करण्याच्या दोन प्रभावी पद्धती आहेत. तथापि, कीटकनाशकांनी भरलेल्या मच्छरदाण्यांचे वितरण नक्कीच एक आव्हान राहिले आहे.
२०२० मध्ये जितक्या मच्छरदाण्यांचे वितरण करण्याचे नियोजित होते, त्यापैकी केवळ ५० टक्केच वितरण शक्य झाले आहे. औषधांचा प्रतिकार करणे हे एक आव्हान आहे. देशाच्या काही भागांमध्ये मलेरियाविरोधी औषध प्रतिकार आणि कीटकनाशक प्रतिकार नोंदवले गेले आहेत. भारताशेजारील देशांमध्येदेखील मलेरियाची अनेक प्रकरणे आहेत. या देशातील हे संकट भारतासाठी कितपत प्रभावी आहे आणि भारतात त्याच्या विस्ताराची व्याप्ती किती आहे, हे जाणून घेण्यासाठी काही इतर महत्त्वाच्या निदानात्मक हस्तक्षेपांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक ठरणार आहे. या संदर्भात जलद निदान चाचणीचा उल्लेख करणे आवश्यक आहे, जी मानवी रक्तात मलेरिया परजीवीचे (प्रतिजन) अस्तित्व शोधून मलेरियाचे निदान करण्यात मदत करते. ताज्या जागतिक मलेरिया अहवालानुसार, २०२० मध्ये भारतात २० दशलक्ष निदान चाचण्या झाल्या आहेत. भारतातील मलेरियाची व्यापक परिस्थिती पाहिल्यास भारत मलेरिया संकटावर मात करण्यासाठी सज्ज आहेच. मात्र, त्यात अधिक गतिमानता येण्याची नक्कीच गरज आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0